गोवा : पिळर्ण येथे रंग बनवणार्‍या कारखान्याच्या गोदामाला लागलेली आग १६ घंट्यांनंतर नियंत्रणात

आग १६ घंट्यांनंतर नियंत्रणात

पणजी, ११ जानेवारी (वार्ता.) – पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील ‘बर्जर बेकर कोटिंग’ या रंग बनवणार्‍या कारखान्याच्या गोदामाला १० जानेवारी या दिवशी दुपारी लागलेली भीषण आग पूर्णपणे आटोक्यात येण्यास तब्बल १६ घंट्यांचा अवधी लागल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर सकाळी ४ जेसीबी यंत्रांच्या साहाय्याने अवशेषांचा ढिगारा हालवण्यात येत आहे. आगीनंतर पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून तळमजल्यावर पडल्याने आग विझवण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या.

अग्नीशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आग विझवण्यासाठी दुसर्‍या दिवशीही पाणी-फोम मिश्रित फवार्‍याचा सातत्याने मारा करावा लागला. आतापर्यंत आग विझवण्यासाठी ४ टन ‘फोम’ आणि १२ लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे १०० कर्मचारी घटनास्थळी दिवसरात्र काम करत होते. त्यांना संरक्षण, नौदल आणि मुरगाव पोर्ट ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले. औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड यांच्यानुसार पिळर्ण औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची वीज १० जानेवारीच्या रात्री ११ वाजता पूर्ववत् करण्यात आली आहे.

गोदामापासून २ किलोमीटर परिसरातील लोकांनी अन्यत्र घेतला आसरा

गोदामापासून २ किलोमीटर क्षेत्रातील स्थानिकांनी सरकारने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार १० जानेवारी या दिवशी रात्रीच अन्यत्र आसरा घेतला. विशेषत: गोदामाच्या पायथ्याशी असलेल्या सायपे गावातील लोकांनी घरे बंद करून नातेवाइकांच्या घरी आसरा घेतला. सुमारे ७० घरांतील २०० हून अधिक लोकांचे एका रात्रीत स्थलांतर करण्यात आले.

हवा आणि पाणी प्रदूषण नियंत्रणात ! – प्रदूषण नियंत्रण मंडळ

आगीनंतर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाणी आणि हवा प्रदूषणावर देखरेख ठेवण्यात येत आहे अन् हे काम अद्याप चालू आहे. येथील प्रदूषणाची पातळी वाढलेली नसून ती नियंत्रणात आहे, अशी माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

आगीच्या दुर्घटनेचे अन्वेषण करण्यासाठी समिती स्थापन करणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

आगीच्या दुर्घटनेचे अन्वेषण करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. आग कोणत्या कारणामुळे लागली ? आणि ती पुढे भडकण्यामागील कारणे नेमकी कोणती होती ? आदी सूत्रांवर ही समिती अन्वेषण करणार आहे. समितीचा अहवाल आल्यावर आवश्यक कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.