खडतर ठिकाणी स्थानांतर नको; म्हणून प्रामाणिक अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात !

‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, उदयपूर’ने ७ राज्यांत केलेले संशोधन !

(चित्रावर क्लिक करा)

उदयपूर (राजस्थान) – सरकारी कार्यालयांमध्ये भ्रष्टाचार होतो, हे जगाला ठाऊक आहे. येथील अधिकार्‍यांनी प्रामाणिकपणे काम केले, तर त्यांचे स्थानांतर खडतर ठिकाणी केले जाऊ शकते. या कारणामुळे प्रामाणिकपणे काम करू इच्छिणारे अधिकारी लाच घेण्याचा विचार करतात, अशी माहिती दैनिक ‘भास्कर’च्या पुढाकाराने ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ (आयआयएम) उदयपूर’ने केलेल्या संशोधनात समोर आली आहे. अनेक प्रकरणांत समाजही प्रामाणिक अधिकार्‍यांचे कौतुक करत नाही, असेही यातून लक्षात आले आहे. हे संशोधन पंजाब, हरियाणा, बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांमध्ये करण्यात आले.

‘आय.आय.एम् उदयपूर’चे प्रा. डॉ. सौरभ गुप्ता

‘आय.आय.एम् उदयपूर’चे प्रा. डॉ. सौरभ गुप्ता यांनी अनुमाने ८६ जणांचे अध्ययन केले. त्यांत केंद्रीय लोक सेवा आयोगाची (‘यू.पी.एस्.सी.’ची) पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या बिहारमधील ३६ विद्यार्थ्यांखेरीज उर्वरित ६ राज्यांतील ५० विद्यार्थी आणि अधिकारी यांचा समावेश आहे. प्रायोगिक खेळ, गटचर्चा इत्यादी माध्यमांतून त्यांचा प्रामाणिकपणा आणि भ्रष्टाचार यांविषयीचे विचार, यांवर संशोधन केले गेले. या समस्येवरील उपायदेखील विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, भ्रष्टाचाराच्या विरोधात कठोर कायदे आहेत; परंतु व्यवस्थेला कीड लागली आहे.

भ्रष्टाचाराविषयीची लक्षात आलेली मानसिकता !

१.  लाचेची रक्कम अधिक असल्यास आणि त्यातून जनतेची मोठी हानी होत असल्यास अधिकारी लाच घेण्यास घाबरतात; कारण अशी प्रकरणे लवकर उजेडात येतात आणि त्यामुळे नोकरीवरही गंडांतर येण्याची शक्यता असते, तसेच संबंधित अधिकार्‍यांची अपकीर्तीही होऊ शकते.

२. प्रकरण जनतेशी संबंधित नसेल, तसेच शिक्षा अल्प असेल, तर अधिकारी सहजपणे लाच घेऊ शकतात. अशी अनेक प्रकरणे समोर येतात; पण त्यांतील शिक्षा झाल्याच्या घटना नगण्य आहेत. म्हणूनच भ्रष्टाचाराची भीती वाटत नाही.

३. सरकार काही प्रामाणिक अधिकार्‍यांना प्रोत्साहनही देते; परंतु अधिकार्‍यांची सरकारविषयीची भूमिका नरमाईची आणि सहकार्याची असते, तोवरच सरकार अशा अधिकार्‍यांचे कौतुक करत असते.

संपादकीय भूमिका 

भारतात प्रामाणिक सरकारी अधिकार्‍यांची अशी मानसिकता असेल, तर देशातील भ्रष्टाचार कधीतरी नष्ट होऊ शकेल का ? ही स्थिती धर्माचरणी शासनकर्ते आणि जनता यांचे हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !