कसायांशी संगनमत करून कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या हडपसर (पुणे) येथील पोलीस निरीक्षकावर कारवाई करावी ! – गोरक्षकांचे पुणे पोलिसांना निवेदन

पुणे – सराईतपणे गोतस्करी करणारा मयनू कुरेशी ५ डिसेंबर या दिवशी फलटण येथे त्याच्या गाडीमधून १२ लहान-मोठ्या म्हशी अवैधपणे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाल्यानंतर गोरक्षकांनी ती गाडी हडपसर येथील मांजरीच्या दिशेने जात असतांना पकडली. या गाडीची माहिती पोलिसांना देऊन ही गाडी हडपसर पोलीस ठाण्यात आणली. त्या वेळी येथील पोलीस निरीक्षक कविदास पाटील यांनी तक्रार प्रविष्ट करण्यास नकार दिला. यावरून हे संगनमताने होत असल्याचे गोरक्षकांचे म्हणणे आहे.

कविदास पाटील यांनी ‘तक्रार प्रविष्ट होणार नाही’, असे गोरक्षकांना सांगितले. ‘पोलिसांना फक्त तेवढीच कामे असतात का ?’, असे म्हणत, ‘आता जर तुम्ही ऐकले नाही, तर तुमच्यावर चोरी, दरोडा किंवा खंडणी असे गंभीर गुन्हे नोंद करू’, असेही सांगितले. (अशी दमदाटी करण्याची हिंमत पोलीस कसे काय करतात ? अशी अरेरावी पोलीस कुणाच्या आधाराने करत आहेत, हेही शोधायला हवे ? अशा पोलिसांना कठोर शिक्षा द्यायला हवी, असेच गोरक्षकांना वाटते ! – संपादक) कसायांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्‍या कविराज पाटील यांसारख्या अधिकार्‍यांवर वेळीच योग्य ती कारवाई व्हावी, गोरक्षणाच्या चळवळीला योग्य दिशा मिळावी, अशा आशयाचे निवेदन गोरक्षकांनी पुणे पोलीस आयुक्तांना दिले आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री, पोलीस महासंचालक यांना देण्यात आली आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की,

१. पुणे-सोलापूर रस्त्यावर प्रतिदिन अनधिकृत वाहतूक आणि गोमांस यांची सर्रासपणे तस्करी होते; परंतु कोणताही पोलीस अधिकारी स्वतःहून गाडी पकडून कारवाई करत नाही. गोरक्षकांनी गाडी पकडल्यानंतर पोलीस नेहमी कायदेशीर गोष्टींत पळवाटा शोधून कारवाईस विलंब करतात. मागे हडपसर पोलीस ठाण्यामधून गोमांसाची गाडी कसायांनी चोरी करून पळवून नेली. तेव्हाही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.

२. कसायांशी लागेबांधे असलेला कुरेशी समाज प्रत्येक वेळी खोटी कागदपत्रे आणि शिक्के बनवून किंवा संबंधित अधिकार्‍यांना पैसे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्यात यशस्वी होतो.

३. गोरक्षकांच्या सहनशक्तीचा अंत होऊन भविष्यात या चळवळीला वेगळे हिंसक वळण लागू न देण्याचे दायित्व पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा यांचे आहे.

संपादकीय भूमिका

असे निवेदन गोरक्षकांना द्यावे लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद नव्हे का ? पोलीस विभागात असे पोलीस असणे, पोलीस विभागाला कलंकच आहे.