पोर्तुगीज भाषेला प्रोत्साहन कशासाठी ?

 

सौ. प्रीती आनंद जाखोटिया

परराष्ट्र मंत्रालयाची भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद आणि राज्य सरकार यांच्या वतीने ३ ते ६ डिसेंबर २०२२ या कालावधीत गोव्यात ‘आंतरराष्ट्रीय लुसोफोन उत्सव’ होत आहे. या निमित्ताने भारत ‘लुसोफोन देशां’शी जोडला जाणार आहे. लुसोफोन देश म्हणजेच ज्या ठिकाणी पोर्तुगीज ही लोकांची मूळ किंवा दुसरी भाषा आहे, तसेच जेथे पोर्तुगीज संस्कृती ठळकपणे दिसून येते असे देश. आशिया, युरोप, आफ्रिका, उत्तर आणि दक्षिण अमेरिका या खंडांतील काही देशांसह भारतही ‘लुसोफोन देशां’चा सदस्य आहे. भारतात ‘ओरिएंट फाऊंडेशन’ आणि ‘कॅमोस इन्स्टिट्यूट’ या पोर्तुगीज भाषा अन् संस्कृती यांना प्रोत्साहन देणार्‍या संस्था कार्य करतात. सामान्य हिंदूंच्या दृष्टीने पाहिले, तर गोव्यावर अनेक वर्षे पोर्तुगिजांची अत्याचारी राजवट होती. एवढाच काय तो, पोर्तुगालशी भारताचा ऐतिहासिक संबंध, जो अभिमान बाळगावा असा मुळीच नाही. अशा पोर्तुगिजांच्या भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम भरवण्यात आला.

प्रगतीसाठी, परराष्ट्र धोरणांसाठी पोर्तुगालशी व्यवहार करायला ना नाहीच; पण त्यांची भाषा आणि संस्कृती यांना प्रोत्साहन द्यायला गोमंतकात उत्सव कशासाठी ? मराठीला अद्याप गोव्यात राजभाषेचा दर्जा मिळालेला नाही. कोकणी शाळा ओस पडत आहेत. कोकणी साहित्य, भाषा यांना प्रोत्साहन देण्यासाठी बोटावर मोजण्याइतपत प्रयत्न होत असतांना आमच्या संस्कृतीवर, पूर्वजांवर घाला घालणार्‍या लोकांचा उदो उदो आम्ही का करायचा ? अभिमानी गोमंतकीय हिंदूंचा हा प्रश्न रास्त नाही का ? भारताचे परराष्ट्र धोरण उत्तम आहे, त्यात काही वाद नाही; पण पोर्तुगालचा उत्सव भरवून हिंदूंच्या जखमा भरल्या जातील कि भळभळतील ? हा विचार सरकारने करावा, इतकी माफक अपेक्षा आम्ही ठेवूच शकतो. नाही का ?

आतापर्यंत हिंदूंना त्यांच्यावरील अत्याचारांची जाणीव अल्प होती; पण आता हिंदू जागृत होत आहेत. हिंदुत्वनिष्ठांचे अनेक वर्षांचे प्रयत्न आणि कालमहिमा यांमुळे आता त्यांना योग्य-अयोग्य समजत आहे. याआधी असे उत्सव भरवले गेले, ते हिंदूंच्या अनभिज्ञतेमुळे ! हे समजून घेतले, तरी आता केंद्र सरकारने असा उत्सव भरवणे आणि साजरा करणे, हे गोमंतकियांना बुचकळ्यात टाकणारे आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकार यांनी बहुसंख्य हिंदूंचा सांस्कृतिक अभिमान लक्षात घेऊन गोव्यातील लोप पावलेली संस्कृती पुनर्जागृत करण्यासाठी उत्सव भरवावेत, अशीच माफक अपेक्षा आहे.

– सौ. प्रीती आनंद जाखोटिया,  रामनाथी, गोवा.