केरळमधील प्रसिद्ध गुरुवायूर मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या ठेवी ! – माहितीच्या अधिकारात तपशील उघड

त्रिसूर (केरळ) – येथील गुरुवायूरमधील प्रसिद्ध श्रीकृष्ण मंदिराकडे १ सहस्र ७३७ कोटी रुपयांच्या बँक ठेवी आणि २७१.०५ एकर भूमी आहे, ‘माहिती अधिकारा’त मागवलेल्या उत्तरात ही माहिती मिळाली आहे. मूळचे गुरुवायूरचे रहिवासी असलेले आणि ‘प्रॉपर चॅनल’ या संस्थेचे अध्यक्ष एम्.के. हरिदास यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागितली होती. भूमीचे मूल्य निश्‍चित करणे शेष आहे.

१. भक्तांनी अर्पण केलेले सोने, चांदी आणि मौल्यवान खडे यांचा प्रचंड संग्रह मंदिराकडे असला, तरी सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर व्यवस्थापनाने तपशील अन् त्याचे मूल्य सांगण्यास नकार दिला.

२. मंदिर व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार वर्ष २०१६ मध्ये राज्यात माकप आघाडीचे पिनाराई विजयन् सरकार सत्तेत आल्यानंतर आजपर्यंत मंदिराला कोणतेही आर्थिक साहाय्य मिळालेले नाही. या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही वर्ष २०१८-१९ मध्ये आलेल्या पुरानंतर ‘मुख्यमंत्री आपत्कालीन साहाय्य निधी’मध्ये योगदान दिलेले १० कोटी रुपये मंदिराला अद्याप परत मिळालेले नाहीत. (न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करणार्‍या सरकारच्या विरोधात न्यायालयाने कठोर कारवाई करावी, असेच भक्तांना वाटते ! – संपादक)

मंदिर व्यवस्थापन निष्क्रीय ! – एम्.के. हरिदास यांचा आरोप

एम्.के. हरिदास हे या मंदिरात येणारे भक्त आहेत. ते म्हणाले की, व्यवस्थापनाचे मंदिराच्या विकासाकडे सततचे दुर्लक्ष झाले आहे. त्यांच्या निष्क्रियतेमुळे माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मिळवणे भाग पाडले. एवढ्या बँक ठेवी आणि इतर मालमत्ता असूनही व्यवस्थापन मंदिर आणि भक्त यांच्यासाठी काहीही करत नाही. व्यवस्थापन मंदिराजवळ एक रुग्णालयही चालवत आहे; परंतु त्याची स्थितीही दयनीय आहे. प्रसाद वाटप आणि देवस्थानातील दैनंदिन विधी यांविषयीही निष्क्रियता आहे. (ही स्थिती पालटण्यासाठी मंदिरांचे सरकारीकरण रहित करून मंदिर भक्तांच्या नियंत्रणात देणे, हाच एकमेव उपाय आहे ! – संपादक)