पुणे – जगातील आर्थिकदृष्ट्या प्रगत २० देशांची ‘जी २० परिषद’ वर्ष २०२३ मध्ये होणार आहे. त्यातील जानेवारी आणि जून मध्ये या परिषदेच्या ३ बैठका पुण्यामध्ये होणार आहेत. त्यासाठी विविध देशांतील १०० हून अधिक प्रतिनिधी येथे येणार आहेत. त्यामुळे शहरामध्ये विमानतळ ते सेनापती बापट रस्ता, शहरातील चौक आणि प्रमुख रस्त्यांवर शोभेची कृत्रिम झाडे उभी करण्यात येणार आहेत. ही झाडे भाडेतत्त्वावर ८ दिवसांसाठी घेतली जाणार असून एका झाडावर १८० वॅटचे दिवे लावत रोषणाई केली जाणार आहे. या एका झाडासाठी महानगरपालिकेला १५ ते २० सहस्र रुपये भाडे द्यावे लागणार आहे. महापालिका मूलभूत सुविधेकडे दुर्लक्ष करत अनावश्यक पैसा व्यय करत असल्याचा सूर पुणेकरांमध्ये दिसून येत आहे.
पालिकेच्या विद्युत् विभागाचे प्रमुख श्रीनिवास कुंदल म्हणाले की, परिषदेच्या बैठकीसाठी येणारे प्रतिनिधी लोहगाव विमानतळ ते सेनापती बापट रस्ता आणि इतर काही भागांतून प्रवास करणार आहेत. त्यामुळे या मार्गांवर एकसारखे पथदिवे असावेत. ते नादुरुस्त किंवा बंद असू नयेत, यासाठी पालिकेच्या विद्युत् विभागाकडून उपाययोजना केल्या जात आहेत, तसेच पथदिव्यांच्या खांबांची रंगरंगोटी करण्याचे काम चालू आहे.
संपादकीय भूमिकाविद्युत् रोषणाई आणि अन्य सजावटीसाठी सहस्रो रुपये खर्च करण्यापेक्षा मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे. जनतेच्या करातून मिळालेल्या पैशांचा वापर योग्य पद्धतीनेच व्हावा ! |