पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (सातारा) गावापासून पश्चिमेस ११ किलोमीटर अंतरावर श्रीक्षेत्र चाफळ हे गाव आहे. तेथे समर्थ रामदासस्वामी यांनी श्रीरामरायांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून भव्य मंदिर निर्माण केले. तेथूनच पुढे अनुमाने १२ किलोमीटर अंतरावर उंच महाकाय डोंगरकपारीत समर्थ रामदासस्वामी यांनी एका गुहेची निर्मिती केली. यालाच ‘रामघळ’ नावाने ओळखले जाते. तेथून जवळच १०० मीटर अंतरावर एक ‘निर्झर’ (निर्मळ पाण्याचा झरा) यालाच ‘कुबडीतीर्थ’ म्हटले जाते. छत्रपती शिवाजी महाराज यांना तहान लागल्यानंतर समर्थ रामदासस्वामींनी याठिकाणी स्वत:च्या हातातील कुबडी मारली, तेव्हा तेथे ‘निर्झर’ निर्माण झाला, अशी अख्यायिका सांगितली जाते. याच रामघळ परिसरात समर्थ रामदासस्वामी यांनी अनेक वर्षे तपश्चर्या केली. या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी महाराष्ट्रासह देश-विदेशातून लाखो समर्थभक्त येत असतात.
या परिसराचा विकास होण्यासाठी शासनाकडून या परिसराला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले; मात्र अनेक दशके लोटूनही या तीर्थक्षेत्र परिसराचा विकास होऊ शकलेला नाही. शिव-समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा चैतन्यमय परिसर ३६५ वर्षानंतरही इतिहासाची साक्ष देत स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. येथे येणार्या पर्यटकांसाठी कोणत्याही मुलभूत सुविधा अजूनही होऊ शकलेल्या नाहीत. पर्यटकांसाठी भक्त निवास बांधले आहेत; मात्र यामध्ये कुठलीच सुविधा नसल्यामुळे ते केवळ शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. परिसरात कुठेही शौचालयाची सुविधा नाही. त्यामुळे पर्यटकांना विशेषत: महिलांना उघड्यावरच जावे लागते. तीर्थक्षेत्र परिसर सोडल्यास पथदीपांची पुरेशी व्यवस्था नाही. अशा अनेक अडचणींमुळे अशा पवित्र ठिकाणी पर्यटकांना इच्छा असूनही जाता येत नाही.
सातारा जिल्ह्यात जन्मलेले एकनाथ शिंदे हे सध्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. ते स्वत: धार्मिक असून त्यांनी आतापर्यंत पर्यटनविकासासाठी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्यातील गड-दुर्गांचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी त्यांनी भरीव तरतूद केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी लक्ष घालावे, असे समर्थभक्तांना वाटते. सुदैवाने सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हे याच विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्यामुळे त्यांनीही लक्ष घातल्यास रामघळ-कुबडीतीर्थचा रखडलेला विकास होण्यास वेळ लागणार नाही, हे निश्चित !