वृद्धापकाळी देवद, पनवेल येथील आश्रमात रहायला येऊन जीवनाचे सार्थक करणार्‍या आणि आश्रमाप्रती भाव असलेल्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी (वय ८७ वर्षे) !

२१.११.२०२२ या दिवशी सनातनचे १९ वे समष्टी संत पू. रमेश गडकरी यांच्या मातोश्री श्रीमती सुमन हनुमंत गडकरी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ८७ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. २.१२.२०२२ या दिवशी त्यांचा मृत्यूनंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने पू. रमेश गडकरी यांना लक्षात आलेली आईची गुणवैशिष्ट्ये, आईच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. (श्रीमती) सुमन गडकरी

१. उतारवयात देवद आश्रमात आल्यावरही व्यष्टी साधनेचा आढावा देणे आणि स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व जाणून स्वतःच्या भावाला त्याविषयीचे ग्रंथ देणे

‘वर्ष २०१८ मध्ये आई तुंग (जिल्हा सांगली) येथून देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहायला आली. त्यानंतर ती नेहमी तिच्या व्यष्टी साधनेचा आढावा उत्तरदायी साधकांना देत असे. तिला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे महत्त्व समजल्यावर तिने भाऊबिजेला भावाकडे जातांना सनातनचे ‘स्वभावदोष (षड्रिपू) – निर्मूलनाचे महत्त्व व गुण-संवर्धन प्रक्रिया, तसेच स्वतःतील स्वभावदोष कसे शोधावेत ?’, हे २ ग्रंथ भावाला भेट म्हणून दिले. आईने तिच्या भावाला सांगितले, ‘‘या ग्रंथांत सांगितल्याप्रमाणे तू कृती केलीस, तर तुझी लवकर प्रगती होईल आणि तुला आनंदही मिळेल !’’

पू. रमेश गडकरी

२. ती. आईचे आजारपण

२ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर आईला झालेला लाभ

२ अ १. वैद्यकीय तपासणी केल्यावर आधुनिक वैद्यांनी ‘तुमच्या आईच्या यकृतातील पाणी काढूया’, असे सांगणे : आईला काही शारीरिक त्रास होऊ लागले. त्यामुळे तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आईच्या यकृतात (लिव्हरमध्ये) पाणी झाले आहे. त्यांना ‘यकृताचा कर्करोग’ झाला असण्याची शक्यता आहे. आपण उद्या त्यांच्या यकृतातील पाणी काढूया.’’

२ अ २. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय रात्रभर करणे अन् आईची पुन्हा तपासणी केल्यावर आधुनिक वैद्यांना आईच्या यकृतात पाणी न दिसणे : मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना आईसाठी नामजपादी उपाय विचारले आणि रात्रभर आम्ही (मी आणि माझी पत्नी सौ. नीला यांनी ) ते उपाय केले. दुसर्‍या दिवशी आईला शस्त्रकर्मगृहात नेल्यावर आधुनिक वैद्यांनी आईची पुन्हा तपासणी केली. तेव्हा त्यांना आईच्या यकृतात पाणी दिसले नाही. त्या वेळी ‘आदल्या दिवशी केलेल्या नामजपादी उपायांमुळे आईचा त्रास निघून गेला असावा’, असे आम्हाला जाणवले.

२ आ. आजारपणातही आईने पलंगावर बसून जमेल तशी सेवा करणे : आश्रमात आल्यावर आई नियमित सेवा करत असे. त्यामुळे आजारपणाच्या आरंभीच्या काळात तिला पलंगावर नुसते झोपून रहाणे आवडत नव्हते. ‘आपण आता हालचाल करू शकत नाही’, हे लक्षात आल्यावर आई पलंगावर बसून लसूण सोलणे, जपमाळा बनवणे, भाजी निवडणे इत्यादी सेवा करण्याचा प्रयत्न करत असे.

२ इ. आजारपणाच्या काळात आरंभी आईला भूतकाळातील घटनांचे स्मरण होणे : आजारपणाच्या काळात आरंभी आईचे मन कधी भूतकाळात रमायचे आणि तिला पूर्वी घडलेल्या घटना आठवायच्या. तेव्हा आम्ही तिला सतत नामजप करण्याची आठवण करून द्यायचो. आईला तिच्या मूळ गावाची आठवण येऊन तेथे जावेसे वाटायचे. तेव्हा ‘नामजप करून आश्रमात रहाणे’ कसे भाग्याचे आहे ?’, हे आम्ही तिला सतत सांगायचो.

२ ई. इतरांचा विचार करणे : आईला ‘आम्हा सर्वांना आणि आश्रमातील साधकांना तिची शुश्रूषा करावी लागते’, याचे पुष्कळ दुःख होत असे. त्यामुळे ती स्वतःचे स्वतः सर्व करण्याचा प्रयत्न करत असे आणि असे करतांना तिला होत असलेले त्रास सहन करत असे.

२ उ. देवाच्या अनुसंधानात असणे : मी आईला भेटायला तिच्या खोलीत जायचो. तेव्हा प्रत्येक वेळी मी ‘‘तुझा नामजप चालू आहे ना ?’’, असे विचारल्यावर ती ‘‘हो’’ असे सांगत असे. आईला ‘‘तुझा कोणता नामजप चालू आहे ?’’, असे विचारल्यावर ती ‘‘दत्ताचा’’, असे सांगत असे. ‘ती सतत देवाच्या अनुसंधानात आहे’, असे मला जाणवत असे.

२ ऊ. पूर्ण विस्मरण झालेले असतांनाही परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून आईने ‘ते दत्तगुरु आहेत’, असे सांगणे : आईला शेवटच्या आजारपणात काहीही आठवत नव्हते आणि ती कुणालाही ओळखत नव्हती; परंतु सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे बोट दाखवले असता ‘‘ते दत्तगुरु आहेत’’, असे ती सांगायची.

२ ए. आश्रमाप्रती भाव असल्याने ‘मृत्यूनंतरचे शेवटचे कार्य आश्रमातच व्हावे’, असे सांगणारी आई ! : एकदा आईशी सहज बोलत असतांना मी तिला विचारले, ‘‘तुझा मृत्यू झाल्यानंतर तुझे शेवटचे कार्य कुठे करायचे ?’’ त्या वेळी आईने सांगितले, ‘‘मी आता सर्व सोडून या आश्रमात आले आहे. त्यामुळे आता मी इथलीच झाले आहे. नंतर जे काही करायचे, तेही आश्रमातच करायचे. मला इथून कुठेच जायचे नाही.’’ देवानेच तिची ही इच्छा पूर्ण केली.

२ ऐ. अनुभूती
१. आईच्या शेवटच्या एक मासाच्या कालावधीत तिच्या खोलीत चांगले वाटत होते.
२. आईची सेवा करणार्‍या काही साधिकांना ‘आजींच्या समवेत खोलीत असतांना नामजप चांगला होतो’, असे जाणवायचे.
३. आईला श्वास घेण्यास त्रास होत असतांना पू. गडकरीकाकांनी तिच्या आज्ञाचक्रावर तळहात ठेवून ‘आता तुझा शेवटचा प्रवास चालू आहे. तू नामस्मरण कर’, असे सांगणे आणि २ – ३ मिनिटांतच आईचे निधन होणे : २०.११.२०२२ या दिवशी आईला श्वास घेण्यास त्रास होत होता; म्हणून मी तिच्या खोलीत गेलो. तेव्हा ‘आईची अंतिम वेळ आली आहे’, असे मला वाटले. तेव्हा माझ्या मनात ‘शेवटच्या क्षणीही आईचा नामजप कसा चालू राहील ?’, असा विचार आला; कारण तिला काहीच संवेदना होत नव्हत्या. तेव्हा देवाने मला सुचवले, ‘आईला स्थुलातून जरी काही कळत नसले, तरी तिच्या आत्म्याला तिच्याशी संवाद साधल्याचे कळू शकेल.’

त्यानंतर मी आईच्या आज्ञाचक्रावर तळहात ठेवून मनातून तिला सांगितले, ‘आता तुझा शेवटचा प्रवास चालू आहे. तू नामस्मरण कर.’ मी तिच्या बाजूला बसून माझे नित्याचे नामजप करू लागलो. नंतर २ – ३ मिनिटांतच आईचा मोठ्याने होणारा श्वासोच्छ्वासाचा आवाज न्यून झाल्याचे जाणवले. आधुनिक वैद्यांना बोलावल्यावर त्यांनी ‘आईचे निधन झाले आहे’, असे सांगितले. अशा प्रकारे देवाने आईची आश्रमातून कुठेही न जाण्याची इच्छा पूर्ण केली.

४. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना आईच्या मृत्यूविषयी कळवले असता त्यांनी सांगितले, ‘‘आईचा नामजप शेवटपर्यंत चालू होता !’’

५. आईच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

अ. ‘मृत्यूनंतर आई शांतपणे झोपली आहे’, असे वाटत होते.

आ. आईचा मृतदेह दर्शनासाठी ठेवला असता तिच्या चेहर्‍यावर पिवळ्या रंगाची छटा दिसत होती.

इ. आईच्या चितेला अग्नी दिल्यानंतर ज्वालांचा रंग पिवळसर सोनेरी, तसेच लाल रंगाचा दिसत होता.

कृतज्ञता : हे देवा, तुम्ही आईला आयुष्याच्या शेवटच्या काळात आश्रमात येण्याची बुद्धी देऊन तिच्यावर अनन्य कृपा केली. तिचे सर्व उत्तरकार्य आश्रमातच करण्याची बुद्धी तिला दिलीत. ‘तुमच्या चरणी आल्यावर एखाद्या शूद्र जिवाचेही कसे सोने होते’, याचे माझी आई एक मूर्तीमंत उदाहरण आहे. आम्ही सर्व जण तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’

– (पू.) रमेश गडकरी (कै. (श्रीमती) सुमन हनुमंत गडकरी यांचे मोठे सुपुत्र, वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल.  (२५.११.२०२२)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक