रुग्णालयातील औषधी दुकानांतून औषधे खरेदी करण्याची सक्ती नियमबाह्य !

अन्न आणि औषध प्रशासनाचा आदेश

मुंबई, १२ डिसेंबर (वार्ता.) – रुग्णालयाच्या संलग्न असलेल्या औषधी दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती करणे नियमबाह्य आहे. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी नुकताच आदेश काढून औषध खरेदी करण्यासाठी रुग्णालय सक्ती करू शकत नाही, असा निर्वाळा दिला आहे. ‘रुग्णांनी रुग्णालयातील औषधी दुकानातूनच औषधांची खरेदी करावी अशी सक्ती नाही. रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्यांकडून औषधांची खरेदी करू शकतात’ ‘या आशयाचा फलक दर्शनी भागात प्रदर्शित करावा’, अशा सूचनाही या आदेशामध्ये दिल्या आहेत.

रुग्णांना रुग्णालयातील औषधी दुकानातून औषधे खरेदी करण्याची सक्ती केली जाते, अशा तक्रारी वारंवार प्रशासनाकडे येत आहेत. रुग्णालयांच्या सक्तीमुळे रुग्णांना चढ्या दराने औषधे खरेदी करण्याची नामुष्की ओढवते; मात्र होलसेलमध्ये औषधे खरेदी केल्यास ती न्यून दरामध्ये उपलब्ध होतात. त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा आहे. त्यामुळे यापुढे रुग्णालयाला रुग्ण किंवा त्याच्या कुटुंबाला औषध खरेदीची सक्ती करता येणार नाही. अन्न आणि औषध प्रशासनाने रुग्णालयांना आदेशित करतांना औषधे आणि सौंदर्यप्रसाधने कायद्याचा संदर्भ देऊन हा दाखला दिला आहे.