घराला सनातनचा आश्रम बनवणारे आणि घरासमोरील जागेत ‘राम कृष्ण हरि’, या आकारात फुलझाडे लावणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे नंदिहळ्ळी (बेळगाव) येथील श्री. उत्तम गुरव (वय ६१ वर्षे) !

श्री. उत्तम गुरव

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वाक्य स्मरून घराचा रंग,  स्वच्छता आणि रचना सनातनच्या आश्रमाप्रमाणे करणारे गुरव कुटुंबीय !

श्री गुरूंच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने माझ्या कुटुंबियांना सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करायची संधी मिळाली आहे. मला गुरुदेवांचे एक वाक्य सारखे आठवते, ‘प्रत्येक साधकाचे घर हे सनातनचा आश्रमच झाला पाहिजे.’ त्यानुसार आम्ही घराची स्वच्छता आणि रचना आश्रमाप्रमाणे करण्याचा प्रयत्न करतो. ‘घरामध्ये अधिकाधिक चैतन्य यावे’, यासाठी मुलांनी संपूर्ण घराला आश्रमासारखा रंग (पांढरा आणि पिवळा) दिला आहे. त्यामुळे आम्हा कुटुंबियांना ‘घर म्हणजे सनातनचा आश्रमच आहे’, असे वाटते. मी नियमित सकाळी पूजापाठ करून नंतरच पुढील कामांना आरंभ करतो.

२. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगाप्रमाणे सुचलेली आणि त्यानुसार केलेली कृती !

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

रामकृष्ण नामें ये दोन्ही साजिरी । हृदयमंदिरीं स्मरा कां रे ।। आपुली आपण करा सोडवण । संसारबंधन तोडा वेगीं ।। ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण माळा । हृदयीं जिव्हाळा श्रीमूर्ति रया ।। – संत ज्ञानेश्वर महाराज

अर्थ : ज्ञानेश्वर माऊली सांगतात, ‘राम आणि कृष्ण या दोन नामांचे नित्य मनात स्मरण करून आपली आपल्यालाच सोडवणूक करता येईल अन् संसार बंधनातून मुक्त होता येईल. माझ्या हृदयमंदिरी या श्रीमूर्तीचा जिव्हाळा असल्याने मी ध्यानात रामकृष्ण माळा जपतो.’

२ अ. ‘घरासमोरील मोकळ्या जागेत फुलझाडांनी देवाचे नाव साकारल्यास घरासमोरील मार्गावरून जा-ये करणार्‍यांचा एक नामजप होईल’, असा विचार करणारे श्री. गुरव ! : एकदा माझ्या मनात विचार आला, ‘घरासमोर असलेल्या ६ × ८ फूट रुंदीच्या जागेमध्ये वेगळी सजावट करण्यापेक्षा फुलझाडांनी देवाचे नाव लिहूया.’ आमचे घर गावातील मुख्य मार्गाच्या कडेलाच आहे. त्यामुळे मार्गावरून जा-ये करणार्‍या लोकांना त्यातून चैतन्य मिळेल. ‘लोकांनी ते नाम वाचले, तर त्यांचा एक तरी नामजप होईल’, असा विचार करून मी ‘राम कृष्ण हरि’ या आकारात फुलझाडे लावायचे ठरवले.

२ आ. भूमीवर ‘राम कृष्ण हरि’, असे लिहून त्या आकारात फुलझाडे लावणे : मी ती जागा स्वच्छ करून तण काढून शेणखत घालून सिद्ध केली. त्या वेळी ‘ही माझी समष्टी सेवा असून त्यातून मार्गावरून जा-ये करणार्‍यांना चैतन्य मिळणार आहे’, असा माझा भाव होता. मी पाहिल्यांदा भूमीवर हाताने ‘राम कृष्ण हरि’, असे नाम कोरले आणि नंतर त्या आकारात फुलांची झाडे लावली. त्याला वर्षातून २ – ३ वेळा फुले येतात.

३. दिवाळीच्या कालावधीत ‘राम कृष्ण हरि’ या नामाची झेंडूच्या पाकळ्यांनी सजावट करणे

काही दिवसांनी दिवाळीच्या कालावधीत आपण देवाला फुले वहातो, त्याप्रमाणे मी ‘राम कृष्ण हरि’, असे लिहिलेल्या ठिकाणी झेंडूच्या पाकळ्यांनी सजावट केली.

‘देवाने हे सुचवून करून घेतले’, त्यासाठी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. उत्तम गुरव (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६१ वर्षे), नंदिहळ्ळी, जिल्हा बेळगाव. (९.१२.२०२२)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक