वादग्रस्त भाग श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावर आधारित नसल्याचा ‘सोनी लिव’चा कांगावा !

हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात येणारे निवेदन न स्वीकारता केवळ खंत व्यक्त करण्याचा सोपस्कार !

मुंबई – सर्व स्तरांवरून मोठ्या प्रमाणात झालेल्या टीकेनंतर ‘सोनी लिव’ संकेतस्थळावरील श्रद्धा वालकर हत्येशी संबंधित मालिकेतील आक्षेपार्ह भाग हटवण्यात आला आहे. तथापि हा भाग श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर आधारित नसल्याचा कांगावा एकीकडे ‘सोनी लिव’कडून करण्यात आला आहे, तर दुसरीकडे त्यांनी खंतही व्यक्त केली आहे. यामध्ये प्रेक्षकांच्या भावनांचा आदर करत वादग्रस्त भाग हटवल्याचे ‘सोनी लिव’कडून सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मात्र याविषयी हिंदुत्वनिष्ठांकडून देण्यात येत असलेले साधे निवेदन स्वीकारण्याचेही सौजन्य ‘सोनी लिव’चे मूळ आस्थापन असलेल्या ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’कडून दाखवण्यात आले नाही. यावरून ‘सोनी लिव’कडून व्यक्त करण्यात येत असलेली खंत हा केवळ सोपस्कार असल्याचे दिसून येत आहे.

१. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २ जानेवारी या दिवशी हरियाणा राज्यातील गुरुग्राम येथील ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’च्या सायबर सिटीमधील कार्यालयात याविषयीचे निवेदन देण्यासाठी समितीचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे, हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय चोपडा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. वैद्यनाथन् गेले होते.

२. या वेळी हे ‘सेल्स ऑफिस’ असल्याचे सांगत तेथील अधिकार्‍यांनी भेटण्यास नकार दिला. यासह त्यांनी निवेदन मुंबईला देण्यास सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली. निवेदन स्वीकारून स्वाक्षरी आणि शिक्का देण्याची विनंती केल्यावर त्यालाही नकार देण्यात आला, अशी माहिती श्री. नरेंद्र सुर्वे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.

३. ‘सोनी पिक्चर्स नेटवर्क’च्या ‘सोनी लिव’ संकेतस्थळावर ‘क्राईम पॅट्रोल’ या मालिकेत ‘अहमदाबाद-पुणे मर्डर केस’ हा २१२ क्रमांकाचा भाग २७ डिसेंबर २०२२ या दिवशी प्रसारित करण्यात आला. हा भाग काही दिवसांपूर्वी देहलीत झालेल्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाशी मिळताजुळता असल्याचे लक्षात येताच ‘सोनी लिव’च्या विरोधात सामाजिक माध्यमांवरून मोठ्या प्रमाणात टीका झाली. या संकेतस्तळावर बहिष्कार घालण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांवर जोर धरू लागल्याने ‘सोनी लिव’ने आक्षेपार्ह भाग हटवून खंत व्यक्त केली आहे.

(म्हणे) ‘प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन भाग हटवला !’ – ‘सोनी लिव’चा कांगावा

ही कथा काल्पनिक असून वर्ष २०११ मधील घडलेल्या एका हत्येवर आधारित आहे. ही कथा आणि प्रसंग यांचा अलीकडील कोणत्याही घटनेशी संबंध नाही; परंतु प्रेक्षकांच्या भावना लक्षात घेऊन हा भाग हटवण्यात आला आहे. यामुळे प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही मनापासून खेद व्यक्त करतो, अशी भूमिका ‘सोनी लिव’ने घोषित केली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदूंच्या भावनांना काडीचीही किंमत न देता खंत व्यक्त करण्याचा सोपस्कार पार पाडणार्‍या ‘सोनी लिव’ संकेतस्थळावर हिंदूंनी बहिष्कार घालून धडा शिकवावा, तसेच सरकारनेही त्यावर तात्काळ बंदी घालावी !