‘पंढरपूर कॉरिडॉर’च्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची चेतावणी

(कॉरिडॉर म्हणजे सुसज्ज मार्ग)

डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी (उजवीकडे) यांच्याशी चर्चा करतांना रामकृष्ण महाराज वीर

पंढरपूर – वाराणसी येथे कॉरिडॉरमुळे अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. त्याच पद्धतीने पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसर सुंदर दिसावा, यासाठी ‘कॉरिडॉर योजना’ सिद्ध केली जात आहे. त्यामध्ये पंढरपूर येथील अनेक प्राचीन मंदिरे उद्ध्वस्त होतील. या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील नियोजित कॉरिडॉरच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे, अशी माहिती भाजपचे नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी दिली. या कॉरिडरला विरोध दर्शवण्यासाठी लवकरच पंढरपूरला जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

वारकरी संप्रदायानेही या कॉरिडॉरला तीव्र विरोध दर्शवला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई येथे ‘पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती’चे सचिव रामकृष्ण महाराज वीर यांनी पत्रकार वीरेंद्रसिंह उत्पात यांच्यासह खासदार श्री. स्वामी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी स्वामी यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. या कॉरिडॉरच्या विरोधात न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार असल्याविषयी स्वामी यांनी ट्वीटही केले आहे.