श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणी दोषींवर गुन्‍हे नोंद करा !

शहादा (जिल्‍हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांचे मुख्‍यमंत्र्यांना निवेदन

मुंबई, ७ जानेवारी (वार्ता.) – श्री तुळजाभवानी मंदिरातील कोट्यवधी रुपयांच्‍या भ्रष्‍टाचाराच्‍या चौकशीचे प्रकरण बंद करण्‍यात आल्‍याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण न्‍यायालय आणि विधीमंडळ यांचा अवमान करणारे आहे, त्‍यामुळे सदर प्रकरणाची चौकशी बंद करण्‍याचा निर्णय मागे घ्‍यावा, तसेच मंदिरात भ्रष्‍टाचार करणार्‍या दोषींवर ‘सीआयडी’च्‍या अहवालानुसार गुन्‍हे नोंद करा, अशी मागणी शहादा (जिल्‍हा नंदुरबार) येथील भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी मुख्‍यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

भाजपचे आमदार राजेश पाडवी

महाराष्‍ट्राची कुलस्‍वामिनी असणार्‍या श्री तुळजाभवानी मंदिरात वर्ष १९९१ ते २००९ या काळात ८ कोटी ४५ लाख १७ सहस्र रुपयांचा दानपेटी घोटाळा करणारे लिलावदार, ५ तहसीलदार आणि अन्‍य २ यांच्‍यावर गुन्‍हे नोंद करण्‍याची महत्त्वपूर्ण शिफारस राज्‍य गुन्‍हे अन्‍वेषण विभागाने गृह विभागाला केली होती. विधीमंडळ आणि न्‍यायालय यांची दोषींवर कारवाई करावी, असे आदेश असतांना गृह विभागाच्‍या उपसचिवांनी १५ जून २०२२ या दिवशी सदर चौकशी बंद करण्‍याचा धक्‍कादायक निर्णय घेतला आहे. हा निर्णय विधीमंडळ, तसेच चौकशीवर देखरेख करणार्‍या उच्‍च न्‍यायालय यांचा अवमान आहे, असेही निवेदनात म्‍हटले आहे.