महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी तसूभरही भागे हटणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – कोणत्याही परिस्थितीत आम्ही सीमाबांधवांना वार्‍यावर सोडणार नाही. महाराष्ट्राच्या इंच-इंच जागेसाठी लढू. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी आम्ही तसूभरही भागे हटणार नाही, अशी राज्यशासनाची भूमिका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २६ डिसेंबर या दिवशी विधानसभेत मांडली.

सभागृहाचे कामकाज चालू असतांना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहाण्याविषयी सभागृहात ठराव मांडण्याची मागणी करत चर्चेची मागणी केली. यावर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वीरदिनाच्या कार्यक्रमासाठी नवी देहली येथे गेले असल्यामुळे ‘ते आल्यावर २७ डिसेंबर या दिवशी हा ठराव मांडूया’, असे सांगितले. या वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री वाट्टेल ते बोलत असतांना आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मात्र मान खाली घालून आहेत, असे वक्तव्य केले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना मान खाली घालायला लावेल, अशी कुणाच्या बापाची हिंमत नाही’, असे उत्तर दिले.