ओसामा बिन लादेन याचे आदरातिथ्य करणार्‍यांनी आम्हाला उपदेश करू नये !

संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचा विषय मांडणार्‍या पाकला भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी सुनावले

भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर

नवी देहली – पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत काश्मीरचा प्रश्‍न उपस्थित केला. याला भारताचे परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, ज्या देशाने आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे आदरातिथ्य केले, तो देश संयुक्त राष्ट्रांच्या शक्तीशाली व्यासपिठावरून उपदेश देण्याच्या पात्रतेचा नाही. त्याने आम्हाला उपदेश करू नये.

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मांडलेली सूत्रे

१. आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत, असे सांगत जयशंकर यांनी चीनलाही फटकारले. चीनने पाकिस्तानी आतंकवाद्यांना ‘आंतरराष्ट्रीय आतंकवादी’ घोषित करण्यास विरोध केला होता.

२. जग आणीबाणी, युद्धे आणि हिंसाचार यांतून मार्गक्रमण करत आहे. संघर्ष करत आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि मार्ग दाखवण्यासाठी म. गांधी यांच्या आदर्शांची आजही आवश्यकता आहे. साथीचे रोग, हवामान पालट आदी संघर्षांच्या आव्हानांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्याविषयी संयुक्त राष्ट्रांची विश्‍वासार्हता आहे.

काय म्हणाले होते बिलावल भुट्टो ?

भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य बनवण्याच्या मागणीवरून पाकचे परराष्ट्रमंत्री बिलावल भुट्टो म्हणाले होते की, काश्मीरचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. जर तुम्हाला (भारताला) बहुपक्षीयतेचे यश पहायचे असेल, तर तुम्ही काश्मीर प्रश्‍नावर परिषदेच्या ठरावाच्या कार्यवाहीला अनुमती देऊ शकता. बहुपक्षवाद यशस्वी होईल, हे तुम्ही सिद्ध करू शकता. तुमच्या (भारताच्या) अध्यक्षतेखाली परिषदेच्या आमच्या प्रदेशात (काश्मीर) शांतता प्रस्थापित होऊ शकते, हे तुम्ही सिद्ध करा.