गोव्यातील गावांच्या नावांचे विद्रूपीकरण

आज, १९.१२.२०२२ या दिवशी ‘गोवा मुक्तीदिन’ आहे. त्या निमित्ताने…

१९ डिसेंबर १९६१ या दिवशी गोवा राज्य ४५० वर्षांच्या पोर्तुगिजांच्या जाचातून मुक्त झाले. पोर्तुगिजांनी गोव्यातील जवळपास सर्वच स्थळांची नावे त्यांच्या भाषेनुसार, सोयीनुसार पालटली; परंतु गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर ६१ वर्षांनी आजही येथील फलकांवर गावांची इंग्रजीत आणि मराठीत अन् इंग्रजीतून देवनागरी लिपीत लिहितांना चुकीची, तसेच अर्थहीन अशा प्रकारे लिहिण्यात येतात. याविषयीचा ऊहापोह करणारा हा लेख…

१. गावांच्या नावांचे विद्रूपीकरण किती काळ सहन करायचे ?

श्री. महेश पारकर

गोव्यातील ‘धर्मापूर’ या गावाचे नाव ‘ड्रामापूर’ झाले आहे. असे गोव्यातील अनेक गावांचे झाले आहे. आपल्याच गावांचे होणारे अशा प्रकारचे विद्रूपीकरण आपण सहन करत आहोत. ‘अजून किती काळ हे सहन करणार आहोत ? याला काहीच उपाय नाही का ? सरकार दरबारी अशा भयंकर प्रकाराविरुद्ध ठोस पावले उचलायची धमकच राहिली नाही का ?’, असे प्रश्न पडतात.

‘पणजीम्’, ‘सांगेम्’, ‘मोलेम्’, ‘बेनॉलिम्’, ‘मंड्रेम्’ असे ‘म्’चे शेपूट जोडून गावांच्या सूचीने लेखाचा शेवट करावा लागेल, इतकी ती लांबलचक आहे. पोर्तुगीज गेले अन् आपल्या हाती हे शेपूट देऊन गेले. तो वारसा (?) सोडता सुटत नाही कि ते शेपूट जोडल्याने गावांच्या नावांना भारदस्तपणा येतो ? वाटेल तशी गावांची नावे लिहितांना ‘म्’ जोडायची सवय सुटेल, ही शक्यता अल्पच !

२. इंग्रजीच्या अनैसर्गिक आकर्षणामुळे झालेली मानसिकता

मागे एकदा ‘साखळीम्’चे नामकरण ‘सांखळी’ व्हावे’, असे विधान त्या वेळचे आमदार आणि आजचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले होते. खरे म्हणजे इथे ‘नामकरण’ म्हणण्यापेक्षा ‘शुद्धीकरण’ हा शब्द सयुक्तिक वाटतो. सांखळी हा शब्द इंग्रजीत लिहितांना अगदी सोप्या उच्चारात ‘Sankhali’ असा लिहिला जाऊ शकतो; परंतु आपणच ते लिहितांना ‘Sanquelim’, ‘Sankhalim’, अशा वाट्टेल तितक्या, विचित्र पद्धतीने का लिहितो ? वाचणार्‍यास अधिकाधिक त्रासदायक होईल, असे का लिहितो ? वास्तविक माणसांच्या नावाप्रमाणेच गावांची नावे शुद्ध असावीत. माणसांच्या नावाची लिहितांना आपण मोडतोड करतो का ? प्रेमापोटी आपण त्या व्यक्तीला टोपण नाव ठेवतो; परंतु लेखी व्यवहारात मूळ नावाचाच उपयोग करतो. गावांच्या नावाची मोडतोड करून इतरांना त्रास झाला; म्हणून स्वतःचे काय बिघडते ? ही इंग्रजीच्या अनैसर्गिक आकर्षणामुळे झालेली आपली मानसिकता आपल्याला कुठे घेऊन चालली आहे ?

३. पोर्तुगीज उच्चारांसह कोंकणी आणि मराठी भाषांत रूजत गेलेली नावे

पोर्तुगिजांनी त्यांच्या भाषेचे उच्चार आणि स्वरांच्या अनुरूप अनेक गावांना विचित्र नावे दिली. लेखी व्यवहारात ते लोक त्यांच्या उच्चारानुसार गावांची नावे लिहित असत. पुढे त्याच उच्चारांच्या स्वरूपात ती नावे रूढ होत गेली. पोर्तुगीज त्यांच्या भाषेसह गोवा सोडून गेले; परंतु त्यांनी ठेवलेली नावे पोर्तुगीज उच्चांरासह आम्ही इंग्रजीत वापरू लागलो. तीच हळूहळू कोंकणी आणि मराठीत रूजत गेली. उदा. ‘फोंडा’चे ‘पोंदा’, ‘हडफडे’चे ‘आरपोरा’, ‘केळशी’चे ‘कावेलोसीम्’ अन् ‘चोडण’चे ‘चोरावो’ झाले. कुठे ‘हरमल’ आणि कुठे त्याचे अपभ्रंशित रूप ‘आरांबोल’ ?

‘चोडण’ या सुंदर नावातील ‘ण’ पोर्तुगिजांनी गाळला; पण आपण ते पुन्हा का आणू शकत नाही ? असे अनेक प्रश्न आपल्याला नित्य पडतात; परंतु ‘शासकीय व्यवहारात रूढ झालेल्या गोष्टी पालटायच्या नसतात. त्या पालटून मूळ रूपात आणल्या, तर कटकटी निर्माण होतील’, असा आपणच आपला गैरसमज करून घेतला आहे. एकंदर कटकटीमुळे शासन ते पालट करत नाही आणि शासन पालटत नाही; म्हणून तुम्हा-आम्हा जनतेला व्यावहारिक, मानसिक त्रास सहन करावे लागतात. गावांच्या, वाड्यांच्या नावांमागचा मूर्खपणा बघत आयुष्य व्यतित करावे लागते.

४. गोव्यातील गावांची नावे भारताला शोभतात का ?

‘पेन्ह द फ्रान्स’, ‘काब द राम’ ही भारतातील गावांची नावे वाटतात का ?; पण ही संस्कृतीबाह्य नावे आपण चालवून घेतो. ती नावे पालटण्याचा प्रयत्न झाल्यावर लगेच काहींचा गावप्रेमाचा स्वाभिमान जागृत होतो. त्यामुळे ‘कशाला कटकटी वाढू द्यायच्या ? त्यापेक्षा सर्व ‘जैसे थे’ ठेवून देशाभिमान खुंटीस लावला जातो. ‘पदरी पडले पवित्र झाले’, अशा मानसिकतेने सगळा अन्याय सहन करायची सवय शासनानेच आम्हाला लावली आहे, असेच म्हणणे योग्य वाटते. ‘पेन्ह द फ्रान्स’, ‘काब द राम’ला येणारी पत्रे म्हणे आधी फ्रान्स आणि रोमच्या वार्‍या करूनच मग गोव्यात येतात. पत्रांच्या पत्त्यावर लिहिलेली ‘मारगांव’, ‘मारगोवा’, ‘काकोरा’, ‘माकाझाना’ अशी विकृत नावांची गावे या पृथ्वीतलावर कुठे वसली आहेत ? याचा शोध घेतांना टपाल खात्याला किती यातना होत असतील ? हे त्यांनाच ठाऊक !

५. विचित्र नावांमुळे गोव्यात येणार्‍यांना मनस्ताप

काही वर्षांपूर्वी मुंबई स्थित एका व्यक्तीला मडगावला काही कामानिमित्त जायचे होते. त्या काळी तो पहिल्यांदाच गोव्यात येत होता. त्याला बोलावणार्‍यांनी ‘मडगावला अमुक अमुक ठिकाणी ये’, असा निर्देश करून शेवटी गावाचे नाव ‘मारगांव, गोवा’, असे लिहिले. त्या बिचार्‍याने ‘मडगांव’ ऐकले होते. ‘मारगांव’ त्याच्यासाठी नवीन होते. मुंबईहून ती व्यक्ती आली. वाटेत कुणाला तरी ‘मारगांव’ कुठे आहे ?’, असे विचारले आणि ऐकणार्‍याने ‘मार्मागोवा’ ऐकले. त्यामुळे त्याला हकनाक मुरगांव बंदराची सफर घडली.

स्वच्छ अशा ‘मडगांव’चे इंग्रजीत रूपांतर ‘Madgao’ ऐवजी ‘Margao’ केले जाते अन् तो वाचणारा, ऐकणारा ते गांव शोधत रहातो. कधी कधी जुन्या गोव्यासही वळसा घालून येतो. मुरगांवचे इंग्रजी रूपांतर ‘मार्मागोवा’ कसे आणि का होते ? हा अनेकांच्या मनातल्या गहन प्रश्नांपैकी एक असावा. अशा प्रकारे एका भाषेतून दुसर्‍या भाषेत जातांना गावांची नावेच उच्चारांप्रमाणे जर पालटू लागली, तर जगात केवढा हाहाकार माजेल ? परंतु जगात जे होत नाही, ते आपल्या इथे आपण चालवून घेतो. अन्यथा आपली ख्याती कशी टिकेल ? नाही का ?

कुडचडे हे नाव कानाला ऐकतांनासुद्धा किती छान वाटतं. इंग्रजीत ते Curchorem होते; परंतु रेल्वे खाते त्याही पुढचे ! हे नाव ‘कुरकूरेम’ करून तिकिटावर छापते. अशा परिस्थितीत ‘कुरचोरेम’, ‘कुडचोडेम’, ‘कुरकूरेम’ ही गावे पर्यटकांनी कुठे शोधायची ? माझ्यासारख्या दुकानदारांना गावांच्या संबंधित वैताग प्रतिदिन ऐकायला मिळतो. विशेषतः गोव्यात नवीनच येणार्‍या मंडळीच्या तोंडून तो सहन करत स्पष्टीकरण देतांना नाकीनऊ येते.

काही वेळा आपल्या गावांविषयी आपण काही गोष्टी ऐकलेल्या नसतात; परंतु पर्यटकांच्या कानी कुणी तरी भरवलेल्या असतात. ‘गोव्यात एक संगम आहे आणि तेथे थोडा वेळ जाऊन ध्यानाला बसायचे आहे’, अशा गावाची चौकशी करत एक व्यक्ती माझ्याकडे आली. मला वाटले, झुवारी नदी अरबी समुद्राला मिळते, त्या गावी जायचे असेल; परंतु तिच्या हातातील गावांच्या माहितीवर ‘Sanguem’ हे पहातांच मी कपाळावर हात मारला.

६. लहान मुलांना काय शिकवायचे ?

अशा प्रकारे ‘केपे’ हे इंग्रजीत ‘Quepem’ झाल्यामुळे एकदम परग्रहावरील ठिकाण वाचल्यासारखे वाटते. ‘अस्नोड्या’ने काय गुन्हा केला आहे; म्हणून त्यातील ‘ड’ हिसकावून इंग्रजीत ‘Assnora’ होते ? यावर संशोधन व्हायला हवे. ‘बिठ्ठोण’चे ‘Brittona’, असे लिहित या गावाला एकदम लंडन नजीकच नेले असल्यासारखे त्याचे स्वरूप पालटतो. ‘डिचोली’, ‘डिचोलिम्’, ‘बिचोलिम्’ यांपैकी कोणते योग्य ?’, असे लहान मुलांनी विचारल्यास त्याचे उत्तर त्या मुलांचे आई-वडील, शिक्षक काय देत असतील ? ‘सर्वच योग्य आहे’, असे सांगून ढोंगीपणाचा पाठ मुलांना पढवत नाही ना ? येणार्‍या पिढ्यांनाही आपल्यासारखेच बनवण्याची ही प्रक्रिया इथूनच चालू होत नाही का ? ‘हणजूण’चे ‘Anjuna’, ‘शिरदोन’चे ‘Siridao’, ‘शहापूर’चे ‘Shapora’ अशी अनेक उदाहरणे देता येतील.

‘शिरोडा’ गावाचे नाव इंग्रजीत ‘सिरोदा’ केले जाते. त्यामुळे काही जण शिरोड्यात येऊनच ‘सिरोदा’ कुठे आहे ? अशी चौकशी करतात. त्यांना गावांच्या नावांच्या संदर्भात अपभ्रंश होण्यामागील कारणे आणि इतिहास सांगायला कुणाकडे वेळ आहे ? वास्को द गामा खरोखरच गोव्यात आला होता कि नाही ? हे इतिहासात स्पष्ट होत नाही. गावांच्या संस्कृतीच्या अनुषंगाने ‘वास्को’चे मूळ नाव कुठले ? किंवा ते काय असावे ? यावर चर्चांचे परिसंवाद होऊ शकतात. ‘वास्को’ हे परकीय नाव पालटून कटकटी निर्माण करण्यापेक्षा ‘असेना का आहे तेच नाव’, अशी आपली विचारसरणी ! ‘काणकोण’च इंग्रजी रूपांतर ‘Canacon’ ऐवजी शेवटी ‘a’ अक्षर जोडून ‘Canacona’ असे केले जाते. आपल्या देवनागरीच्या वैभवापुढे इथे रोमीचं दैन्यच सिद्ध होत आहे. ‘आगशी’ या स्थळकाळावर आधारित गावाचे ‘Agaassaim’ असे विद्रुपीकरण पार रूजलेले आहे. अशा प्रकारे आम्ही स्वतःला कुठे नेत आहोत ? ती गोष्ट ‘कुडतरी’ची. ते नाव ‘Curtorim’ होते, ‘चांदर’चे ‘Chandor’, ‘राय’चे ‘Raia’ झालेच पाहिजे का ?

७. शासनाने गोव्यातील गावांच्या नावांची स्वच्छता करणे अपेक्षित !

गावांच्या मूळ नावांच्या उच्चारासहित म्हणजे आपण ती नावे लिहू-वाचू शकतो; परंतु कुठेतरी भारतीयत्वाचा मनातील न्यूनगंड आपल्याला प्रत्येक क्षणी भेडसावतो. भारतीय असण्यात, दिसण्यातही न्यूनपणा परंपरागतपणे आपल्यावर हुकूम गाजवतो. त्यामुळे गावांच्या, वाड्यांच्या नावांच्या संदर्भात सहन न करण्याजोगे अपभ्रंश आपण मूकपणे मान्य करत आहोत आणि डोक्यावर घेऊन मिरवत आहोत. ते कायमचे पुसून टाकण्यासाठी नेहमी जागृत असलेले आम्ही मनाला वेसण घालून बसलो आहोत. या लेखाद्वारे मी शासनाला म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की, त्यांनीही गोव्यातील गावांच्या नावांच्या संदर्भातील घाण, जी आज कचर्‍याच्या डोंगराप्रमाणे होऊ पहात आहे, ती स्वच्छ करायच्या मोहिमेस वाट करून द्यावी. त्या निमित्ताने हैराण झालेल्या गोमंतकियांचा खरोखर आशीर्वाद घ्यावा.

– श्री. महेश पारकर, शिरोडा, गोवा (१०.१२.२०२२)