विदेशातून चालणारा ऑनलाईन जुगार रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक पालट करणार ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री

नागपूर, २८ डिसेंबर (वार्ता.) – भारतात चालत असलेल्या काही ऑनलाईन लॉटरीला अमेरिका, नेपाळ आदी देशांतून ‘होस्टिंग’ (ऑनलाईन नियंत्रण ठेवणे) केले जात आहे. विदेशातून नियंत्रित करण्यात येत असल्यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या भारतीय दंड विधान, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा आणि लॉटरी प्रतिबंधक कायदा या कायद्यांद्वारे कारवाईला मर्यादा येत आहेत. कायद्यात आवश्यक ते पालट करून अवैधपणे चालणार्‍या ऑनलाईन जुगारावर प्रतिबंध करण्यात येईल, अशी ग्वाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. आमदार दिलीप लांडे यांनी याविषयीची लक्षवेधी सूचना सभागृहात उपस्थित केली होती.

‘यापूर्वीच्या कायद्याच्या वेळी ‘डिजिटल’ यंत्रणा नव्हती. त्यामुळे यापूर्वीच्या कायद्यांद्वारे कारवाईला मर्यादा येत आहेत. विदेशातून चालणारे ऑनलाईन जुगार या कायद्याच्या कक्षेत आणता येत नाहीत. त्यामुळे त्यांवर कारवाईचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे कायद्यात आवश्यक ते पालट करून ऑनलाईन जुगार रोखण्याचा आमचा प्रयत्न आहे’, असे गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले.