राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उघडणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

श्री. एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – नागरिकांना लाभ व्हावा, यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री कार्यालय उघडण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३० डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा चर्चेच्या प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

एकनाथ शिंदे यांनी मांडलेली सूत्रे –

१. धानपिकासाठी बोनसची मागणी नसतांना आम्ही शेतकर्‍यांना बोनस दिले. शेतकर्‍यांना काय पाहिजे ते देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.

२. तालुका पातळीवर ‘हेलिपॅड’ सिद्ध करणार आहोत. कुणाचा अपघात झाला, तर या ‘हेलिपॅड’ वरून ‘एअर ॲम्बुलन्स’द्वारे उपचारासाठी नेता येईल.

३. मागील सरकारच्या काळात उद्योगाच्या मंत्रीमंडळ उपसमितीची बैठक १८ मास घेण्यात आली नाही. कोणताही कारखाना २-३ मासांत बाहेरच्या राज्यात जात नाही. त्याचे पूर्वनियोजन असते. आधीच्या सरकारकडून प्रतिसाद मिळाला, नाही म्हणून उद्योग अन्य राज्यांत गेले.

४. उद्योगाच्या जागेत कोण टक्केवारी मागत होते ? याची चौकशी होईल. जे कारखाने दिले त्यांनी स्वत: ट्वीट केले आहे. आपला राज्यातील एकही कारखाना अन्यत्र जाऊ नये, अशी आमची भूमिका आहे.

५. आमच्या सरकारचे नागपूरचे पहिले अधिवेशन आहे. नागपूरमधील श्रद्धास्थानांना आम्ही भेटी दिल्या. त्यावरून आम्ही अंधश्रध्दा असल्याची टीका करण्यात आली.

६. बाळासाहेब पितृतुल्य होते. आमच्यासारख्या लाखो शिवसैनिकांना त्यांनी घडवले. मुख्यमंत्री पदाच्या लालसेपोटी ज्यांनी त्यांना कारागृहात टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचे पाप कुणी केले ? यावरून बाळासाहेबांचे वारसदार कोण हे ठरवा ?

७. संतांचा अपमान केला जात आहे. त्यामुळे वारकरी संप्रदाय दुखावला गेला आहे. तुम्ही त्यांनाही भेटला नाहीत. ‘भारत जोडो’ च्या नावाखाली स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा वारंवार अपमान कुणी केला ?

८. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेली अफजलखानाची कबर हटवण्याचे धारिष्ट्य कुणी केले नव्हते, ते आम्ही केले. गड-किल्ले यांच्या सर्वधानासाठी प्राधिकारण स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतला.

९. पंढरपूरच्या विकासाचे काम करतांना आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही. भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात, हीच आमची भावना आहे.

१०. राज्यात छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला. चंद्रपूर येथे दीक्षाभूमी करण्यात येईल.

११. महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक तो पालट करण्यात येतील.

महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी ‘टास्क’ देण्यात आले होते !

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यासाठी ‘टास्क’ देण्यात आले होते. त्या अधिकार्‍यांचे नाव मी घेत नाही. माझ्यासह काही लोकांच्या चौकशी लावण्याचे पाप करण्यात आले. ज्यांचा गृहमंत्री कारागृहात गेला त्यांनी आम्हाला कायदा-सुव्यवस्था यांचा प्रश्न विचारत आहे. आमचे सरकार सर्व कार्यकाळ पूर्ण करेल.

२६ डिसेंबर दिवस ‘महाराष्ट्रातही वीरबालदिन साजरा करण्याचा निर्णय !

गुरुगोविंद सिंह यांचे पुत्र बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह या दोघांना औरंगजेबाने भिंतीमध्ये जिवंत चिरडले. त्यांनी राष्ट्र आणि धर्म यांसाठी केलेल्या हौतात्म्यानिमित्त केंद्रशासनाने ‘२६ डिसेंबर’ हा वीरबालदिन घोषित केला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही ‘वीर बालदिन साजरा’ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.