कर्णावती येथे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ‘पठाण’ चित्रपटाची भित्तीपत्रके फाडली !

कर्णावती (गुजरात) – अभिनेते शाहरूख खान यांच्या ‘पठाण’ चित्रपटाला गेल्या काही दिवसांपासून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी कर्णावती शहरातील ‘अल्फावन’ या मॉलमध्ये (‘मॉल’ म्हणजे मोठे व्यापारी संकुल) लावलेली चित्रपटाची भित्तीपत्रके फाडली. या वेळी मॉलचीही तोडफोड करण्यात आली. ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’, अशी चेतावणी या वेळी कार्यकर्त्यांनी दिली. पोलीस तेथे पोचल्यावर त्यांनी ५ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आणि नंतर सोडून दिले.

बजरंग दलाचे अध्यक्ष ज्वलित मेहता यांनी म्हटले की, अभिनेत्री दीपिका पदुकोण यांनी परिधान केलेल्या कपड्यांना आमचा विरोध आहे. ‘पठाण’ चित्रपट ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देतो. त्यामुळे आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही.