उत्तराखंडमधील धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा !

आता बलपूर्वक धर्मांतर करणार्‍यांना १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार !

डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमधील भाजप सरकारने विधानसभेमध्ये ‘उत्तराखंड धर्म स्वातंत्र्य (संशोधन) विधेयक-२०२२’ संमत केले आहे. याद्वारे आता बलपूर्वक धर्मांतर करणार्‍यांना १० वर्षांपर्यंत कारावास आणि ५० सहस्र रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकणार आहे.

एका व्यक्तीचे धर्मांतर केल्यास न्यूनतम ३, तर अधिकाधिक ७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा होणार आहे. तसेच सामूहिक धर्मांतर केल्यास ३ ते १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा करता येणार आहे. याखेरीज दोषींना ५ लाख रुपयांपर्यंत हानीभरपाईसुद्धा द्यावी लागू शकते. ही हानीभरपाई पीडितांना देण्यात येणार आहे. या संदर्भातील कायदा वर्ष २०१८ मध्ये करण्यात आला होता. त्यात १ ते ५ वर्षांपर्यंतची शिक्षेची तरतूद होती.

राज्याचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, उत्तराखंड देवभूमी आहे. येथे धर्मांतरासारख्या गोष्टी घातक आहेत. याला वेसण घालण्यासाठी सरकारने कायदा कठोर केला आहे.