नगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे डॉ. रवींद्र भोसले व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी घरी अन् रुग्णालयात करत असलेले प्रयत्न

‘संभाजीनगर येथील सौ. देशपांडेकाकूंनी मला श्री गुरुदेवांच्या कृपेने माझ्याकडून झालेले साधनेचे प्रयत्न लिहून देण्यास सांगितले. त्यातून ‘इतर आधुनिक वैद्यांनाही काही गोष्टी शिकायला मिळतील’, असा त्यांचा विचार होता. ‘स्वतःचेच कौतुक करायचे नाही’, असे वाटून मी आतापर्यंत असे काही लिहून दिले नाही; पण ‘इतरांना या लिहिण्याचा लाभ होऊ शकतो’, असे कळल्याने आता लिहून देत आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आदर्श आधुनिक वैद्य (डॉक्टर) कसे असावेत’, यासंदर्भात माझ्या मनात काही विचार होते. त्या विचारांच्या बरेच पुढे जाऊन ‘आदर्श आधुनिक वैद्य (डॉक्टर)’ म्हणून जगणारे डॉ. रवींद्र भोसले यांचा लेख वाचून ‘आता त्या संदर्भात मी काही विचार करायला नको’, हे माझ्या लक्षात आले आणि त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटली. हिंदु-राष्ट्रात चांगले वैद्य व्हावेत; म्हणून या लेखात दिलेले शिक्षणही दिले जाईल. ‘डॉ. रवींद्र भोसले यांनी या विषयासंदर्भात पुढेही असेच मार्गदर्शन करावे’, अशी त्यांना विनंती !’                 

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले   

१. घरी करत असलेले प्रयत्न

आधुनिक वैद्य (डॉ.) रवींद्र भोसले

अर्धा घंटा बसून नामजप आणि देवपूजा करतो. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन होते आणि अधूनमधून ग्रंथांचेही वाचन होते. आढावा देण्यासाठी आता विचारून घेतले आहे. स्वभावदोष-निर्मूलन सारणी भ्रमणभाषमध्ये ठेवली आहे; पण ती नियमितपणे भरली जात नाही.

२. रुग्णालयात असतांना करत असलेले व्यष्टी साधनेचे प्रयत्न

२ अ. भ्रमणभाषवर गजर (टायमर) लावून ठेवणे : प्रत्येक १५ मिनिटांनी आठवण व्हावी, यासाठी मी भ्रमणभाषवर ‘कृष्णाय वासुदेवाय..।’ या श्लोकाचा गजर (टायमर) लावून ठेवला आहे. १५ मिनिटांनी गजर वाजणे चालू होताच डोळे बंद करून श्रीकृष्ण आणि श्री गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचे रूप आठवतो. रुग्ण समोर असला, तरी २ – ३ सेकंद डोळे बंद करता येतात. शस्त्रक्रिया (ऑपरेशन) किंवा एंडोस्कोपी चालू असली, तरीही असे करता येते.

२ आ. नामजप करण्यासाठी करत असलेले प्रयत्न

१. मला शक्य होईल तसा मी नामजप यंत्रावर (काऊंटरवर) श्रीकृष्णाचा नामजप करतो.

२. श्रीकृष्णाच्या नामजपाची पट्टी माझ्या पटलावर मला दिसेल, अशी लावली आहे. त्यामुळे मला नामजपाची आठवण होते.

३. माझ्या ‘प्रिस्क्रीपशन पॅड’च्या वरच्या बाजूला नामजप छापला आहे. त्यामुळे त्यावर लिहितांना नामजपाकडे दृष्टी जाते.

४. शस्त्रकर्म (ऑपरेशन) करतांना प्रार्थना, नामजप आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो; पण अजूनही त्यात सातत्य आलेले नाही.

२ इ. आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी करत असलेले प्रयत्न

१. सनातन कापराची पूड करून त्याचा गंध घेत दीर्घ श्वास घेतो.

२. बाह्य रुग्ण विभागात असतांना (ओ.पी.डी.) अधून मधून हाताला चमेलीचे अत्तर लावतो.

३. बाह्यरुग्ण विभागात असतांना अधूनमधून त्रासदायक शक्तींचे आवरण काढतो.

२ ई. बाह्यरुग्ण विभागात प्रवेश केल्यानंतर उपचारांना आरंभ करण्यापूर्वी परात्पर गुरु डॉ. आठवले, धन्वन्तरि देवता आणि श्रीकृष्ण यांना प्रार्थना करणे : बाह्यरुग्ण विभागात प्रवेश केल्यानंतर प्रथम श्री गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), धन्वन्तरि देवता आणि श्रीकृष्ण यांना फुले वाहून हार घालतो. तुपाचा दिवा आणि सनातन-निर्मित कापूर लावतो अन् सनातन-निर्मित उदबत्तीने त्यांना ओवाळतो. वास्तुदेवता, स्थानदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपालदेवता, कुलदेवता आणि श्री जोतिबा यांना नमस्कार करतो. नंतर मी उदबत्ती हातात घेऊन स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालतो आणि श्रीकृष्णाला प्रार्थना करतो, ‘हे श्रीकृष्णा, तूच माझ्याकडून रुग्ण तपासणी, एंडोस्कोपी आणि शस्त्रकर्म करवून घे.’ नंतर धन्वन्तरि देवतेला, ‘तुम्हीच मला रुग्णावर उपचार कसे करायचे ?’, ते सुचवा’, अशी प्रार्थना करतो आणि श्री गुरुदेवांना ‘या उपचारांच्या माध्यमातून माझी साधना होऊ दे’, अशी प्रार्थना करतो.

२ उ. सनातनचे ग्रंथ आणि श्री गुरुदेवांचे चरित्र माझ्या समोरच्या पटलावरच ठेवलेले आहेत. ते ग्रंथ उघडून पहातो.

२ ऊ. हिंदु राष्ट्र-जागृती सभा आणि विशेषांक यांद्वारे अर्पण करण्याची संधी मिळते.

३. समष्टी साधना होण्यासाठी करत असलेले प्रयत्न

३ अ. रुग्णांना नामजप करण्यास सांगणे : ‘बाह्यरुग्ण विभागामध्ये येणार्‍या अनेक रुग्णांना असलेले जुनाट, वारंवार उद्भवणारे आणि बरे न होणारे आजार आध्यात्मिक असावेत’, असे मला वाटते. त्यामुळे ज्यांचा देवावर विश्वास आहे, अशा रुग्णांना ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या ग्रंथात वाचून नामजप लिहून देतो. रुग्ण परत आल्यावर त्याला ‘नामजप चालू आहे ना ? किती वेळ होतो ?’, असे विचारतो आणि ‘अधिकाधिक नामजप करा’, असे आग्रहाने सांगतो.

३ आ. ‘प्रिस्क्रिप्शन आणि फाईलच्या मागे कुलदेवता अन् श्री गुरुदेव दत्त यांचे नामजप अन् आपत्काळात उपयोगी असलेले ग्रंथ यांची माहिती छापली आहे.

३ इ. रुग्णालयात केलेले प्रयत्न

१. रुग्णालयात सतत प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, ‘श्रीमन्नारायण नारायण…।’ आणि सद्गुरु मिले मोरे…।’ असे संगीत हळू स्वरात चालू असते.

२. रुग्णालयाच्या प्रत्येक खोलीत नामजपाचे मंडल केले आहे.

रुग्णालयाच्या प्रत्येक खोलीत केलेले नामपट्ट्यांचे मंडल

३. प्रतीक्षाकक्षात सनातनचे ग्रंथ-प्रदर्शन लावलेले आहे. अनेक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक हे ग्रंथ चाळतात. त्यांच्यापैकी काही जण ग्रंथांची मागणीही करतात. तसेच दूरचित्रवाणी संचावर धर्मशिक्षण सत्संग सतत चालू असतो.

रुग्णासाठी प्रतीक्षाकक्षात लावण्यात आलेले सनातनचे ग्रंथप्रदर्शन
बाह्यरुग्ण विभागात असलेले देवघर
प्रतीक्षाकक्षात दूरचित्रवाणी संचावर चालू असलेला धर्मशिक्षण सत्संग

४. देवाची आवड असणार्‍या रुग्णाला सनातनचा एखादा ग्रंथ भेट म्हणून देतो. ग्रंथाचे सार एका वाक्यात सांगून ‘अवश्य वाचा’, असे आग्रहाने सांगतो. ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या नातेवाइकांना ‘तुम्ही यांना वाचून दाखवा’, असे सांगतो.

५. बाह्यरुग्ण विभागामध्ये सतत एक उदबत्ती, तर शस्त्रक्रियागार (ऑपरेशन थिएटर), रुग्णालयातील प्रभाग (वॉर्ड) आणि औषधालय (मेडिकल) येथे एक कर्मचारी प्रतिदिन सकाळी सनातन-निर्मित उदबत्ती लावतो.

३ ई. मी सनातनच्या साधकांना आवश्यक ते साहाय्य करतो. तसेच साधनेतील काही कृतीच्या स्तरावरील विचार सुचतात, ते साधकांना ‘व्हॉट्सॲप’वर पाठवतो.

माझे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी मी कोटी कोटी कृतज्ञ आहे. ‘त्यांनी सुचवलेले हे मार्ग मला आणि इतर वैद्यांना कृतीच्या स्तरावर सातत्याने आचरणात आणता येऊ दे’, अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो.’

– डॉ. रवींद्र भोसले, नगर (१०.३.२०१९)

ॲलोपॅथीची औषधे घेऊन बरे न झालेल्या रुग्णांना एखाद्या देवतेचा नामजप करण्यास सांगितल्यावर नेमक्या त्याच देवतेची उपासना खंडित झाल्याचे त्या रुग्णांनी सांगणे

श्री गुरुदेवांच्या कृपेमुळे मला बाह्यरुग्ण विभागामध्ये येणार्‍या रुग्णांना नामजपादी उपाय सांगण्याची संधी मिळते. ॲलोपॅथीची औषधे ठराविक काळ घेऊनही काही रुग्ण पूर्ण बरे होत नाहीत, तसेच बरे झालेल्या रुग्णांना औषधे बंद केल्यास पुन्हा त्रास चालू होतो किंवा काही रुग्णांच्या आजारांवर ॲलोपॅथीमध्ये कोणतेच निदान सापडत नाही. अशा रुग्णांना मी ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या श्री गुरुदेवांच्या ग्रंथात दिल्याप्रमाणे विकारांनुसार नामजप शोधून सांगतो. त्यांना ‘न्यूनतम २ घंटे नामजप करा’, असे सांगतो. असे करू लागल्यापासून मला आलेले काही अनुभव येथे देत आहे.

१. ज्यांना रात्री झोप येत नाही, त्यांना मी श्री हनुमंताचा जप सांगतो. तेव्हा तो रुग्ण श्री हनुमंताशी पूर्वीपासून असलेले संबंध, उदा. ‘घराजवळ हनुमान मंदिर आहे. तेथे दर शनिवारी मी जायचो; पण आता जाणे होत नाही’, इत्यादी सांगू लागतो. तेव्हा त्याला ‘पूर्वी करत असलेली हनुमंताची भक्ती आता होत नाही. त्यानंतरच असा त्रास सुरू झाला’, असे जाणवते.

२. मायग्रेनचा त्रास असणार्‍या रुग्णांना मी श्री दुर्गादेवीचा जप सांगतो. त्यावर एका रुग्ण महिलेने मला सांगितले, ‘मी पूर्वी देवीची भक्ती आणि कुलाचार करत होते; पण आता ते होत नाही.’

यावरून ‘संबंधित देवतेची अवकृपा झाल्याने असा त्रास होतो का ?’, असे माझ्या मनात आले. कृतज्ञता !

– डॉ. रवींद्र भोसले, नगर (२३.३.२०१९)

 

स्वतःची नोकरी किंवा व्यवसाय यांच्या निमित्ताने संपर्कात येणार्‍यांना साधना सांगितल्याची उदाहरणे असल्यास त्यांच्याविषयी सविस्तर माहिती कळवा !

साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती

‘काहींना धर्मप्रसारासाठी घरोघरी जाणे शक्य होत नाही; परंतु ते त्यांची नोकरी किंवा व्यवसाय यांच्या निमित्ताने संपर्कात येणार्‍या व्यक्तींना साधना सांगून समष्टी साधना करतात. डॉ. रवींद्र भोसले यांनी केलेले प्रयत्न, हे याचेच एक उदाहरण होय. अशी उदाहरणे किंवा तुम्ही स्वतः याप्रमाणे समष्टी साधना करत असाल, तर त्याविषयीची माहिती आम्हाला अवश्य कळवा. माहिती पाठवतांना स्वतःचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, साधनेसंबंधी केलेली कृती आणि आलेल्या अनुभूती अशा स्वरूपात पाठवावी.

पत्ता : वैद्य मेघराज पराडकर, २४/ब, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

ई-मेल पत्ता : [email protected]

(ई-मेलमध्ये विषय (Subject) लिहिण्याची सोय असते. त्या ठिकाणी ‘नोकरीच्या / व्यवसायाच्या निमित्ताने संपर्कात येणार्‍यांना साधना सांगितल्याचे उदाहरण’ असे लिहावे.)