पुढील ९ सहस्र वर्षांत जून मासात संक्रांत येईल ! – प्रा. सुरेश चोपणे, खगोल अभ्‍यासक

नागपूर – अलीकडच्‍या काळात मकरसंक्रांतीचे दिनांक सतत पालटत आहेत. पूर्वी १४ जानेवारीला येणारी मकरसंक्रांत आता १५ जानेवारीला येत आहे. पुढील ९ सहस्र वर्षांत मकरसंक्रांत जून मासात येईल, अशी माहिती खगोल अभ्‍यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली. मकरसंक्रांतीचा मागील दिनांक पाहिल्‍यास वर्ष २७२ मध्‍ये मकरसंक्रांत १४ जानेवारी या दिवशी येत असे. पुढे वर्ष १ सहस्रमध्‍ये ती ३१ डिसेंबर या दिवशी येत होती. नंतर गेल्‍या ५० वर्षांपासून संक्रांत १४ जानेवारी या दिवशी येत आहे; मात्र आता पुन्‍हा संक्रांतीचा दिनांक पालटला असून यंदा ती १५ जानेवारी या दिवशी आली आहे, अशी माहिती खगोल अभ्‍यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली आहे.

प्रा. चोपणे पुढे म्‍हणाले की, सूर्याच्‍या एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करण्‍याच्‍या क्रियेला ‘संक्रांत’ म्‍हणतात. सूर्याचे वर्ष ३६५.२४२२ दिवसांचे, तर चंद्राचे वर्ष ३५४.३७२ दिवसांचे असते. चंद्र कालगणना ही सूर्यकालगणनेपेक्षा ११.२५ दिवसांनी मागे आहे. त्‍यामुळेच आपण ३ वर्षांत १ अधिक मास घेऊन ३६५ दिवस पूर्ण करत असतो. ‘लीप इअर’च्‍या या भेदाने मकरसंक्रांतीच्‍या दिनांकात फरक पडत आहेत.