केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही !

  • ‘माहिती अधिकारा’त मिळाली माहिती !

  • ‘इस्लामी आतंकवाद’ असल्याचे माहितीतून झाले स्पष्ट !

नवी देहली – केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नोंदीमध्ये ‘हिंदु आतंकवाद’ असा शब्दच नाही, अशी माहिती ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते प्रफुल्ल शारदा यांनी मिळवली आहे. ‘काही राजकीय नेत्यांनी लांगूलचालनाच्या राजकारणासाठी ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द निर्माण केला’, असा आरोप प्रफुल्ल शारदा यांनी केला.

१. प्रफुल्ल शारदा यांनी केलेल्या माहितीच्या अर्जामध्ये विचारले होंते की, भारतात किती आतंकवादी संघटना आहेत ? त्यांची नावे आणि विस्तृत माहिती देण्यात यावी. तसेच त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जात आहेत ? आणि हिंदु आतंकवादी किंवा भगवा आतंकवाद अशा शब्द असेल, तर त्याचीही माहिती देण्यात यावी. यावर केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीमध्ये आतंकवादी संघटनांची नावे आणि विस्तृत माहिती देण्यासह ‘भगवा’ किंवा ‘हिंदु आतंकवाद’ असा कोणताच शब्द त्यांच्याकडे नोंद नसल्याचे सांगितले.

२. प्रफुल्ल शारदा यांनी प्रामुख्याने वर्ष २००६ मधील मालेगाव बाँबस्फोटाविषयी प्रश्‍न विचारला. ‘या स्फोटात हिंदु किंवा भगवा आतंकवादी सहभागी होते का ?’, असे विचारले होते.

३. प्रफुल्ल शारदा यांनी सांगितले की, मी केवळ एक भारतीय नाही, तर एक हिंदु असल्याने दुखावला गेलो होतो. एका विशेष धर्मियांची मते मिळवण्यासाठी काही राजकारणी सातत्याने देशातील हिंदूंना अपकीर्त करत होते किंवा हिंदु अथवा भगवा आतंकवाद यांसारखे खोटे शब्द पसरवत होते. ‘हिंदु आतंकवाद’ अस्तित्वातच नाही; मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाने दिलेल्या माहितीतून हे स्पष्ट होते की ‘इस्लामी आतंकवाद’ अस्तित्वात आहे आणि जगभरातील निरपराध लोकांना ठार मारून ते जगाला त्रास देत आहेत.

४. ४२ संघटनांना ‘आतंकवादी संघटना’ घोषित करण्यात आले आहे. यात बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान कमांडो फोर्स, खलिस्तान झिंदाबाद फोर्स, इंटरनेशनल सिख यूथ फेडरेशन, लष्कर-ए-तोयबा, पसबन-ए-अहले हादी, जैश-ए-महंमद आदींचा समावेश आहे. यासह आतंकवादाचा सामना करण्यासाठी सरकारने अनेक प्रयत्न केले आहेत आणि करत आहे, अशी माहितीही या उत्तरात देण्यात आली आहे.