हिंदुत्वनिष्ठांनी नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्यांना वाहिली श्रद्धांजली !
नाशिक – शहर सुशोभिकरणाच्या नावाखाली ‘स्मार्ट सिटी’कडून शहराचे रूपच पालटले जात आहे. प्राचीन काळापासून गोदाकाठाचे धार्मिक महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर गोदाप्रेमीसह समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांकडून १० डिसेंबर या दिवशी येथील नीलकंठेश्वर मंदिर परिसरातील पायर्यांना पुष्पहार अर्पण करत ‘स्मार्ट सिटी’चा निषेध करण्यात आला. या वेळी ८ दिवसांच्या आत बैठक घेऊन याविषयी ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी दिले. या वेळी संतप्त नागरिकांनी घोषणाही दिल्या. (नाशिक शहरात होणार्या विद्रूपीकरणाच्या विरोधात संघटित होऊन लढा देणारे समस्त नाशिककर आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांचे अभिनंदन ! – संपादक) नाशिककर, गोदाप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी तोडलेल्या पायर्यांच्याच ठिकाणी आंदोलन केले. आंदोलनाच्या प्रारंभी धर्मप्रेमी देवांग जानी, कल्पना पांडे, प्रफुल्ल संचेती यांनी स्मार्ट सिटीचा गलथान कारभार सर्वांसमोर कथन करत स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांना याविषयी खडसावले. स्मार्ट सिटीचे अधिकारी हिरे यांनी लवकरच पुरातन पायर्या बांधून देणार असल्याचे पत्र वाचून दाखवले, तसेच ८ दिवसांत याविषयी बैठक घेणार असल्याचे स्पष्ट केले.