भारतात १५ ऑगस्ट १९४७ नंतर महापुरुष जन्माला येणे बंद झाले ! – अभिनेते शरद पोंक्षे

अभिनेते शरद पोंक्षे

मुंबई – जर तुम्ही १४ ऑगस्ट १९४७ पर्यंतचा इतिहास वाचलात, तर एक महापुरुष जन्माला येतो, तो संपेपर्यंत दुसर्‍या महापुरुष जन्माला येतो. एक शंकराचार्य जन्माला आले, मग ज्ञानेश्‍वर माऊली जन्माला आली, मग समर्थ रामदासस्वामी जन्माला आले, त्यानंतर संत तुकाराम महाराज जन्माला आले. त्याच काळात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. पेशवे जन्माला आले, तात्या टोपे जन्माला आले. झाशीची राणी, त्यानंतर चाफेकर बंधू जन्माला आले, सावरकर, टिळक जन्माला आले. अशातच १५ ऑगस्ट १९४७ आले आणि त्यानंत महापुरुष जन्माला येणे बंद झाले, असे विधान अभिनेते शरद पोंक्षे यांनी ट्विटरवर प्रसारित केलेल्या व्हिडिओमध्ये केले आहे.


त्यांनी पुढे म्हटले आहे, ‘‘आपला देश शेतीप्रधान का आहे ? उगवलेल्या रोपट्याचे सर्वच दाणे बाजारात विकायला जात नाहीत. त्यांतील काही दाणे जन्माला आल्यानंतर बाजारात जाऊन विकायला उभे रहाण्याऐवजी स्वतःला त्याच भूमीमध्ये पुन्हा गाडून घ्यायला सिद्ध होतात. ते गाडून घ्यायला सिद्ध होतात; म्हणून त्यातून दुसरे दाणे निर्माण होतात. ही साखळी आहे; पण ही साखळी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी संपली.’’