मराठी साहित्यात ज्येष्ठ साहित्यिक आणि भाषाशास्त्राचे अभ्यासक म्हणून ओळखले जाणारे भालचंद्र नेमाडे यांचे खरे स्वरूप पुन्हा एकदा त्यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधतांना केलेल्या वक्तव्यावरून उघड झाले. १० वर्षे शिक्षा भोगलेले शहरी नक्षलवादी कोबाड गांधी यांच्या ‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’ या मराठी अनुवादित पुस्तकाला देण्यात येणारा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने रहित केल्यावर महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाच्या पदाधिकारी प्रज्ञा पवार आणि भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी त्यागपत्र दिले, तर आनंद करंदीकर आणि शरद बाविस्कर यांनी स्वतःचे पुरस्कार परत करण्याची घोषणा केली. ‘हिंदु : जगण्याची समृद्ध अडगळ’ या जाडजूड पुस्तकासाठी ‘ज्ञानपीठ’ हा भारतातील साहित्यक्षेत्रातील सर्वाेच्च पुरस्कार मिळालेले ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी माध्यमांसमोर यानंतर केलेली विधाने समाजाची दिशाभूल आणि वैचारिक गल्लत करणारी असल्याचे लक्षात आले.
१. प्रतिदिन शेजारच्या राष्ट्रांमधून घुसखोरी होत असतांना राष्ट्रवादाविषयी अपसमज पसरेल अशी विधाने करून समाजाची दिशाभूल करणे अयोग्य !
‘फ्रॅक्चर्ड फ्रिडम’या पुस्तकाला मिळणारा पुरस्कार रहित झाल्यानंतर माध्यमांशी बोलतांना ‘नॅशनालिझम’ (राष्ट्रवादा)मुळे फार हानी होत आहे’ असे वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केले. ‘राष्ट्रवादाच्या सीमा पुसल्या जाऊन सारे जग एक झाले पाहिजे’ असा त्यांच्या म्हणण्याचा रोख होता. ‘संपूर्ण जग आपले मानणे’, ही वेगळी संकल्पना आहे आणि ‘प्रखर राष्ट्रप्रेम’ ही वेगळी संकल्पना आहे. जगावर प्रेम करतांनाही ‘राष्ट्र प्रथम’ हीच भूमिका केव्हाही असायला नको का ? प्रतिदिन आजूबाजूच्या राष्ट्रांमधून घुसखोरी करत असतांना वरील विधाने करणे लांच्छनास्पद आहे. वरील गोष्ट कळायला कुणा फार मोठ्या विद्वानाची आवश्यकता नाही. या देशाचा सामान्य नागरिकही ते सांगेल. संपूर्ण विश्वाला कुटुंब मानण्याची संकल्पना असलेला भारत त्याच्या सहज सहिष्णू प्रवृत्तीनुसार कधीही शत्रूशी स्वतःहून शत्रूत्व घेत नाही किंवा स्वतःहून कुणावर कधी आक्रमण करत नाही. या सहिष्णूतेची सद्गुणविकृती होऊन पाक आणि चीन यांनी आतापर्यंत आपल्यावर ५ युद्धे लादली. या दोघांकडून अद्यापही प्रतिदिन घुसखोरी होत असतांना नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठ साहित्यिकाने अशा पद्धतीची विधाने करून समाजाची दिशाभूल करणे अत्यंत चुकीचे आहे.
२. माओवाद्यांच्या पुस्तकाचा पुरस्कार रहित झाल्याविषयी टिपणी करणे आणि त्याच वेळी चिनी जनता अन् सैनिक यांची बाजू घेणे !
माओवाद्यांच्या पुस्तकाचा पुरस्कार रहित झाल्याविषयी टिपणी करतांना नेमाडे म्हणाले, ‘हरामखोर लोकांना आपण निवडून देतो.’ नेमाडे यांनी केलेले वक्तव्य योग्य कि अयोग्य ? हे एक वेगळे सूत्र आहे; परंतु अनेक नक्षलवादी आक्रमणांचा कट रचल्याचा आरोप असणार्या लेखकाच्या पुस्तकाच्या अनुवादावर शासनाने बंदी घातली, तर नेमाडे यांना ती आक्षेपार्ह वाटते; म्हणजे नक्षलवाद्यांना नाकारणारा शासनाचा ‘राष्ट्रवाद’ नेमाडे यांना नको. ज्या लेखकाने स्वतः नक्षलवादी चळवळीशी संबंध असल्याचे स्वीकारले आहे, त्याच्या बाजूने टिपणी करत असतांनाच नेमाडे यांनी चीनमधील गरीब जनतेचा कळवळा येऊन ‘चीन देश नव्हे, तर चीनचे सरकार आपले शत्रू आहे’, असे आणखी एक दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. ‘देश आणि सरकार यांना नैसर्गिकरित्या एकत्र मानावे लागते’, हे नेमाडे यांना ठाऊक नाही, असे म्हणायचे का ? कुठल्याही देशाचे नागरिक मिळूनच तो देश बनतो. भारतात वारंवार घुसखोरी करणारे चिनी सैनिक त्यांच्या सरकारचे आदेश पाळतात; पण त्याच वेळी ते चीनचे नागरिकही असतात.
३. शत्रूराष्ट्रांची जनता गरीब आहे, म्हणून ती भारताला मित्र मानणार आहे का ?
नेमाडे यांच्या म्हणण्यानुसार पाक आणि चीन या दोन्ही देशांमध्ये गरीब जनता आहे; म्हणून भारताने या राष्ट्रांचे शत्रूत्व मानू नये किंवा शत्रूशी लढण्यासाठी आवश्यक ती ‘राष्ट्रवादाची भावना’ जोपासू वा अंगीकारू नये, म्हणजे थोडक्यात या देशांना आपला शत्रू मानू नये. शत्रूराष्ट्रातील ही गरीब जनताच जेव्हा पैसे घेऊन भारताच्या विरोधात घुसखोरी करते, भारतविरोधी सामना हरल्यावर दूरचित्रवाणी संच फोडते, तेथील हिंदूंच्या हत्या करते, मंदिरे नष्ट करते, हिंदु मुली-महिलांवर प्रचंड अत्याचार करते, धर्मांतर करते, तेव्हा याविषयी नेमाडे कधी काहीच का बोलले नाहीत ? हे अत्याचार काही केवळ पाक सरकार करत नाही. गरीब पाक जनताही तेथील हिंदूंवर अत्याचार करते. पाकमधील हिंदूंची संख्या दीड टक्काही राहिलेली नाही, याला केवळ तेथील सरकार नव्हे, तर जनताही उत्तरदायी आहे. ‘सुक्यासमवेत ओलेही जळतेच’, त्यामुळे ‘शत्रूराष्ट्राची जनता गरीब आहे म्हणून त्यांच्याशी शत्रुत्व करू नका’, या तत्त्वज्ञानाचा सल्ला नेमाडे यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय साहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासकांनी द्यावा, हे केवळ आणि केवळ त्यांचे साम्यवादाचे आंधळे प्रेमच दर्शवते. भारतातही गरीब जनता आहे. गेली अनेक दशके भारतात आंतकवादी पाठवतांना पाक भारतातील गरीब जनतेचा कधी विचार करतो का ? म्हणजे शत्रूराष्ट्राच्या गरीब जनतेने भारतावर कुरघोडी करावी आणि भारताने मात्र केवळ ‘शत्रूराष्ट्राची जनता गरीब आहे म्हणून त्यांच्याविषयी राष्ट्रवाद जोपासू नये’, ही नेमाडे यांची विचारसरणी म्हणजे ‘एका गालावर मारल्यावर दुसरा पुढे करा’, या विचारसरणीचे भूतच नव्हे का ?
४. ‘लेखकाचा नक्षलवादातील सहभाग’ हे पुरस्कार रोखण्यास पुरेसे कारण का नाही ?
या पुस्तकाच्या अनुवादिका अनघा लेले असे म्हणाल्या, ‘अनुवाद न वाचताच पुरस्कार रहित केला.’ नक्षली हे देशाचे शत्रू आहेत. असे असतांना नक्षलवाद्यांचा अविभाज्य भाग राहिलेल्या लेखकाच्या पुस्तकाचा पुरस्कार जर शासनाला रहित करावासा वाटला, तर त्यात चुकीचे काय आहे ? कि शासनाला त्यांचे काहीच अधिकार नाहीत ? शत्रूचा उदो उदो करण्यापासून रोखणे, हे शासनाचे कर्तव्यच आहे. नक्षलवाद्यांनी किती निष्पापांच्या हत्या केल्या आहेत ? किती सैनिक आणि किती अधिकारी मारले आहेत ? हे लक्षात का घेतले नाही ? भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्याने हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे ‘लेखकाचा नक्षलवादातील सहभाग’ हे पुरस्कार रोखण्यास पुरेसे कारण निश्चितच आहे.
५. भारतात राष्ट्रविरोधी पुस्तक प्रसिद्ध होते; पण चीनमध्ये राष्ट्रविरोधी व्यक्तींची काय गत होते, हे लक्षात घेतले पाहिजे !
नेमाडे ज्या चीनप्रेमाचे गोडवे गातात, त्या चीनमध्ये राष्ट्रविरोधात जरा जरी काही साहित्य प्रसिद्ध झाले, असा त्यांना केवळ सुगावा लागला किंवा कुणी राष्ट्रविरोधी काही बोलत आहे, असे वाटले, तर त्यांची काय स्थिती तेथील सरकार करते ? याविषयी मराठीतील साहित्य संस्थांचे त्यागपत्र देणार्या पदाधिकार्यांनी जाणून घ्यावे. भारतात राष्ट्रविरोधी चळवळीत उघड सहभाग असलेल्या लेखकाचे पुस्तक उघडपणे लिहिले आणि छापले जाऊ शकते, प्रसिद्ध होऊ शकते आणि पुरस्कारासाठी नामांकितही होऊ शकते, हे लक्षात घेतले पाहिजे. चीनने अन्य विचारसरणीच्या (त्यांच्या दृष्टीने राष्ट्रविरोधी) विद्यार्थ्यांचे आंदोलन कशा प्रकारे चिरडले, हे सार्या जगाने पाहिले आहे. नेमाडे यांना ‘चीनमधील वृत्ते अन्य देशांत जाण्यावर बंधने घातली जातात’, हेही नक्कीच ठाऊक असेल. ज्या माओवादाचा पुरस्कार करणार्या या लेखकाच्या पुस्तकासाठी साहित्य संस्थांचे पदाधिकारी तत्परतेने पदांचे त्यागपत्र देऊन शासनावर दबाव आणू पहात आहेत, त्या माओवादाचे माहेरघर असलेल्या चीनमधील अभिव्यक्तीस्वातंत्र्याची किती गळचेपी होते, याविषयीही त्यांनी बोलले पाहिजे.
६. नेमाडे यांच्याकडून निर्माण केला जाणारा वैचारिक गोंधळ !
नेमाडे यांचा वैचारिक गोंधळ पुन्हा एकदा या निमित्ताने पुढे आला आहे. ते ‘देशीवादा’चा पुरस्कार करतात. त्यांच्या साहित्याचे समीक्षक तसे म्हणतात. आता त्यांनी ‘राष्ट्रवाद’ नको’, असे विधान केले आहे. ‘राष्ट्ररक्षणासाठी प्रखर राष्ट्रवाद’ हा सनातन भारतीय प्राचीन संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. प्रभु श्रीरामांच्या पूर्वीपासून, तसेच चाणक्य, छत्रपती शिवराय अन् क्रांतिकारकांपर्यंत तो चालत आला आहे. धर्म, संस्कृती, राष्ट्र हे एकमेकांशी पूर्णतः संलग्न असतात आणि त्यांना वेगळे काढू शकत नाही. धर्माच्या अभ्यासाविना ‘देशीवाद’ खर्या अर्थाने कळू शकत नाही आणि धर्माचा अभ्यास स्वतः धर्म आचरणात आणल्याखेरीज म्हणजे साधना केल्याविना पूर्ण होऊ शकत नाही. धर्माधिष्ठित राष्ट्रवाद जोपासणारे वृद्ध खरोखर वयोवृद्ध होतात; परंतु राष्ट्रवादाला विरोध करणारे नेमाडे यांच्यासारख्या ज्येष्ठांचा गोंधळ वयानुसार वाढत रहातो, हेच यावरून लक्षात येते.
७. नक्षलवाद्यांच्या बाजूने बोलतांना आपण राष्ट्रविरोधी भूमिका घेतो, याचे भान का नाही ?
विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी (?) काँग्रेसचे अजित पवार यांनी म्हटले आहे की, पुस्तकाच्या पुरस्काराच्या संदर्भात सरकारने हस्तक्षेप करणे निषेधार्ह आहे. केवळ विरोधासाठी विरोध करतांना लोकप्रतिनिधींकडून राष्ट्रहितही पाहिले जात नाही, हे दुर्दैवी आहे. लेखक नक्षलवादाचा कट्टर पुरस्कर्ता आहे, एवढीच गोष्ट पुरस्कार रहित करण्यास पुरेशी का वाटत नाही ? त्यामुळे पुरस्कार रहित करण्याच्या निर्णयाचा शासनाचा निषेध करणारे साहित्यिक किंवा अन्य यांची मानसिकताच एकप्रकारे राष्ट्रविरोधी आहे, असेच यातून सिद्ध होत नाही का ? त्यामुळे देशाचे शत्रू असणार्या नक्षल्यांचा पुळका असणार्यांची चौकशी व्हावी, असे कुणाला वाटले, तर ते चूक ते काय ?
– सौ. रूपाली वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१४.१२.२०२२)