पी.एफ्.आय. कराटे शिकवण्याच्या नावाखाली आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवत होती !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या आरोपपत्रात उल्लेख !

बंदी घातल्यानंतरही केरळमध्ये पी.एफ्.आय. गुप्तरित्या सक्रीय

भाग्यनगर (तेलंगाणा) – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (पी.एफ्.आय.च्या) आतंकवाद्यांच्या विरोधात येथील न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. यात म्हटले आहे की, अटक करण्यात आलेले ११ जण आतंकवादी केंद्र चालवत होते. येथे ते कराटे शिकवण्याच्या नावाखाली आतंकवादी कारवायांचे प्रशिक्षण देत होते.

१. आरोपपत्रात पुढे म्हटले की, अब्दुल कादिर राज्यातील निजामाबादमध्ये कराटे शिकवण्याच्या नावाखाली आतंकवादी प्रशिक्षण केंद्र चालवत होता. अटक करण्यात आलेले ११ जण या केंद्रामध्ये मुसलमानांची भरती करत होते. येथे देशविरोधी गोष्टी शिकवण्यात येत होत्या. या प्रशिक्षणासाठी पी.एफ्.आय. विदेशातून पैसे घेत होती. या केंद्रामध्ये एखाद्या व्यक्तीचा गळा, पोट आणि डोके यांवर चाकू, लोखंडी सळी आदींद्वारे कशा प्रकारे वार केला पाहिजे, हे शिकवण्यात येत होते. तसेच शिरच्छेद करणे आणि शरिराचे अवयव कापणे यांचेही प्रशिक्षण दिले जात होते. याच प्रमाणे आतंकवादी कृत्य कशा प्रकारे केले जाते, हेही शिकवण्यात येत होते.

२. एन्.आय.ए.ने ३० डिसेंबर या दिवशी अटक केलेला पी.एफ्.आय.चा अधिवक्ता महंमद मुबारक हा मार्शल आर्ट्सचा प्रशिक्षक होता. तो विविध राज्यांमध्ये आक्रमण पथके सिद्ध करत होता.

३. २९ डिसेंबरला एन्.आय.ए.ने केरळमध्ये पी.एफ्.आय.च्या ५६ ठिकाणी धाडी घातल्या होत्या. या संघटनेच्या दुसर्‍या फळीतील नेते आणि कार्यकर्ते यांच्या ठिकाणांवर या धाडी घालण्यात आल्या होत्या. यात काही जण थेट कार्यकर्ते नसले, तरी या संघटनेसाठी काम करत होते.

४. पी.एफ्.आय.वर सप्टेंबर २०२२ मध्येच बंदी घालण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार अद्यापही ही संघटना केरळमध्ये सक्रीय आहे. आतापर्यंत केरळमध्ये ५ वेळा धाडी टाकण्यात आल्या आहेत. बंदी घातल्यानंतरही या संघटनेच्या अंतर्गत हालचाली चालू असल्याचे सांगितले जात आहे.

५. एन्.आय.ए.ने कोच्ची येथील न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार पी.एफ्.आय.च्या आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा या जिहादी आतंकवादी संघटनांच्या आतंकवाद्यांशी संबंध आहेत. पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यानंतरही गुप्तरित्या तिच्या शाखा कार्यरत आहेत.

संपादकीय भूमिका 

एखाद्या संघटनेवर बंदी घालून ती संघटना संपत नाही, तर तिला मुळासकट, तिच्या विचारांसकट नष्ट करण्याची आवश्यकता असते आणि त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक असते, हेच यातून लक्षात येते !