(म्हणे) ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ उपाधी शिवरायांना, तर ‘धर्मवीर’ उपाधी संभाजी महाराज यांना मर्यादित करते !’ – अजित पवार, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई – छत्रपती संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणावे, हीच माझी भूमिका आहे. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ म्हणतात; मात्र ज्योतिबा फुले यांनी शिवरायांना ‘कुलवाडीभूषण’ म्हटले. ‘गोब्राह्मणप्रतिपालक’ ज्याप्रमाणे शिवरायांना मर्यादित करते, त्याप्रमाणेच ‘धर्मवीर’ उपाधीचे आहे, असे आक्षेपार्ह वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधीमंडळातील विरोधीपक्ष कार्यालयात ४ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केले.

अजित पवार पुढे म्हणाले की,

१. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला स्वत:चे मत व्यक्त करण्याचा अधिकार दिला आहे. प्रत्येकाला अभिव्यक्ती आणि विचार स्वातंत्र्य आहे. संभाजी महाराज यांना ‘स्वराज्यरक्षक’ म्हणावे, अशी माझी भूमिका आहे.

२. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या स्वराज्याचे रक्षण करण्याचे काम संभाजी महाराज यांनी केले. या स्वराज्यात सर्व जाती-धर्माच्या लोकांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी मी काहीही अपशब्द बोललेलो नाही. मी इतिहासतज्ञ नाही. माझ्या वाचनावरून माझी भूमिका मी निश्‍चित केली आहे. मी इतिहासाचा संशोधक नाही. राजकीय हेतूने राजकारण तापवून द्वेषाचे राजकारण करणे योग्य नाही.

३. इतिहासामध्ये रामदासस्वामी यांना गुरु मानले जात होते; परंतु त्यानंतरच्या इतिहासाच्या संशोधनात ‘रामदासस्वामी आणि दादोजी कोंडदेव हे गुरु नाहीत’, हे मान्य करण्यात आल्यावर सरकारने ‘दादोजी कोंडदेव’ पुरस्कार बंद केला. शरद पवार यांच्या म्हणण्याप्रमाणे संभाजी महाराज यांना कुणी ‘धर्मवीर’ म्हणत असेल, तर हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे.

४. मी कोणतेही वादग्रस्त विधान केलेले नाही. यापूर्वी राज्यपाल, भाजपचे मंत्री आणि प्रवक्ते यांनी वादग्रस्त विधान केले. मी काहीही चुकीचे बोललो नाही. छत्रपती संभाजी महाराज हे एका धर्माचे होते का ? ‘स्वराज्यरक्षक’ या उपाधीमध्ये ‘शौर्य’, ‘धर्म’, ‘संस्कृती’ येते. प्रत्येकाला विचारस्वातंत्र्य आहे. मी माझी भूमिका मांडली आहे. ज्यांना योग्य वाटते त्यांनी स्वीकारावे.

अजित पवार यांनी शब्द पालटले !

‘मी काही चुकीचे बोललो असल्यास सांगा, मी पदाचे त्यागपत्र देतो’, असे अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर त्वरित पवार यांनी त्यांचे शब्द दुरुस्त करत ‘मी बोललेलो चुकीचे आहे, हे मला पटवून द्या, त्यानंतर मी पदाचे त्यागपत्र देतो’, असे म्हटले.

संपादकीय भूमिका

‘गोब्राह्मणप्रतिपालक’ आणि ‘धर्मवीर’ या उपाधी छत्रपती शिवाजी महाराज अन् धर्मवीर संभाजी महाराज यांना मर्यादित करणार्‍या नसून त्यांचे व्यापक हिंदु धर्मकार्य दर्शवणार्‍या आहेत !