गुरूंवरील श्रद्धेच्‍या बळावर कठीण प्रसंगांत सतर्क राहून कृती करणार्‍या पडेल, जिल्‍हा सिंधुदुर्ग येथील श्रीमती प्रज्ञा राजेंद्र जोशी (वय ४३ वर्षे) !

‘श्रीमती प्रज्ञा राजेंद्र जोशी (वय ४३ वर्षे) माध्‍यमिक शिक्षिका आहेत. त्‍या मितभाषी, साध्‍या, सरळमार्गी आणि उपजतच साधकत्‍व असलेल्‍या एक गुणी साधिका आहेत. त्‍या ४ – ५ वर्षांपासून सनातनच्‍या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. त्‍या मी घेत असलेल्‍या सत्‍संगात येत असत. त्‍या कितीही व्‍यस्‍त असल्‍या, तरीही गुरुपौर्णिमेच्‍या वेळी अर्पण गोळा करण्‍यासाठी माझ्‍या समवेत येत असत. त्‍या माध्‍यमिक शिक्षिका असल्‍याने त्‍यांना गावात मान आहे, तरीही त्‍यांना माझ्‍या समवेत अर्पण मिळवण्‍यासाठी येतांना लाज वाटत नसे. त्‍या काही मासांपासून सत्‍संग घेण्‍याची सेवा करत आहेत.

श्रीमती प्रज्ञा जोशी

१. परिस्‍थितीला धिराने सामोरे जाणे 

गेल्‍या वर्ष-दीड वर्षाच्‍या कालावधीत त्‍यांच्‍यावर अनेक मोठे मानसिक आघात झाले, तरीही त्‍या गुरुंवरील श्रद्धेच्‍या बळावर प्रत्‍येक प्रसंगात शांत आणि स्‍थिर रहात आहेत. गेल्‍या वर्षी कोरोनाच्‍या साथीत त्‍यांच्‍या यजमानांचे निधन झाले. तरुण वयातील हा आघात सहन करणे, त्‍यांना अत्‍यंत कठीण गेले. वार्धक्‍य आणि अर्धांगवायू यांमुळे अंथरुणाला खिळून राहिलेल्‍या सासर्‍यांना स्‍वतःचेे दुःख कळू न देता त्‍यांनी सासर्‍यांची सेवा केली. सासर्‍यांना बोलता येत नव्‍हते आणि काही कळतही नव्‍हते. यजमानांच्‍या निधनानंतर काही मासांतच त्‍यांच्‍या सासर्‍यांचेही (कै. आनंद गोविंद जोशी, आध्‍यात्‍मिक पातळी ६१ टक्‍के) निधन झाले. त्‍या याही प्रसंगाला धिराने सामोरे गेल्‍या. त्‍या साधनारत रहाता येण्‍यासाठी धडपडत होत्‍या. त्‍यांना सेवेतून आनंद मिळत होता. कठीण प्रसंगांवर मात करून वर्तमानकाळात रहाण्‍याचे त्‍यांचे हे प्रयत्न कौतुकास्‍पद आणि सर्वांनाच अंतर्मुख करणारे होते.

२. कठीण प्रसंगात अवधान राखून योग्‍य कृती करणे

सौ. ज्‍योत्‍स्ना नारकर

२ अ. ‘घोणस’ जातीच्‍या सर्पाने दंश केल्‍यावर न घाबरता सापाचे भ्रमणभाषमध्‍ये छायाचित्र काढणे : ११.३.२०२२ या दिवशी दुपारी घराच्‍या बाहेर वाढी (पितरांना पान) ठेवत असतांना त्‍या जागी पडलेली झाडाची वाळलेली पाने एका हाताने सरकवत असतांना त्‍यांना घोणस जातीच्‍या सापाने दंश केला. त्‍या वेळी त्‍या घरी एकट्याच होत्‍या. या भयंकर प्रसंगातही घाबरून न जाता किंवा साहाय्‍यासाठी आरडाओरडा न करता त्‍यांनी त्‍या सापाचे भ्रमणभाषमध्‍ये छायाचित्र काढले.

२ आ. स्‍वतःला सर्पदंश होऊन स्‍थिर राहून परिस्‍थिती हाताळणे : एवढ्या भयंकर प्रसंगात ‘स्‍वतःला वेळेत उपचार मिळतील कि नाही’, असा कसलाही विचार न करता त्‍या भगवंतावर सगळे सोपवून शांत आणि स्‍थिर होत्‍या. त्‍यांनी साहाय्‍यासाठी माझ्‍या यजमानांना (डॉ. रविकांत नारकर यांना) भ्रमणभाष केला. त्‍यांनी समवेत पाण्‍याची बाटली, पिशवी, पाकीट आणि भ्रमणभाष घेऊन दाराला कुलूप लावले. त्‍या १० मिनिटे चालत आमच्‍या चिकित्‍सालयात आल्‍या. यातून ‘प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कशा कृती करायला हव्‍यात ?’, हे मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळाले.

२ इ. सतर्कता : रुग्‍णालयात पुढील उपचारांसाठी जातांना त्‍यांनी त्‍यांच्‍या मुलाला शाळेतून आणण्‍याविषयी सांगितले, तसेच ‘शाळा किती वाजता सुटणार ?’, हेही सांगितले. त्‍या दिवशी त्‍यांच्‍याकडे एका सेवेचे दायित्‍व होते. त्‍यांनी संबंधित साधकांना स्‍वतःच्‍या स्‍थितीविषयी सांगितले, तसेच मलाही कळवण्‍याविषयी सांगितले.

२ ई. सहनशीलता : सर्पदंश झाल्‍यामुळे त्‍यांना ४० इंजेक्‍शन्‍स घ्‍यावी लागली, तसेच त्‍यांना सर्पदंशानंतरची सर्व भयंकर लक्षणे आणि त्रास सहन करावा लागला. त्‍यांच्‍या हाताला प्रचंड सूज येऊन त्‍यांचा हात दुखत होता, तसेच त्‍यांना जेवण जात नव्‍हते, तरीही त्‍यांनी हे सर्व सहन केले.

२ ऊ. प्रज्ञाताईंमध्‍ये ‘नम्रता, शिकण्‍याची वृत्ती, स्‍वीकारण्‍याची वृत्ती आणि विचारण्‍याची वृत्ती’, असे अनेक गुण आहेत.

३. कृतज्ञता

त्‍यांच्‍यामधील गुणांचे अल्‍पसे निरीक्षण करून ते मांडण्‍याची सेवा गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) माझ्‍याकडून करवून घेतली. मला एका गुणी साधिकेचा सहवास लाभला, त्‍याबद्दल गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. ज्‍योत्‍स्ना रविकांत नारकर (वय ६० वर्षे), पडेल, ता. देवगड, जिल्‍हा सिंधुदुर्ग. (२७.३.२०२२)