परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर श्रद्धा असल्‍याने वडिलांच्‍या मृत्‍यूनंतर स्‍थिर रहाणार्‍या आणि साधनेमुळे सकारात्‍मक पालट अनुभवणार्‍या पुणे येथील कु. मधुरा मोहन चतुर्भुज (वय ३५ वर्षे)!

पौष कृष्‍ण दशमी (१७.१.२०२३) या दिवशी कु. मधुराचा ३५ वा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त मला जाणवलेली तिची गुणवैशिष्‍ट्ये आणि तिच्‍यामध्‍ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.

कु. मधुरा चतुर्भुज

कु. मधुरा चतुर्भुज हिला ३५ व्‍या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्‍या वतीने अनेक शुभेच्‍छा !

१. एकपाठी

शाळेत असतांना मधुरा एकपाठी होती. एकदा शिकवलेलेही तिला नेहमी लक्षात रहायचे. साधारण १२ वर्षांपूर्वी गायनाच्‍या वर्गात शिकवलेले एक कन्‍नड गाणे अजूनही तिच्‍या लक्षात आहे.

२. गायन आणि नृत्‍य यांची आवड

श्रीमती माधवी चतुर्भुज

मधुराला गायन आणि नृत्‍य यांची विशेष आवड आहे. तिला सतारवादन करायलाही आवडते. लहानपणी तिने शाळेत, तसेच अन्‍य ठिकाणी व्‍यासपिठावर गाण्‍याचे कार्यक्रम केले आहेत. तेव्‍हा प्रत्‍येक वेळी तिचा प्रथम क्रमांक यायचा. समाजातील काही जण अजूनही तिच्‍या गाण्‍याचे कौतुक करतात.

३. वडिलांचे निधन झाल्‍यावर स्‍थिर राहून प्रसंगाला सामोरे जाणे आणि आईची सर्वतोपरी काळजी घेणे

लहानपणापासून मधुराला तिच्‍या वडिलांप्रती विशेष ओढ होती. २ वर्षांपूर्वी कोरोनाचा संसर्ग झाल्‍याने तिच्‍या वडिलांचे निधन झाले. त्‍या वेळी स्‍थिर राहून मधुरा या कठीण प्रसंगाला सामोरी गेली. यजमानांच्‍या मृत्‍यूनंतर तिने माझी शारीरिक, मानसिक आणि आध्‍यात्मिक स्‍तरांवर काळजी घेतली.

४. साधनेची आवड आणि परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर विशेष श्रद्धा असणे

मधुराला लहानपणापासून साधनेची आवड आहे. लहानपणापासून तिच्‍यामध्‍ये भक्‍तीभाव आहे आणि तिला मंदिरात जायला आवडते. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांवर तिची दृढ श्रद्धा आहे. तिच्‍यामध्‍ये ‘तळमळ’ आणि ‘जिज्ञासू वृत्ती’ हे गुण दिसून येतात.

मधुरामध्‍ये नीटनेटकेपणा, काटकसर आणि प्रेमभाव हे गुणही आहेत.

५. मधुरामध्‍ये जाणवलेले पालट

५ अ. परिस्‍थिती स्‍वीकारणे आणि इतरांचा विचार करणे : डिसेंबर २०२२ मध्‍ये धारवाड, कर्नाटक येथे आमच्‍या एका नातेवाईकाचे लग्‍न होते. मला लग्‍नाला जायला मिळावे आणि नातेवाइकांनाही आनंद मिळावा, यासाठी मधुरा माझ्‍या समवेत धारवाडला आली. पुष्‍कळ वर्षांपासून आम्‍ही रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आणि आमचे पुण्‍यातील घर, यांव्‍यतिरिक्‍त अन्‍य कुठेही गेलेलो नाही. त्‍यामुळे खरेतर तिला प्रवासाची सवय नाही. पूर्वी प्रवासात तिची चिडचिड व्‍हायची. कुणाचा धक्‍का लागलेलाही तिला सहन व्‍हायचा नाही.

या वेळी आम्‍ही २ वेळा दूरचा प्रवास केला, तरीही मधुरा शांत होती. ‘ती आता हळूहळू परीस्‍थिती स्‍वीकारत आहे’, असे माझ्‍या लक्षात आले. तिने प्रवासात माझी काळजीही घेतली.

५ आ. मधुरा आता स्‍वावलंबी होण्‍यासाठी प्रयत्न करत आहे.

मधुरातील हे पालट बघून मला आणि नातेवाइकांनाही आश्‍चर्य वाटते. परात्‍पर गुरु डॉक्‍टरांनीच मधुरामध्‍ये सकारात्‍मक पालट घडवून आणले आहेत. मी त्‍यांच्‍या चरणी कृतज्ञ आहे.’

– श्रीमती माधवी मोहन चतुर्भुज, पुणे (७.१.२०२३)