भारतीय सैन्याच्या अपूर्व पराक्रमाची विजयगाथा !

पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान (सध्याचा पाकिस्तान) यांच्यातील संघर्षात हिंदुस्थानने पूर्व पाकिस्तानचा (आताचा बांगलादेश) पक्ष घेतला. १६ डिसेंबर १९७१ या दिवशी पश्चिम पाकिस्तानशी झालेल्या युद्धात हिंदुस्थानने त्याचा दारुण पराभव केला आणि विजयदिन साजरा केला. या युद्धात शत्रूच्या ९३ सहस्र सैनिकांना आपण युद्धबंदी बनवले. त्याची विजयगाथा येथे देत आहोत.

१. पाकच्या ‘गाझी’ पाणबुडीला लक्ष्य करण्यासाठी भारतीय नौसेनेने सापळा रचून अत्यंत सावधगिरीने योजना आखणे

पाकिस्तानकडे त्या वेळी ‘गाझी’ नावाची लांबपल्ल्याची एकच पाणबुडी होती. या पाणबुडीचे ठिकाण आपल्या विशाखापट्टणम् बंदरापासून काही अंतरावरच होते.  विशाखापट्टणमच्या बंदरात आत येण्यासाठी किंवा बंदरातून बाहेर जाण्यासाठी आपल्या आरमारदलाला (नौसेनेला) एकच अरुंद आणि अवघड असा जलमार्ग होता. हाच जलमार्ग लष्करीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. आपल्या शत्रूची पाणबुडी सुरुंग पेरून आपण रोखू शकत होतो. त्याचाच विचार करून आपण पाकिस्तानच्या गाझी पाणबुडीसाठी सापळा रचला.

आरमारच्या अधिकार्‍यांनी सैनिकांसमोर विजयाचे ध्येय ठेवले. त्यांना प्रोत्साहन दिले. विशाखापट्टणम् बंदरात असलेल्या जहाजांना लांब ठेवण्यात आले. ही जहाजे पाणबुडीच्या टप्प्याबाहेर रहातील, याचीही काळजी घेण्यात आली. प्रश्न एकच होता तो म्हणजे तळापासून लांब असलेल्या आपल्या जहाजांना रसद (अन्नधान्य आणि लढाईसाठी लागणार्‍या अन्य सामुग्री) कशी पोचवायची ? रसद पोचवणार्‍या बोटींच्या हालचाली शत्रूच्या दृष्टीला पडू द्यायच्या नाहीत, ही दक्षता घेणे क्रमप्राप्त होते. आपल्याकडे त्या वेळी एक विमान वाहून नेणारी नौका होती. तिचे संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे होते. म्हणूनच अत्यंत सावधगिरीने योजना आखण्यात आली.

श्री. दुर्गेश परुळकर

२. गाझी पाणबुडी भारतीय आरमाराच्या टप्प्यात येताच त्यांनी तिला जलसमाधी देणे

भारतीय आरमाराचा चमू अंदमानच्या द्वीप समूहात गुप्त ठिकाणी नेण्यात आला. हे ठिकाण हिंदुस्थानच्या मूळ भूमीपासून साधारणपणे १२००-१३०० किलोमीटर अंतरावर होते. आपल्या आरमारदलाने आक्रमण करण्याचा आदेश देईपर्यंत तो चमू तिथेच थांबणार होता. शत्रूची गाझी पाणबुडी विशाखापट्टणम् बंदराचा मार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यासाठी पुढे आली. तिच्या पाळतीवर आपली ‘विनाशक’ पाणबुडी नौका होतीच. या हालचाली चालू असतांना आपले आरमार अत्यंत सुखरूप होते. आपल्या वीर सैनिकांनी पाकच्या ‘गाझी’ पाणबुडीला जलसमाधी दिली.

३. भारतीय आरमाराने सागरी नाकेबंदी करणे आणि स्थलसेनेने पूर्व पाकिस्तान कह्यात घेऊन ९३ सहस्र पाक सैनिकांना युद्धबंदी बनवणे

आपल्या आरमाराने चित्तगाव आणि कॉक्सबझार या पूर्व पाकिस्तानच्या बंदरांवर आक्रमण करून ती बंदरे नष्ट केली. पूर्व पाकिस्तानची संपूर्ण सागरी नाकेबंदी करण्यात आपल्याला यश मिळाले. आपल्या आरमाराने सागरी मार्ग रोखल्यामुळे स्थलसेनेने चपळाई करून पूर्व पाकिस्तान कह्यात घेतले. त्या वेळी ९३ सहस्र पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी बनवण्यात आले. आपल्या सैनिकांनी प्राणपणाने लढून शत्रूवर मात केली.

४. पूर्व पाकिस्तान हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असल्याने ‘अखंड हिंदुस्थान’ करता येणे शक्य असूनही ते न केले जाणे

त्याच वेळी आपल्या राजकीय नेतृत्वाने ‘पाकिस्तानने युद्धकैदी बनवलेल्या आपल्या ५५ सैनिकांची सुटका आणि पाकव्याप्त काश्मीर हिंदुस्थानच्या कह्यात दिल्यावर नंतरच ९३ सहस्र पाक सैनिकांची सुटका करण्यात येईल’, अशी अट घालायला हवी होती; पण तसे घडले नाही. पूर्व पाकिस्तान हा मुळातच हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे. तोही त्याच वेळी हिंदुस्थानला जोडता आला असता. अखंड हिंदुस्थान हे आपले ध्येय आहे. त्या दृष्टीने पुढची पावले आपल्याला टाकता आली असती; पण तसे घडले नाही.

५. शत्रूराष्ट्राच्या ९३ सहस्र सैनिकांना युद्धकैदी बनवणे हा विक्रमच !

जगाच्या युद्धाच्या इतिहासात शत्रूराष्ट्राच्या ९३ सहस्र एवढ्या मोठ्या प्रमाणात सैनिकांना कोणत्याही देशाने युद्धकैदी बनवले नाही. हा विक्रम आपल्या वीर सैनिकांच्या नावावर नोंदवला गेला आहे. या विजयदिनानिमित्त त्या सर्वांना पराक्रमी वीरयोद्ध्यांना विनम्र अभिवादन !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (१५.१२.२०२२)

संपादकीय भूमिका

‘अखंड हिंदुस्थान’ हे हिंदूंचे ध्येय असून त्या दृष्टीने पुढची पावले पडण्यासाठी ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना अपरिहार्य !