बेंगळुरूमधील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात सापडले निरोध, गर्भनिरोधक गोळ्या आणि सिगारेट !

बेंगळुरू – येथील शाळांमध्ये विद्यार्थी भ्रमणभाष आणत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर शाळेच्या प्रशासनाने ८ वी ते १० च्या विद्यार्थ्यांचे दप्तर तपासण्याची मोहीम चालू केली. दप्तर तपासतांना त्यातून निरोध, सिगारेट, लाईटर, व्हाईटनर आदी गोष्टी आढळून आल्या. शिक्षण मंडळाचे महासचिव डी. शशी कुमार यांनी जवळपास ८० शाळांमध्ये तपासणी केली. एका विद्यार्थ्याच्या बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या, त्याचसमवेत पाण्याच्या बाटलीमध्ये दारू आढळली. १० वीत शिकणार्‍या मुलीच्या दप्तरामध्ये निरोध सापडले. जेव्हा तिला याविषयी विचारले तेव्हा तिने सांगितले, ‘ज्याठिकाणी मी शिकवणीला जाते त्याठिकाणचे लोक त्यासाठी दोषी आहेत.’ या प्रकारांमुळे शिक्षकांसह पालकही चकीत झाले आहेत. यानंतर काही शाळांनी आता पालक आणि शिक्षक यांची बैठक बोलावली आहे. तसेच पालकांनी त्यांच्या मुलांशी संवाद साधावा, अशा सूचना काही शाळांनी दिल्या आहेत.

मानसोपचारतज्ञ डॉ. ए. जगदीश यांनी म्हटले की, विद्यार्थी ज्या समस्येतून जात आहेत त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी संघर्ष करावा लागेल. आई-वडिलांनी मुलांकडे लक्ष द्यावे. एका प्रकरणात १४ वर्षांच्या मुलाच्या बुटातून निरोध काढले. काही मुले अशाप्रकारे प्रयोग करतात. त्यात धूम्रपान, अमली पदार्थ आणि लैंगिक सुख यांचा समावेश असतो. आई-वडिलांनी मुलांसमवेत चर्चा करायला हवी. त्यांच्याशी बोलायला हवे.

संपादकीय भूमिका

मुलांवर संस्कार करण्यासाठी पालक त्यांना शाळेत पाठवतात; मात्र तेथे ते काय करतात, हे या घटनेतून लक्षात येत आहे. घर, शाळा आणि समाज येथे मुलांवर योग्य संस्कार होण्यासाठी प्रयत्न करण्यास तसे वातावरणही निर्माण करण्याची आवश्यकता आहे !