सप्तपदी

सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करुन ७ दिवस विवाह संस्कारातील एक महत्त्वाचे अंग असलेल्या ‘सप्तपदी’विषयी थोडी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहोत. सांप्रत काळात कौंटुबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे. यामुळे नवदांपत्य आणि अविवाहित यांना थोडे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही लेखनमाला…

लेखाचा भाग १ पहाण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/640348.html

भाग : २

वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी

१. ‘पतीची सहचारिणी बनून त्याला शक्ती आणि धैर्य यांची ‘ऊर्जा’ देणारी हो’, याची जाणीव करून देणारे सप्तपदीतील दुसरे पाऊल !

‘सर्व वेदवेत्या गुरुजनांना वंदन करून ‘सप्तपदी’ या लेखमालेतील दुसरे पुष्प गुंफत आहे.

प्रकृति आणि पुरुष या दोघांच्या संयोगाने हे विश्व निर्माण झाले. शिवशक्ति ही त्याचेच रूप आहे. विवाह संस्कार हेही शिवशक्तीचे मिलन आहे. विवाह हा संस्कार केवळ ‘वासनाशमन करण्यासाठी नाही’, हे सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या गोष्टीचा चुकीचा हेतू डोक्यात शिरल्यानंतर होणारी कृती ही ‘अविचारीच’ असते. उदा. एखाद्या व्यक्तीकडे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र असतांना त्या व्यक्तीला वारंवार या उद्देशाची जाणीव करून द्यावी लागते. त्याप्रमाणेच विवाहाविषयीही नवदांपत्यांना नीट समजावून देणे आवश्यक आहे. (कामभावना हा एक महत्त्वाचा भाग असला, तरी केवळ कामविषयाचे शमन, म्हणजेच विवाह नव्हे.) ‘विवाहानंतर घरातील सर्व दायित्व नवदांपत्याने स्वीकारणे आणि सर्वांना समवेत घेवून मार्गक्रमण करणे’, हाच गृहस्थाश्रम आहे. विवाह हा ‘अद्वैताचा’ सोहळा आहे. द्वैताकडून (वधू आणि वर या दोन भिन्नांना एकत्र आणणे, शिवशक्तीचे मीलन घडवणे अन् या द्वैतांचे अभिन्न अद्वैत करणे, हेच विवाह संस्काराचे महत्त्व आहे.) नेमके आज हेच होतांना दिसत नाही आहे. त्यामुळे ‘मला ‘स्पेस’ (मोकळीक) हवी’, या नावाखाली दायित्व झटकणे चालू आहे. या दायित्वाची जाणीव ‘सप्तपदी’ करून देते. २९ डिसेंबर या दिवशी आपण पहिल्या पावलाचा अर्थ पाहिला. आज दुसरा मंत्र आणि दुसरे पाऊल कोणते दायित्व देते ? हे सांगतो.

सप्तपदी

२. सप्तपदीतील दुसरा मंत्र

‘ॐ ऊर्जे द्विपदी भव ।’ म्हणजे ‘तू माझ्यासमवेत दुसरे पाऊल चाल, तू मला बल देणारी हो’

वधूकडे वराने केलेली अपेक्षा ही फार महत्त्वाची आहे. ‘तू मला ऊर्जा देणारी हो.’ ऊर्जा म्हणजे शक्तीची प्रेरणा. अनेकदा ‘आर्थिक, कौटुंबिक, व्यावसायिक आणि नोकरीच्या ठिकाणी काही संकटे येत असतात. काही वेळा मानसिक दडपण येते. अशा वेळी आपल्या पतीला मानसिक आणि बौद्धिक धैर्य देऊन त्याला संकटाशी लढण्यासाठी प्रेरणा देणारी हो’, अशी कामना सप्तपदीत दुसर्‍या पावलाच्या ठिकाणी केली आहे. भारतवर्षात अशी अनेक उदाहरणे आहेत, ज्यात पत्नीने तिच्या पतीला वेळप्रसंगी योग्य उपदेश केला आहे. संत तुलसीदास हे पत्नीच्या उपदेशाने भगवद्भक्तीकडे वळले. ही कथा सर्वश्रुत आहे.

कालीदासाला त्याच्या पत्नीने केलेल्या तीक्ष्ण उपदेशामुळेच ते महाकवी कालीदास झाले. दशरथ राजांना तर कैकयीने युद्धभूमीवर साहाय्य केले होते. अनेक उद्योगपती हे गरिबीतून वर येत श्रीमंत झाले आहेत. त्यांना शक्ती आणि धैर्य यांची ‘ऊर्जा’ देण्यामागे त्यांच्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. अशी अनेक उदाहरणे येतील. मनुस्मृतिमध्ये एक उत्तम श्लोक दिला आहे.

संतुष्टो भार्यया भर्ता भत्र्रा भार्या तथैव च ।
यस्मिन्नेव कुले नित्यं कल्याणं तत्र वै ध्रुवम् ।।

– मनुस्मृति, अध्याय ३, श्लोक ६०

अर्थ : ज्या कुळात पती पत्नीला संतुष्ट ठेवतो आणि पत्नी पतीला संतुष्ट ठेवते, त्या कुळाचे (घराण्याचे) नेहमी कल्याणच होते.

आपल्या संस्कृतीत नेहमी ‘सकारात्मक’ विचारसरणी आपण अंगिकारावी, असा अलिखित नियम आहे. उदा. आपण ‘घरात बटाटे संपले किंवा तांदूळ संपले’, असे म्हणत नाही, तर ‘बटाटे किंवा तांदूळ आणायला हवे’, असे म्हणतो. बांगडीला तडा गेला, तर ‘बांगडी फुटली’ असे न म्हणता ‘बांगड्या वाढवल्या’, असे म्हणतो. म्हणजेच नेहमी सकारात्मक ऊर्जा ही घरात असली की, कोणतेही संकट आले, तरी त्यावर मात करता येते. त्यामुळे धैर्य न सोडता पतीला योग्य मार्गदर्शन आणि सन्मार्गावर चालण्यासाठी वेळप्रसंगी कठोर उपदेश करणे, तसेच पतीला ‘ऊर्जा’ देणे, हा दुसर्‍या पदाचा हितोपदेश आहे. पतीनेही मला ‘उपदेश करणारी कोण शहाणी ?’, असे अकारण प्रश्न विचारू नयेत. तुलसीदास आणि कालीदास यांचे चरित्र वाचावे. मगच पत्नीचे महत्त्व आणि हितोपदेश यांचे गांभीर्य कळेल. दुर्गासप्तशतीत ‘देवांचे सैन्य पराजित होत आहे, हे पाहून देवतांच्या पत्नींनी असुरांशी युद्ध केले. (वाराहि, माहेश्वरी, वैष्णवी, कौबेरी अशा अनेक देवपत्नी रणागंणात उतरल्या आणि युद्धात जय प्राप्त केला होता.)’ वेळप्रसंगी स्वत: सर्व अलंकार गहाण टाकून (मंगळसूत्रासह) नवर्‍याला आजारपणातून वाचवलेल्या महिलांची अनेक उदारणे समोर आहेत. डॉ. बाबा आमटे यांसारख्या कर्मयोग्याला पत्नीचीच साथ मिळाल्याने आज ‘आनंदवन’सारखी संस्था उभी आहे. तेव्हा या ऊर्जेला न्यून न लेखता आपणही ही ऊर्जा प्राप्त करूया, ही कामना !’

– वेदमूर्ती भूषण दिगंबर जोशी, वेंगुर्ला, सिंधुदुर्ग (६.१२.२०२२)