दक्षिण गोव्यात १ वर्षात बलात्काराची ३५ प्रकरणे नोंद

मडगाव, १ जानेवारी (वार्ता.) – दक्षिण गोव्यात महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह  उपस्थित केले जात आहे. दक्षिण गोव्यात मागील वर्षी (जानेवारी ते डिसेंबर २०२२ मध्ये) बलात्काराची एकूण ३५ प्रकरणे नोंद झाली आहेत. जिल्हातील ग्रामीण भागात नवीन बांधकामांमध्ये वाढ झाल्यामुळे परप्रांतियांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे राज्यातील बलात्कार आणि अपहरण प्रकरणांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गतवर्षी दक्षिण गोवा जिल्ह्यात बलात्काराची वेर्णा पोलीस ठाणे – ८, वास्को पोलीस ठाणे – ६, मायणा-कुडतरी आणि कोलवा पोलीस ठाण्यांत प्रत्येकी ४, कुंकळ्ळी आणि फातोर्डा पोलीस ठाण्यांत प्रत्येकी ३, मडगाव आणि फोंडा पोलीस ठाण्यांत प्रत्येकी २, केपे, सांगे आणि काणकोण पोलीस ठाणे येथे प्रत्येक १ प्रकरण नोंद झाले आहे. या सर्व प्रकरणांचा छडा लावण्यास पोलिसांना यश आलेले आहे. काही प्रकरणांमध्ये पीडिता या विद्यार्थिनी आणि अल्पवयीन आहेत, तर अन्य प्रकरणांमध्ये पीडिता प्रौढ आहेत.

पीडित महिलांना धमकावून आणि मारहाण करून हे गैरकृत्य करण्यात आले आहे. बहुतेक प्रकरणांमध्ये पीडिता संशयिताला ओळखत होती आणि लग्नाचे आमीष दाखवून संशयिताकडून तिच्यावर अत्याचार करण्यात आले. काही प्रकरणांमध्ये पीडिता गर्भवती झाल्यानंतर संशयिताच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. जाणकारांच्या मते बलात्काराच्या प्रकरणी संशयितांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेचे कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवला जातो. हा गुन्हा सिद्ध झाल्यास संशयिताला किमान ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाते.

संपादकीय भूमिका

महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे, तसेच बलात्कार्‍यांना फाशीची शिक्षा झाल्यासच असे प्रकार थांबतील !