चांद तारा असणारे हिरवे झेंडे घेऊन ‘पुणे बंद’ ला एम्.आय.एम्.सहित विविध मुसलमान संघटनांचा पाठिंबा !

चांद तारा असणारे हिरवे झेंडे घेऊन ‘पुणे बंद’ला एम्.आय.एम्.सहित विविध मुसलमान संघटनांचा पाठिंबा

पुणे, १४ डिसेंबर (वार्ता.) – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून १३ डिसेंबर या दिवशी ‘पुणे बंद’ ठेवण्यात आले होते. या वेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आदी राजकीय पक्षांसमवेत एम्.आय.एम्.सहित विविध मुसलमान संघटनांनी पुणे बंदला पाठिंबा दिला होता, तसेच ते मोर्च्यामध्ये सहभागी झाले होते. मुसलमान संघटनेचे पदाधिकारी हातात चांद तारा असणारे हिरवे झेंडे घेऊन घोषणा देत होते. या वेळी जमाते इस्लामी हिंद, जमीयत-उलेमा-ए-हिंद, जमीयतूल कुरेश, एम्.आय.एम्., इंडियन मुस्लिम फ्रंट, कोंढवा सोशल फाऊंडेशन आदी ४० मुसलमान संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून स्वतः बंदचे पत्र मुख्य आयोजकांना दिले होते.

या वेळी ‘जमीयत-उलेमा-ए-हिंद’ संघटनेचे अंजुम इनामदार म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये मुसलमान सरदार आणि प्रमुख होते. छत्रपतींनी कधीही जातीय द्वेष केला नाही. आम्ही महाराष्ट्राचे आहोत. मूलनिवासी आहोत. भाजप हे जातीय राजकारण करत आहे. समाजामध्ये द्वेष पसरवण्याचे काम करत आहे. आमच्या सर्व संघटना छत्रपतींचा अवमान सहन करणार नाहीत. आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो.’’ (हलाल प्रमाणपत्रे देणार्‍या इस्लामी संघटनांमध्ये ‘जमीयत-उलेमा-ए हिंद’चा समावेश आहे. ही संघटना आतंकवादाचा आरोप असणार्‍या ७०० हून अधिक जिहाद्यांना कायदेशीर साहाय्य करत आहे, याचा निषेध कोण करणार ? – संपादक)

मुसलमान संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, आम्ही जात-पात धर्म या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता फक्त शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ या मोर्च्यात सहभागी झालो आहोत. शिवप्रेमी सर्वधर्मीय पुणेकर म्हणून आम्ही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत आहोत.

संपादकीय भूमिका

  • मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सन्मानार्थ होता, तर भगवे झेंडे घेण्याऐवजी चांद तारा असणारे हिरवे झेंडे घेऊन मोर्च्यामध्ये सहभागी होण्याची काय आवश्यकता होती ? असा प्रश्न जनतेला पडला आहे. 
  • मुसलमान संघटनांना छत्रपती शिवाजी महाराजांचा एवढा सन्मान वाटत असेल, तर त्यांनी अफझलखान वधाची चित्रे लावावीत !