नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत साहित्याची फेकाफेक, ध्वनीक्षेपक आणि बाके यांची तोडफोड !

नागपूर – जिल्हापरिषदेत नवे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती यांनी कार्यभार सांभाळल्यानंतर ५ डिसेंबर या दिवशी जिल्हा परिषदेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवरील १० विषयांवर चर्चा न करताच ते संमत केल्याची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांनी केली. त्यामुळे या वेळी भाजपच्या संतप्त सदस्यांनी सभागृहातील ध्वनीक्षेपक, आसंद्या आणि कागद यांची फेकाफेक केली, तसेच बाकांचीही तोडफोड केली. या गोंधळात मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या सदस्यांना काँग्रेसचे बंडखोर नाना कंभाले यांचीही साथ मिळाली आहे.

विरोधी पक्षनेते आतिष उमरे यांनी आक्षेप घेत ‘विषय पत्रिकेवरील विषयांवर चर्चा व्हावी’, अशी मागणी केली; परंतु अध्यक्षा कोकड्डे यांनी चर्चेला नकार देत सर्व विषय एकांगी संमत केल्याचे घोषित करत सभा गुंडाळली.

संपादकीय भूमिका

साहित्याची फेकाफेकी आणि तोडफोड करणार्‍या सदस्यांना बडतर्फ करून कायमचे घरी पाठवा. साहित्याची तोडफोड करण्यासाठी नव्हे, तर विकासकामे करण्यासाठी जनतेने आपल्याला निवडून दिले आहे, याचा विसर सदस्यांना पडला आहे का ?