अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली एकविसाव्या शतकातही समाजाला विष पाजण्याचा प्रयत्न !

राजकारणी सुषमा अंधारे यांनी एका भाषणामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांसह अन्य संतांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले होते. त्यावर भाष्य करणारा लेख…

त्रेतायुगात रावणाची बहीण शूर्पणखा सीतामाईंना मारण्यासाठी आली होती. त्या वेळी लक्ष्मणाने तिचे नाक आणि कान कापून यथोचित स्वागत केले. द्वापरयुगात तान्ह्या श्रीकृष्णाला मारण्यासाठी पुतना राक्षसीण मावशीच्या रूपात आली. श्रीकृष्णाला विष पाजून ठार मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. अशा प्रकारची पाशवी वृत्ती असलेल्या लोकांचा जन्म प्रत्येक काळात होत असतो. अशा वृत्तीच्या लोकांनाच ‘राक्षस’ असे संबोधले जाते. आज विज्ञानयुगाचा काळ आहे. मानवी समाज सुविद्य, सुसंस्कृत आणि सभ्य आहे, असे आपण समजतो; पण समाजामध्ये सांप्रत काळात घडणार्‍या घटनांकडे पहाता आजचा समाज तसा आहे, असे म्हणण्याचे धाडस होत नाही. समाजात चार लोकांसमोर बोलतांना आपण कशा प्रकारचे भाषण करावे ? आणि कशा प्रकारची भाषा वापरावी ? याचे भान राहिले आहे, असे म्हणता येत नाही.


सुषमा अंधारे

१. संतांविषयी अश्लाघ्य उद्गार काढून अभिव्यक्तीस्वातंत्र्याची हत्या केली जाणे !

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज यांचे श्रेष्ठत्व जाणण्याची क्षमता नसलेले लोक त्यांच्याविषयी अनुद्गार काढतात. त्यांना कलंकित करतात. त्यांच्या त्या उर्मट, उद्धट, अविवेकी बरळण्याला अमृतवाणी समजून लोक जेव्हा टाळ्या वाजवतात, त्या वेळी समाज किती हीन पातळीवर जीवन जगतो आहे, याची प्रचीती येते.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी ‘ज्ञानेश्वरी’सारखा महान ग्रंथ लिहिला. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांनी ‘संजीवन समाधी’ घेतली. अशा संत ज्ञानेश्वर महाराजांविषयी अनुद्गार काढणारी वाणी अमंगल आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांना लाखोली वहाणार्‍या त्या स्त्रीने (सुषमा अंधारे यांनी) वयाच्या १६ व्या वर्षी आणि वयाच्या २१ व्या वर्षी त्यांच्यापेक्षा कोणते श्रेष्ठ असे विश्वाला मार्गदर्शन करणारे महत्कार्य केले, ते स्वमुखाने सप्रमाण सांगावे.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. संत एकनाथ महाराजांच्या घरी भगवान पाणी भरत होते. श्री विठ्ठलाने संत नामदेव महाराजांच्या हातचे अन्न भक्षण केले. अशा प्रकारे ईश्वराला अत्यंत प्रिय असलेल्या संतांविषयी अश्लाघ्य उद्गार काढून राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या अधिकाराची हत्या त्या बाईने केली आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

२. समाजामधील असभ्य गोष्टींवर टीका करण्याची पात्रता आहे का ?

अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ जनतेच्या श्रद्धास्थानांवर आघात करणे, असा होत नाही. समाजामधील असभ्य गोष्टींवर टीका करता येते. त्यासाठी सुद्धा वैचारिक आणि बौद्धिक पात्रता असावी लागते; अभ्यास, समाजहिताचा हेतू आणि प्रामाणिकपणा असावा लागतो. सत्याची चाड असावी लागते. त्याच समवेत कुणावर टीका करायची, याचेही भान असावे लागते. या सर्व गोष्टींचा अभाव संतांचा अवमान करणार्‍या व्यक्तीकडे होता. त्यामुळे या बाईने आपल्या वक्तव्यातून स्वतःच्या पाशवी वृत्तीचे दर्शन घडवले आहे.

३. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांची कुचेष्टा म्हणजे राजमाता जिजाऊंच्या भावनांचा आदर न करणे

ज्या संतांचा अवमान केला, त्या सर्व संतांची प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण ही आराध्य दैवते ! श्रीराम आणि श्रीकृष्ण हे भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आणि देशाची ऐतिहासिक परंपरा यांचे मानबिंदू आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती शिवरायांच्या श्रद्धास्थानांवर आघात करून त्यांनी त्यांचाही अवमान केला आहे.

राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवरायांवर रामायण आणि महाभारत यांचे संस्कार केले; कारण त्यांतील वंदनीय असलेले प्रभु श्रीराम आणि श्रीकृष्ण हे ईश्वरी अवतार आहेत, यावर जिजाऊंची नितांत श्रद्धा होती. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांसारख्या अवतारी पुरुषांची कुचेष्टा करून त्या दुर्बुद्ध बाईने राजमाता जिजाऊंच्या भावनांचाही चेंदामेंदा केला आहे.

४. अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर आघात करण्याचे धाडस करणार का ?

अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांवर अशा प्रकारचा आघात या बाईंनी केला असता, तर आतापर्यंत देशात किती दंगली उसळल्या असत्या ? किती रक्तपात झाला असता ? याची कल्पनाही करता येत नाही.

५. अभिव्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली घटनाकारांचा अवमान केला जाणे

राज्यघटनेने दिलेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अयोग्य वापर करणार्‍याला शिक्षा करण्याचे प्रावधान आपल्या राज्यव्यवस्थेत नाही; कारण घटनाकारांना असे वाटत होते की, आपल्या देशातील सुविद्य आणि सुसंस्कृत जनता त्याच्या आडून संत, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यासारख्या देवतांचा अवमान करण्याचे दु:साहस किंवा तसा प्रयत्न कुणी करणार नाही; पण या बाईंनी घटनाकारांचा विश्वास पायदळी तुडवून त्यांचाही अपमान केला आहे. अशा प्रकारचे वक्तव्य करून सामाजिक जीवनात विष घालवण्याचा या बाईंनी केलेला प्रयत्न लक्षात घेतला, तर त्यांना २१ व्या शतकातील पुतना मावशी म्हटल्यास आश्चर्य ते काय ?

६. संत, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावरील समाजातील श्रद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे

पुतना मावशीने ज्याप्रमाणे विष पाजण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणेच जनतेच्या मनात संत, श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्यावर असलेल्या श्रद्धेला विष पाजून ती नष्ट करण्याचा प्रयत्न या महिलेने केला. त्यासाठीच संबंधित स्त्रीला लाक्षणिक अर्थाने २१व्या शतकातील पुतना मावशी हीच उपाधी शोभून दिसेल, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य ते काय ?

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली (१४.१२.२०२२)