परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे त्रिकालदर्शीत्व !
१. पित्ताचा पुष्कळ त्रास होत असतांना ‘शून्य’ असा नामजप करण्यास आरंभ केल्यावर ‘अंतर्मनात ‘राम राम असा नामजप होत आहे’, असे लक्षात येणे
‘२७.१२.२०२१ या दिवशी रात्री १०.३० ते ११ या वेळेत मला पित्ताचा पुष्कळ त्रास होत होता. पित्तामुळे होणार्या असह्य वेदनांनी मी विव्हळत होते. त्या वेळी एक साधिका मला म्हणाली, ‘‘तू छातीवर हात ठेवून ‘शून्य’ असा नामजप कर.’’ त्यानुसार मी ‘शून्य’ असा नामजप करण्यास आरंभ केला. त्या वेळी ‘माझा अंतर्मनातून ‘राम, राम’, असा नामजप होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधिकेला काही वर्षांपूर्वी ‘‘तुझा नामजप अंतर्मनातून चालू आहे’’, असे सांगणे आणि आता साधिका तसे अनुभवत असणे
दुसर्या दिवशी सकाळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची आठवण झाली. वर्ष २००३ – २००४ या कालावधीत मी रुग्णाईत असतांना एकदा परात्पर गुरुदेव मला भेटण्यासाठी आले होते. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना ‘‘मला साधना करायची आहे’’, असे सांगितले होते. तेव्हा प.पू. गुरुदेव मला म्हणाले होते, ‘‘तुझा नामजप अंतर्मनातून चालू आहे. आता तुला काय साधना करायची आहे ?’’ त्यांचे बोलणे ऐकून मी स्तब्ध झाले होते. प.पू. गुरुदेव खोलीतून बाहेर गेल्यावर माझ्या मनात विचार आले, ‘माझा आतून नामजप कुठे चालू आहे ? परात्पर गुरुदेव असे कसे म्हणाले ? मला तर काहीच कळत नाही.’
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची सर्वज्ञता !
परात्पर गुरुदेवांचे ते बोल सत्य होत असल्याचे आता मी अनुभवत आहे. ‘गुरु त्रिकालदर्शी असतात. ते भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ जाणतात’, हे माझ्या लक्षात आले. ‘गुरु शिष्याची साधना चालू आहे कि नाही ?’, हेही जाणतात. ‘परात्पर गुरुदेवांनी काही वर्षांपूर्वी माझ्याविषयी काढलेले उद्गार आता सत्यात उतरत आहे’, याची मी प्रचीती घेत आहे.’
– सुश्री (कु.) महानंदा पाटील (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ५४ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१.३.२०२२)