सोलापूर – येथे सायबर गुन्हेगारांनी स्वामी समर्थ भक्तांची ‘ऑनलाईन’ फसवणूक केली. भक्तनिवास नोंदणीच्या नावाखाली ही फसवणूक करण्यात आली. मागील एक मासामध्ये अशा अनेक घटना घडल्या असून मुंबई, नवी मुंबई, पुणे येथील भक्तांची फसवणूक झाली आहे. संकेतस्थळांवर भक्तनिवासाची माहिती शोधून ‘ऑनलाईन बुकिंग’ करणारे भक्त या सायबर गुन्हेगारांकडून नाडले जात आहेत. अशा प्रकारे अनुमाने २० भाविकांनी फसवणूक झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाला दिली. त्यानंतर मंदिर प्रशासनाने माहिती घेऊन अक्कलकोट पोलीस ठाणे येथे तक्रार प्रविष्ट केली.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान यांच्या वतीने भक्तनिवास चालवले जाते; मात्र त्याचे कोणतेही अधिकृत संकेतस्थळ नाही. तरीही सायबर गुन्हेगार बनावट संकेतस्थळ सिद्ध करून फसवणूक करत आहेत. भक्त निवास येथे ‘जे भाविक प्रथम येतील, त्यांना प्रथम खोली मिळेल’ हेच तत्त्व अनेक वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे भाविकांनी सायबर गुन्हेगारांना बळी पडू नये, असे आवाहन मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी केले आहे.