चीनचे अमेरिका आणि इंग्लंड या देशांशी मोठ्या प्रमाणात छुपे युद्ध चालू आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या राजकीय, प्रशासकीय आणि प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात चीनने केलेल्या अतिक्रमणाचा विचार केल्यास अंगावर शहारे येतील.
१. चीनमध्ये सत्ताधार्यांच्या विरोधात असंतोष !
‘९ डिसेंबर २०२२ या दिवशी चीनच्या ‘पीपल्स लिबरेशन आर्मी’ने (‘पी.एल्.ए.’ने) भारताच्या तवांग भागातील सीमेत घुसखोरी करून सीमेवरील भाग कह्यात घेण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय सैन्याने त्याला सडेतोड उत्तर दिले. चीनच्या सैन्याने केलेल्या या घुसखोरीला चीनमधील ‘चायनीज कम्युनिस्ट पक्षा’च्या नेत्यांनी हिरवा झेंडा दाखवला असावा. चीनने अचानकपणे केलेल्या या आक्रमणामागे अनेक कारणे असतील; परंतु यांपैकी सामाजिक आणि राजकीय दृष्टीने दोन कारणे महत्त्वाची वाटतात. एक म्हणजे ‘चायनीज कम्युनिस्ट पक्षा’त असलेला राजकीय असंतोष आणि दुसरे म्हणजे चीनमधील कोरोनाच्या कारणावरून लादलेल्या भयानक निर्बंधांविरुद्ध सर्वसामान्य नागरिकांनी केलेला सामाजिक उठाव. हा उठाव एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे की, चीनमधील क्रूर राजवटीला हे निर्बंध उठवणे भाग पडले. चीनमध्ये चाललेला सामाजिक आणि राजकीय गोंधळ अन् आर्थिक वाढीचे घटते प्रमाण या पार्श्वभूमीवर ‘चायनीज कम्युनिस्ट पक्षा’ला देशांतर्गत समस्यांपासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याची आवश्यकता भासली असावी. तवांगमध्ये चीनने केलेली घुसखोरी हे त्यासाठी असावे. हे प्रथमच होत आहे असे नाही. २ वर्षांपूर्वी गलवान भागात अशाच प्रकारचा प्रसंग घडलेला आहे.
२. चीनची मध्यवर्ती राज्य विकृती !
सध्या चीन हा सर्व जगासाठी डोकेदुखी आणि एक आव्हान बनला आहे. चीनच्या आक्रमक धोरणाविषयी समजून घ्यायचे असेल, तर त्याचा इतिहास समजून घेणे योग्य ठरेल. चीनच्या अधिकृत मंदारीन भाषेत चीनला ‘झोंग्गुआ’ असे नाव असून ते त्यांच्या चलनी नोटांवर छापलेले आहे.‘झोंग्गुआ’ याचा अर्थ आहे मध्यवर्ती राज्य. प्राचीन काळापासून चीन स्वतःला ‘सुधारित जगाचा केंद्रबिंदु आपण आहोत आणि इतर देश या शाखा असून ते खालच्या दर्जाचे आहेत’, असे समजतो. गेल्या काही वर्षांत चीनच्या या समजुतीचे प्रमाण आणखी तीव्र झाले आहे. त्यामुळे चीनचे भारतासह अन्य देशांशी असलेले संबंध मित्रत्वाचे असणे शक्य नाही.
३. चीनची धूर्त युद्धनीती !
पारंपरिक युद्ध म्हटल्यावर मोठ्या प्रमाणात झालेले स्फोट, हिंसाचार आणि रक्तपात, असे चित्र आपल्यासमोर उभे रहाते; परंतु चीनची युद्धाची नीती वेगळी आहे. चीन ‘युद्ध आणि शांततेचा काळ हा वेगळा आहे’, असे मानतच नाही. ‘अपेक्षित ध्येय साध्य होईपर्यंत शत्रूशी सतत लढणे’, ही चीनची नीती आहे. या लढ्यामध्ये हिंसाचार घडवून आणणे, हा शेवटचा टप्पा आहे. चीनच्या या रणनीतीला ‘छुपे युद्ध’ असे म्हटले, तर चुकीचे ठरणार नाही. राजकीय डावपेच आणि सुरक्षा यांचा अभ्यास करणारे तज्ञ काय म्हणतात ? हे जाणून घेतल्यास चीनची छुपी रणनीती लक्षात येईल. वर्ष १९४० मध्ये शीतयुद्धाच्या वेळी अमेरिकेतील राजकीय तज्ञ आणि मुत्सद्दी जॉर्ज केनन यांनी ‘रशियाला कसे हाताळावे ?’, याविषयीचा सविस्तर आराखडा सिद्ध केला होता. त्यांनी ‘पर्यायी युद्ध, म्हणजे छेडछाड किंवा हिंसाचार न करता केलेले राजकीय युद्ध’, असा उल्लेख केला होता. आजच्या अणूऊर्जेच्या जगात राजकीय युद्ध महत्त्वाचे आहे; कारण प्रत्यक्ष युद्धात सर्वनाशाची बीजे असतात. राजकीय युद्धात राजकीय, प्रशासकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, हेरगिरी आणि प्रसिद्धीमाध्यमे या सर्व क्षेत्रांमध्ये प्रदीर्घ लढा देण्याचा समावेश आहे. चीन या प्रकारच्या राजकीय युद्धातील प्रथम क्रमांकाचा खेळाडू आहे. या राजकीय युद्धामध्ये चीनला काय साध्य करायचे आहे ? हे प्रिन्सटन विश्वविद्यालयाचे प्राध्यापक एरॉन फ्राईडबर्ग यांनी संक्षिप्तपणे सांगितले आहे. त्यांनी म्हटले आहे, ‘‘पाश्चिमात्य राष्ट्रांनी अधिकारशाहीचे राजकारण वापरून केलेली बाजारातील आर्थिक वाढ आणि विकास यांसाठी चीन स्वतःला पर्यायी समजत आहे.’’ वर्ष १९४० मध्ये माओ झेडाँग यांनी म्हटले होते की, चीनचा कम्युनिस्ट पक्ष हा नेहमीच सर्वाेच्च पदावर राहील आणि ‘रेड आर्मी’ अन् संयुक्त आघाडी ही या पक्षाची जादूची शस्त्रे असतील. ‘रेड आर्मी’ ही शारीरिक स्तरावरील, तर संयुक्त आघाडी ही राजकीय स्तरावरील युद्ध करील. ही दोन्ही शस्त्रे चीनचे डावपेच पुढे नेण्यामध्ये एकमेकांना पूरक ठरतील. आजही चीनचे ‘युनायटेड फ्रंट वर्क्स डिपार्टमेंट’ हे चीनचा प्रभाव जगावर टाकण्याचा आणि चीनला जगातील बलवान राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे, हे काही उदाहरणांवरून लक्षात येईल. तथापि येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, शीतयुद्धाच्या वेळी रशियाने सामाजिक विचारसरणीत स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी अथक प्रयत्न केले. रशियाप्रमाणे असे प्रयत्न न करता चीन पैसे देऊन लोकांना विकत घेत आहे. ही पद्धत वापरून चीनने केलेल्या प्रयत्नांची काही उदाहरणे खालीलप्रमाणे आहेत.
अ. १४ जानेवारी २०२२ या दिवशी ‘रॉयटर्स’ने बातमी प्रसिद्ध केली होती की, ब्रिटीश गुप्तहेर खात्याच्या ‘एम् १५’ या ‘एजन्सी’ने ब्रिटीश खासदारांना सुरक्षिततेच्या धोक्याविषयी चेतावणी दिली. या चेतावणीमध्ये म्हटले होते की, मूळ चीन देशातील अधिवक्त्या ख्रिस्तिन ली चीनचा ब्रिटनमधील प्रभाव वाढवण्यासाठी खासदारांना लाच देत आहेत. ‘एम् १५’ या ‘एजन्सी’ने केलेल्या अन्वेषणानंतर ख्रिस्तिन ली हिने ब्रिटीश खासदारांना तिला हवी असलेली कृती करण्यासाठी लाखो पाऊंड्स व्यय (खर्च) केले. चीनला लाभ मिळण्याविषयीचे धोरण आणण्यासाठी प्रयत्न करणे, हे तिचे ध्येय होते. तिच्या कृतीमध्ये ब्रिटनच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाल्याने गुप्तहेर खात्याने ब्रिटीश सरकारला चेतावणी दिली.
आ. अमेरिकेतील ‘न्यूयॉर्क पोस्ट’ या वर्तमानपत्रामध्ये ११ मे २०२१ मध्ये दिलेल्या एका लेखामध्ये चीनने अमेरिकेमध्ये कायदे करणार्यांवर स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी वर्ष २०१६ मध्ये १ कोटी डॉलर्स (८० कोटी रुपये) आणि वर्ष २०२१ मध्ये ६ कोटी ४० लाख डॉलर्स (५१२ कोटी रुपये) व्यय (खर्च) केले.
४. अमेरिकेतील विश्वविद्यालयांवर चीनचा प्रभाव !
चीन अमेरिकेला सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी समजतो. अमेरिकेतील सध्याच्या आणि पुढच्या पिढीवर स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी चीन अमेरिकेतील विश्वविद्यालये, विद्वान मंडळी आणि विद्यार्थी यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसे व्यय करतो. वर्ष २०१८ मध्ये ‘हडसन इन्स्टिट्यूट’मधील जोनास पॅरेलो प्लेसनेर आणि बिलींदा ली यांनी लिहिले आहे, ‘‘केवळ २०१७ या वर्षी चीनने अमेरिकेतील अनेक विश्वविद्यालयांना एकूण ५ कोटी ६० लाख डॉलर्स (४४८ कोटी रुपये) देणगी स्वरूपात दिले. यांपैकी स्टॅनफोर्ड आणि हॉवर्ड या विश्वविद्यालयांना मागच्या ६ वर्षांत अनुक्रमे ३ कोटी २२ लाख २४ सहस्र ८२८ डॉलर्स (२५७ कोटी ७९ लाख ८६ सहस्र २४० रुपये) अन् ५ कोटी ५० लाख ६५ सहस्र २६१ डॉलर्स (४४० कोटी ५२ लाख २० सहस्र ८८० रुपये) देणगी स्वरूपात देण्यात आले.’’ डिसेंबर २०२१ मध्ये हॉवर्ड विश्वविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागाचा माजी प्रमुख प्रोफेसर चार्लस लायबर यांना त्यांच्या संशोधनासाठी चीनकडून लाखो डॉलर्स स्वीकारल्याने अमेरिकेच्या न्यायालयाने दोषी ठरवले. त्यांनी चीनकडून स्वीकारलेले पैसे त्याच्या एकूण मिळकतीमध्ये दाखवले नव्हते. चीनने त्याच्या शेजारी असलेल्या नेपाळमध्ये मंदारीन भाषेचा प्रसार करण्यासाठी नेपाळमधील शाळांमध्ये ही भाषा शिकवण्याविषयी आराखडा सिद्ध करून ते शिकवण्यासाठी शिक्षक नियुक्त करून त्यांना वेतन देऊ केले. नेपाळमधील संस्कृतीवर चिनी संस्कृतीचा प्रभाव पाडण्यासाठी चीनचा हा प्रयत्न होता, जेणेकरून पुढील पिढीवर त्याचा वचक राहील.
५. अमेरिकी प्रसिद्धीमाध्यमांत चीनकडून विज्ञापने !
राजकीय युद्धामध्ये स्वतःचा प्रभाव पाडणे महत्त्वाचे असते आणि यामध्ये प्रसिद्धीमाध्यमांची भूमिका सर्वाधिक असते. चीनला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे जगातील प्रसिद्धीमाध्यमांवर स्वतःचा प्रभाव पाडण्यासाठी चीन मोठ्या प्रमाणात रक्कम व्यय करतो. चीनचे सरकार ‘चायना डेली’ हे वर्तमानपत्र प्रसिद्ध करते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमेरिकेमध्ये याची स्थानिक आवृत्ती प्रसिद्ध केली जाते, जिच्यामधून चीनच्या धोरणांना प्रसिद्धी दिली जाते. २६ जून २०२० या दिवशी ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’ या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले की, नोव्हेंबर २०१६ ते एप्रिल २०२० या कालावधीत ‘चायना डेली’ या वृत्तपत्राने अमेरिकेतील प्रसारमाध्यमांवर १ कोटी ९० लाख डॉलर्स (१५२ कोटी रुपये) व्यय केले. अमेरिकेतील वर्तमानपत्रांमधून ‘चायना वॉच’ या नावाने ४ पानी पुरवणी प्रसिद्ध केली. स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये मोठी विज्ञापने देऊन चीनच्या हुकूमशाही सरकारचा प्रभाव अमेरिकेतील समाजामध्ये वाढवणे, हा चीनचा उद्देश आहे.
६. अनेक भारतीय वृत्तपत्रांनाही चीनकडून विज्ञापने !
या पार्श्वभूमीवर चीन भारतातील वृत्तपत्रांच्या संदर्भात काय करत आहे ? हे जाणून घेणे समर्पक ठरेल. उत्तर आणि पश्चिम भारतात अग्रेसर असलेल्या ‘इंडियन एक्सप्रेस’ या वृत्तपत्रात २९ डिसेंबर २०२१ या दिवशी ‘चायना वॉच‘ या नावाने ४ पानांची चीनचे विज्ञापन करणारी पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली होती. ३ नोव्हेंबर २०१७ या दिवशी उत्तरभारत आणि देहली येथे प्रसिद्ध केल्या जाणार्या ‘हिंदुस्थान टाईम्स’ या अन्य एका इंग्रजी वृत्तपत्रामध्ये ३० ऑक्टोबर २०२० या दिवशी तशाच प्रकारची ४ पानांची पुरवणी प्रसिद्ध करण्यात आली होती. दक्षिण भारतातील ‘द हिंदू’ या प्रसिद्ध वर्तमानपत्रात २८ सप्टेंबर २०१८, २ एप्रिल २०२०, १ ऑक्टोबर २०२० आणि १ जुलै २०२१ असे ४ दिवस वृत्तपत्रात एका पूर्ण पानावर चीनचे विज्ञापन प्रसिद्ध करण्यात आले होते.
चीन भारतातील अरुणाचल प्रदेशवर त्याची मालकी असल्याचा दावा करत देशात अतिक्रमण करत आहे. पाकिस्तान मसूद अझर यांसारख्या आतंकवाद्यांना आश्रय देत आहे. चीनचे भारताविषयीचे धोरण नेहमीच विरोधात राहिले आहे. जून २०२० मध्ये भारतातील गलवान खोर्यात चीनने अतिक्रमण केल्यामुळे भारतात चीनविरोधी लाट उसळली असतांना त्यानंतर १०० दिवसांनी, म्हणजे ऑक्टोबर २०२० मध्ये भारतातील काही वृत्तपत्रांनी चीनला प्रसिद्धी देणारी पूर्ण पान विज्ञापने प्रकाशित केली ! केवळ पैशांच्या लोभापायी ही वृत्तपत्रे चीनसमोर वाकली. त्यामुळे भारताचा शत्रू असलेल्या चीनचे विज्ञापन केले; म्हणून या वृत्तपत्राचे वाचक आणि अन्य विज्ञापनदाते यांनी असहकार पुकारल्यास त्यांना दोष दिला जाऊ नये.
७. चीनच्या छुप्या युद्धाचा प्रतिकार करा !
वास्तविक पहाता चीनने भारतावर छुपे युद्ध लादलेले असून ते अनेक घटनांमधून स्पष्ट होत आहे. चीनने भारतातील सर्व लोकांविरुद्ध राजकीय युद्ध चालू केले आहे. ‘या युद्धाला सामोरे जाऊन त्याचा प्रतिकार कसा करावा ?’, याविषयी उपाययोजना काढण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारतातील लोकांनी सिद्धता केली पाहिजे. या धोक्याविषयी सरकार आणि प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली पाहिजे. जर धोका काय आहे ते कळले, तरच त्यावर मात करता येईल.’
लेखक : श्री. मिलिंद महाजन
(साभार : साप्ताहिक ‘ऑर्गनायझर’, १९.१२.२०२२)
चीनच्या छुप्या धोक्याविषयी सरकार आणि प्रशासन यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करणे अपरिहार्य ! |