विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यास शिवभक्त ते हटवतील ! – छत्रपती संभाजीराजे यांची चेतावणी

छत्रपती संभाजीराजे (मध्यभागी) यांनी निवेदन देतांना विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, तसेच अन्य हिंदुत्वनिष्ठ

विशाळगड (जिल्हा कोल्हापूर) – रायगडावर कुणालाही रात्री निवास करण्यास अनुमती नाही. तेथील एक दगड जरी दुसरीकडे न्यायचा असेल, तरी ते कठीण असते. याउलट विशाळगडावर ‘गेस्टहाऊस’, ‘आऊटहाऊस’ झाले आहेत, एका खोलीत ४ जण रहातात. इथे मद्यपान केले जाते, गांजा ओढला जातो, हुक्का ओढला जातो, इथे अनेक अवैध धंदे चालू आहेत. यामुळे शिवभक्तांमध्ये अस्वस्थता आहे. गडावरील वर्ष २००२, २००५, २००९ आणि वर्ष २०२२ मधील छायाचित्रे पहिल्यास तेथे अतिक्रमण कसे वाढले आहे, ते दिसेल. त्यामुळे यापुढील काळात विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाने दिरंगाई केल्यास शिवभक्त ते हटवतील आणि त्यांच्यासमवेत मी असेन, अशी चेतावणी छत्रपती संभाजीराजे यांनी दिली.

(छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितल्याप्रमाणे विशाळगडावर होणारे अपप्रकार प्रशासनास दिसत नाहीत का ? जनतेच्या कररूपी पैशांतून वेतन घेणारे हे प्रशासकीय अधिकारी नेमके काय करतात ? गडांचे पावित्र्य राखण्याचे दायित्व प्रशासनाचेही नाही का ? – संपादक)

छत्रपती संभाजीराजे यांनी विशाळगडाची पहाणी केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.

या प्रसंगी छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले, ‘‘ज्याप्रकारे प्रशासनाने सातारा येथील प्रतापगडावरील अतिक्रमण काढण्याचे धाडस दाखवले, तसेच धाडस विशाळगड येथेही दाखवणे अपेक्षित आहे. हे अतिक्रमण काढणे हे जिल्हाधिकार्‍यांचेही दायित्व आहे. विशाळगडावर इतकी भयानक परिस्थिती निर्माण होण्यास कोण कारणीभूत आहे ? यासाठी आयोजित बैठकीला केवळ जिल्हाधिकार्‍यांनी वेळ देऊन चालणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीचा आराखडा दिला पाहिजे. आवश्यकता भासल्यास मुंबईत बैठक घ्या; मात्र आता यावर ठोस कृती अपेक्षित आहे.’’

१. प्रारंभी छत्रपती संभाजीराजे यांनी गडाची पहाणी केली. या प्रसंगी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे अन् पत्रकार श्री. सुखदेव गिरी यांनी गडावर कशाप्रकारे अतिक्रमणे झाली आहेत, मंदिरे-समाध्या यांची भग्नावस्था कशी आहे, ते छत्रपती संभाजीराजे यांना दाखवले. गडाची पहाणी करतांना शिवभक्त, तसेच विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांमधील पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते.

२. छत्रपती संभाजीराजे गड पहाणी करत असतांना उपस्थित तरुणांकडून ‘पुण्यश्‍लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय’, ‘वन्दे मातरम्’ यांसह अन्य घोषणा देण्यात आल्या. या वेळी तरुण संतप्त झाले होते.

३. छत्रपती संभाजीराजे यांच्या गडाच्या पहाणीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना निवेदन !

या प्रसंगी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीराजे यांना निवेदन देण्यात आले. कृती समितीच्या आंदोलनामुळे आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकार्‍यांनी घेतलेल्या ठोस भूमिकेमुळे पुरातत्व विभागाने गडावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा दिल्या; मात्र या नोटिसांवर पुढे कोणतीच कृती झालेली नाही. या संदर्भात पुरातत्व विभागाकडून केवळ कागदोपत्री घोडे नाचवण्याच्या पलीकडे काहीच कृती होत नाही. तरी हे अतिक्रमण काढण्याच्या संदर्भात आता ठोस कृती होण्यासाठी लक्ष घालावे, अशी मागणी त्यात करण्यात आली आहे. निवेदन स्वीकारल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी ‘जिल्हाधिकार्‍यांसमवेत होणार्‍या बैठकीत विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीने ही सूत्रे मांडावीत’, असे सांगितले.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाउपाध्यक्ष श्री. युवराज (बाबा) काटकर, मनसेचे सर्वश्री शिवाजी फिरके, दीपक चांदणे, विजय तटकरे, आदित्य पाटील, गजापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. नारायण वेल्हाळ, विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.