विधान परिषद प्रश्नोत्तरे…
(महामार्गावरील अपघातात घायाळ झालेल्या प्रवाशांना आपत्कालीन आरोग्य सेवा देणार्या ठिकाणाला ‘ट्रॉमा केअर सेंटर’ म्हणतात. हे सेंटर महामार्गावरच स्थापित केले जाते.)
नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – खुलताबाद शहरालगतच असलेल्या सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ आणि सुलिभंजन ही पर्यटन अन् धार्मिक स्थळेही आहेत. त्यामुळे येथे भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने येतात. या अनुषंगाने खुलताबाद येथे ‘ट्रॉमा केअर सेंटर’ चालू करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत तारांकित प्रश्नाच्या वेळी सांगितले. सदस्य सतीश चव्हाण यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि सदस्य गोपीचंद पडळकर यांनीही सहभाग घेतला. ‘खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयातील ३० पदांपैकी २० पदे भरलेली असून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही चालू आहे’, असे डॉ. सावंत यांनी सांगितले.