मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हिराबेन मोदी यांना श्रद्धांजली !

श्रीमती हिराबेन मोदी

नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत अमूल्य वाटा असणार्‍या त्यांच्या मातोश्री श्रीमती हिराबेन मोदी यांचे निधन अत्यंत दुःखद आहे, अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘श्रीमती हिराबेन यांच्यासारख्या धर्मानुरागी आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वाचे निधन ही समाजाची हानी आहे. नियतीचक्रामुळे आज श्रीमती मोदी यांची इहलोकीची यात्रा संपली. ही गोष्ट पुत्र म्हणून पंतप्रधान मोदी यांच्यासाठी एक आघात आहे. आईचा वियोग ही दुःखाची परिसीमा असते. पंतप्रधान मोदी यांना हे दुःख सहन करण्याचे बळ मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. मातृतुल्य श्रीमती हिराबेन मोदी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !’ अशी शोकभावनाही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली आहे.