श्री गणेश अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात पालट करण्याची पुणे विद्यापिठाची भूमिका !

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील ‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ अभ्यासक्रमावर टीका झाल्याने अभ्यासक्रमात पालट करण्याची भूमिका विद्यापिठाने घेतली आहे. अभ्यासकांनी या अभ्यासक्रमाविषयी सूचना केल्यास विद्यापीठ अधिकार मंडळ विचार करून सुयोग्य पालट करतील, असे विद्यापिठाने स्पष्ट केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातील संस्कृत आणि प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय संस्कृत विभाग अन् श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपति ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘श्री गणेश अथर्वशीर्ष’ हा एक श्रेयांकाचा अभ्यासक्रम विनामूल्य ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम कोणत्याही पदवी किंवा पदव्युत्तर पदवीचा भाग नसून अतिरिक्त श्रेयांकाचा अभ्यासक्रम आहे.

या अभ्यासक्रमाला विद्यापिठाच्या अधिकार मंडळांनी संमती दिली आहे. भारतीय संस्कृतीमधील संस्कृत स्तोत्रांचा अर्थ समजावून सांगणे, त्यामागील शास्त्रोक्त अर्थ आणि व्याकरण समजावणे असा या अभ्यासक्रमाचा उद्देश आहे, असे विद्यापिठाने सांगितले आहे. नवीन शैक्षणिक धोरणांमुळे भारतीय भाषा, संस्कृती, मूल्ये यांतील विविध स्तोत्रे आणि वाङ्मय अभ्यासकांना उपलब्ध करून दिले आहे; मात्र विविध माध्यमांमध्ये या अभ्यासक्रमाविषयी अभ्यासकांनी अनेक सूत्रे उपस्थित केली आहेत. अभ्यासकांनी अभ्यासक्रमाविषयी सूचना केल्यास सुयोग्य पालट केले जातील, असे विद्यापिठाने स्पष्ट केले आहे.