सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर आरूढ होण्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि आलेल्या अनुभूती

सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरुपदावर आरूढ होण्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना आणि त्यांच्या सन्मान सोहळ्याच्या वेळी आलेल्या अनुभूती

२९.६.२०२२ या दिवशी रामनाथी (गोवा) येथे एक सन्मान सोहळा झाला. या सोहळ्यात ‘पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) सद्गुरु पदावर आरूढ झाले’, असे घोषित करण्यात आले. पू. नीलेश सिंगबाळ वाराणसी आश्रमात वास्तव्याला असतात. त्यामुळे तेथील साधकांसाठी ‘ऑनलाईन’ सोहळा पहाण्याचे आयोजन करण्यात आले होते. पू. नीलेशदादा सद्गुरु पदावर आरूढ होण्याविषयी वाराणसी आश्रमातील साधकांना मिळालेल्या पूर्वसूचना, त्या वेळी आश्रमातील वातावरणात जाणवलेले पालट अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु नीलेश सिंगबाळ

१. पू. नीलेशदादांना ‘सद्गुरुपद’ मिळण्याविषयी मिळालेल्या पूर्वसूचना

१ अ. सौ. प्राची मसुरकर

१. ‘मागील २ मासांपासून पू. नीलेश सिंगबाळ यांच्याकडे पाहून ‘ते आता लवकरच सद्गुरुपदावर विराजमान होतील’, असे मनात येऊन मला आनंद वाटत होता.’

१ आ. सुश्री सुनिता छत्तर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

१. ‘पू. नीलेश सिंगबाळ यांच्यातील तेजतत्त्व वाढले असून ‘ते आता सद्गुरु होणार आहेत’, असे विचार माझ्या मनात येत होते.

२. त्यांच्याकडे पाहिल्यावर साधकांची नकारात्मकता आणि निरुत्साह दूर होत होता अन् स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया करायला आपोआप ऊर्जा मिळत होती.

३. पू. नीलेशदादांच्या चैतन्यामुळे ‘आश्रम, परिसर, येथील प्राणी आणि साधक चैतन्यमय झाले आहेत’, असे मला वाटत होते.’

२. सन्मान सोहळ्याच्या वेळी आणि त्यापूर्वी आलेल्या अनुभूती

२ अ. कु. मीरा रावत (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)

२ अ १. आश्रमातील वातावरणात जाणवलेले पालट : ‘पू. नीलेशदादा सद्गुरुपदावर विराजमान झाले. त्या दिवशी सकाळपासून सायंकाळपर्यंत मला आश्रमातील वातावरणात पुढील पालट जाणवले.

अ. सकाळी आश्रमातील सर्व दिवे बंद केल्यावरही दिवे चालू असल्यासारखा प्रकाश जाणवत होता. त्या वेळी मला वाटले, ‘आज काहीतरी शुभ घडणार आहे.’

आ. आश्रमातील आणि बाहेरील वातावरण आनंदमय झाले होते. दिवसभर कैलास पर्वताप्रमाणे वातावरण होते आणि थंडावा जाणवत होता.

इ. फुलझाडांना भरपूर फुले आली होती. बारीक पाऊसही पडत होता.

२ अ २. कार्यक्रमाच्या वेळी

अ. माझे मन निर्विचार झाले होते आणि माझी भावजागृती होत होती.

आ. कार्यक्रमाच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई अन्नपूर्णादेवीच्या आणि सद्गुरु नीलेशदादा शिवाच्या रूपात दिसत होते.

इ. ‘पू. दादा सद्गुरुपदावर विराजमान झाले आहेत’, हे घोषित झाल्यानंतर त्यांच्या चारही बाजूंना पांढर्‍या रंगाचे वलय दिसत होते.

सद्गुरु नीलेशदादांसारखे ‘साधनेतील मार्गदर्शक’ दिल्याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते आणि ‘त्यांच्यासारखे गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करून घ्या’, अशी प्रार्थना करते.’

२ आ. कु. जया सिंह (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के)

१. ‘सन्मान सोहळा चालू असतांना सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे सद्गुरु नीलेशदादांची गुणवैशिष्ट्ये सांगत होते. त्या वेळी ‘माझ्या आज्ञाचक्रातून माझ्या शरिरात चैतन्य जात आहे’, असे मला जाणवले.

२. साधक सद्गुरु दादांविषयीचे सूक्ष्म-परीक्षण सांगत असतांना मला तेथे गुलाबी प्रकाश दिसत होता.

३. ‘पू. नीलेशदादा सद्गुरुपदावर विराजमान झाले’, असे घोषित झाले. तेव्हा ‘आश्रमातील वातावरण चैतन्यमय झाले आहे’, असे मी अनुभवले.

४. कार्यक्रमाच्या वेळी सद्गुरु दादांच्या चरणी ध्यान लागून माझे मन एकाग्र झाले आणि ‘सभोवती काय चालले आहे ?’ याचे मला भानच राहिले नाही.’
(सर्व सूत्रांचा दिनांक जुलै २०२२)


साधकांना सर्वतोपरी आधार देतांना त्यांना स्थुलातून आणि सूक्ष्मातून सांभाळणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

१. सद्गुरु नीलेशदादांचा पुष्कळ आधार वाटणे

श्रीमती भाग्यश्री आणेकर

‘मी कोल्हापूर येथून सेवेसाठी वाराणसी आश्रमात आले. तेव्हापासून मला सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा पुष्कळ आधार वाटत आहे. त्यांना बघताक्षणी ‘माझ्या पाठीशी कुणीतरी आहे’, असे मला वाटू लागले. काही घडल्यास ‘ते मला सांभाळणारच आहेत’, असा मला विश्वास वाटतो. त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक प्रकारचा आदरभाव आहे.

२. तत्त्वनिष्ठता

सद्गुरु नीलेशदादा काटेकोरपणे कार्यपद्धत पाळतात. त्यांनी रात्री क्वचित कधी दूध घेतले अथवा एखादे बिस्किट घेतले, तरी ते मला दुसर्‍या दिवशी येऊन सांगतात. त्या वेळी मला आश्चर्य वाटते की, दादा सद्गुरु असूनही किती नम्रपणाने हे सांगत आहेत !

३. अनेक गुणांचा समुच्चय असलेले सद्गुरु नीलेशदादा !

सद्गुरु दादांमध्ये नीटनेटकेपणा, सहजता, पुष्कळ प्रेमभाव, आदरभाव, तत्वनिष्ठता, वाणीत विनम्रता आणि गोडवा आहे. त्यांच्यात तत्परता, निर्णय घेण्याची क्षमता, सेवेची तळमळ आणि सेवेतील परिपूर्णता आहे. त्यांची बुद्धी चौकस आणि दृष्टी चौफेर असते. त्यांची वृत्ती त्यागी असून त्यांच्यात परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव आहे. त्यांची विचारसरणी उच्च प्रतीची आणि जीवनशैली ऋषिसमान आहे.

४. अनुभूती

४ अ. ‘आश्रमातून घरी जावे’, असे वाटून नामजप करत असतांना चारही बाजूंना सद्गुरु नीलेशदादांचे दर्शन होणे आणि सद्गुरु पिंगळेकाका ‘आध्यात्मिक त्रास होत असल्याने साधिकेला घरी पाठवायला नको’, असे त्यांना सांगत असल्याचे जाणवणे : एकदा मला आध्यात्मिक त्रास होत होता. त्यामुळे ‘मी आश्रमातून घरी जावे’, असा विचार करून ध्यानमंदिरात नामजपाला बसले होते. त्या वेळी मला माझ्या चारही बाजूंना ‘सद्गुरु नीलेशदादा बसले आहेत’, असे जाणवले. त्यांचा चेहरा एवढा तेजःपुंज दिसत होता की, ‘जणू सूर्याचे तेजच समोर उभे राहिले आहे’, असे मला वाटले. त्या वेळी मला पुष्कळ राग आला होता आणि सद्गुरु दादा माझ्याकडे आनंदाने पहात हसत होते. काही वेळाने सद्गुरु चारुदत्त पिंगळे तेथे आले. ते सद्गुरु नीलेशदादांना म्हणाले, ‘यांना (साधिकेला) आध्यात्मिक त्रास होत असल्याने आता घरी पाठवायला नको.’ त्या वेळी त्यांचा चेहरा हसरा होता आणि माझी अवस्था मात्र लहान बालिकेसारखी झाली होती. मी घरी जाण्याचा हट्ट धरून बसले असतांना ‘चारही दिशांना सद्गुरु दादा दिसत आहेत आणि माझ्याकडे बघून हसत आहेत’, असे मला जाणवले.

४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात सद्गुरु नीलेशदादांचे दर्शन होणे : कधी कधी माझे मन अस्वस्थ असल्यास मी ध्यानमंदिरात बसते आणि डोळे मिटून परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा करते. एकदा ध्यानमंदिरात असलेल्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रात मला सद्गुरु नीलेशदादांचे दर्शन झाले. ‘सद्गुरु नीलेशदादा म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, असे मला जाणवत होते.

४ इ. एकदा मी ध्यानमंदिरात आरती करत होते. त्या वेळी ‘सद्गुरु नीलेशदादा माझ्या हृदयात आरती करत आहेत’, असे मला दिसत होते.

४ ई. आरती करत असतांना मारुतीच्या चरणांत सद्गुरु दादांचा चेहरा दिसणे : एकदा सायंकाळी ध्यानमंदिरात आरती करत असतांना मारुतीच्या चरणांत मला सद्गुरु नीलेशदादांचा चेहरा दिसत होता. याविषयी मी सद्गुरु दादांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी मारुतीचीच भक्ती करतो !’’

– श्रीमती भाग्यश्री आणेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६५ वर्षे), वाराणसी आश्रम (जुलै २०२२)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.