त्र्यंबकेश्वर येथील विराट मूक मोर्च्यात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी !
त्र्यंबकेश्वर (जिल्हा नाशिक) – ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातून श्रद्धा वालकर हिच्या निर्घृण हत्या प्रकरणी निषेध करत ‘लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा करण्याच्या मागणीसाठी ३ डिसेंबर या दिवशी शहरातून विराट मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्च्यात हिंदुत्वनिष्ठांनी ‘आता एकाही श्रद्धाचा बळी जायला नको, लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदा झालाच पाहिजे, ‘लव्ह जिहाद’च्या घटना रोखण्यासाठी केंद्र अन् राज्य सरकारने पुढाकार घ्यावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणार्या करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी’, अशा मागण्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आल्या.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मूक मोर्च्याला प्रारंभ झाला. मूकमोर्चा असला, तरी हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी जोरदार घोषणा दिल्या. हिंदूंनी दिलेल्या घोषणांमुळे शहर दणाणून गेले. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, त्र्यंबकेश्वर मंदिर, तेली गल्ली, कुशावर्त चौक, भाजीपाला मार्केट, एस्.टी. बसस्थानकमार्गे आंबेडकर चौक येथे मोर्च्याचा समारोप झाला. साधू, महंत, वारकरी, विद्यार्थी, महिला आणि मुली असे सहस्रो धर्मप्रेमी भगव्या टोप्या घालून मोर्च्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. या वेळी ‘श्रद्धाला न्याय द्या, आफताबला कठोर शिक्षा करा’, अशा घोषणा देण्यात आल्या. या वेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.