गोव्याच्या हितरक्षणासाठी गोमंतकियांनी संघटित होऊन आवाज उठवावा ! – पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर

पणजी – कर्नाटक सरकारच्या कळसा-भंडुरा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाला केंद्रीय जल आयोगाने मान्यता दिल्याने कर्नाटकने धरणाचे काम चालू करण्याची सिद्धता केली आहे. गोव्यातील नेत्यांनी याविषयी राजकारण करण्याऐवजी प्रामाणिकपणे राज्याच्या हिताचे रक्षण कसे होईल, यासाठी संघटित प्रयत्न केले पाहिजेत, तरच कर्नाटककडून होणारा जल आणि जंगल यांचा र्‍हास रोखणे शक्य होणार आहे. गोमंतकियांनी आता सातत्याने संघटित होऊन या विरोधात आवाज उठवला पाहिजे, असे आवाहन पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी गोमंतकियांना केले आहे.

कर्नाटक सरकार दुधसागर येथे म्हादईवर ३ प्रकल्प उभारण्याच्या सिद्धतेत !

कर्नाटक सरकार दुधसागर येथे म्हादईवर ३ प्रकल्प उभारण्याच्या सिद्धतेत आहे, अशी माहिती केरकर यांनी दिली. ते माहिती देतांना पुढे म्हणाले, ‘‘कणकुंबी (कर्नाटक) येथील श्री रामेश्वर मंदिर परिसरात उगम पावणारी म्हादई नदी कळसा, कणकुंबी, चोर्ला, हुळंद आणि पारवाड येथील पाणी घेऊन गोव्यात सुर्ल येथे बाराजणांच्या धबधब्याच्या रूपात प्रवेश करते. या नाल्याच्या उगमापासून ३-४ कि.मी.चा प्रवाह आणि नदीचे पात्रच कर्नाटकने वर्ष २००६ पासून मोठ्या प्रमाणात आरंभलेल्या कालव्याच्या खोदकामामुळे उद्ध्वस्त केले आहे. त्याजागी मलप्रभा नदीत पाणी नेण्यासाठी बांधकाम केल्याने सध्या पावसाचे गोव्याकडे येणारे पाणी कर्नाटक येथे वहात आहे.’’

कळसा-भंडुरा प्रकल्पामुळे समुद्राचा खारटपणा वाढणार !

१. कर्नाटक सरकारचे म्हादई नदीवरील प्रस्तावित कळसा, हलतरा आणि भंडुरा या धरणांचे, तसेच कर्नाटक येथे म्हादईच्या उगमस्थानी महाकाय भुयारी आणि उघडे कालवे यांचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गोव्याकडे येणारे गोडपाण्याचे प्रमाण घटणार आहे. त्याचे दुष्परिणाम येथील मत्स्य आणि जलचर यांची पैदास आणि लोकसंस्कृती आदींवर होणार आहे.

२. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञाने वर्ष २००८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधातून गोड्या पाण्याचे नैसर्गिक प्रवाह धरणांद्वारे बंदिस्त केल्यावर समुद्रातला खारटपणा वाढून त्याचे दुष्परिणाम तेथील मत्स्य पैदाशीवर आणि एकंदर पर्यावरणीय परिसंस्थेवर कसा होऊ शकतो ? याचा ऊहापोह केला आहे. समुद्राला मिळणारे गोड्या पाण्याचे प्रवाह धरणामुळे बंदिस्त झाल्याने भारतातल्या बर्‍याच किनारपट्टीवर प्रदेशातील
मत्स्यसंपदेवर प्रतिकूल परिणाम झाले आहेत, अशी माहिती पर्यावरणतज्ञ राजेंद्र केरकर यांनी दिली.

३. वर्ष २००१ पासून हवामान पालट आणि जागतिक तापमानात झालेली वाढ यांचे परिणाम भारताला जाणवू लागले आहेत. पश्चिम किनार्‍यावरील गोव्यात ही परिस्थिती  आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे.

४. आकाराने लहान असलेल्या गोव्यात सर्वाधिक गोडे पाणी म्हादई नदीच पुरवते. कर्नाटकने कळसा-भंडुरा प्रकल्प उभारल्यास गोव्यात पेयजलाची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.

५. दमट हवामान आणि वाढती क्षारता यांमुळे येथील प्राणीमात्रांचे जीवन त्रस्त होऊ शकते.