‘द काश्मीर फाइल्स’ मधील एक जरी दृश्य असत्य असेल, तर चित्रपटनिर्मिती सोडून देईन ! – विवेक अग्निहोत्री, चित्रपट निर्माते

चित्रपट निर्माते विवेक अग्निहोत्री

मुंबई – आतंकवादी संघटना, शहरी नक्षलवादी आणि भारताचे तुकडे करू पहाणारे ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाला नावे ठेवत आहेत. या महान बुद्धीजीवी लोकांना मी आव्हान देतो की, या चित्रपटातील एक जरी दृश्य, संवाद आणि घटना असत्य असल्याचे सिद्ध केले, तरी मी चित्रपटनिर्मिती करणे सोडून देईन, असे आवाहन ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे निर्माते विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाला काल्पनिक ठरवणार्‍यांना केले आहे.

जम्मू-काश्मीर येथे पाकिस्तानधार्जिण्या धर्मांधांनी काश्मिरी पंडितांच्या निर्घृण वंशविच्छेदावर आधारित विवेक अग्निहोत्री हा चित्रपट काढला आहे. काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराचे वस्तूनिष्ठ स्थिती दाखवलेल्या या चित्रपटाला भारतात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गोवा येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा समावेश करण्यात आला होता. या ठिकाणी मनोगत व्यक्त करतांना ज्युरी प्रमुख आणि इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपट प्रपोगंडा असल्याची टीका केली. विवेक अग्निहोत्री यांनी सामाजिक माध्यमांवर व्हिडिओ प्रसारित करून त्यांना वरील उत्तर दिले. या व्हिडिओमध्ये अग्निहोत्री यांनी म्हटले आहे की, ‘‘मला या गोष्टीचे वाईट वाटते की, भारत सरकारच्या कार्यक्रमात भारत सरकारच्या मंचावर काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याच्या विचारधारेला पाठिंबा दिला गेला. मी मागील ४ वर्षांपासून या चित्रपटावर काम केले, तेव्हापासून हे लोक या चित्रपटाला ‘प्रपोगंडा’ म्हणत आहेत. ७०० पीडित लोकांच्या मुलाखती घेऊन आम्ही हा चित्रपट सादर केला आहे. ती सर्व माणसे प्रपोगंडा आणि अश्लील गोष्टी सांगत होती का ? सद्य:स्थितीतही काश्मीरमध्ये हिंदूंना मारले जाते हा प्रपोगंडा आहे का ? भारताच्या विरोधात उभी रहाणारी ही मंडळी आहेत तरी कोण ? मी घाबरणारा माणूस नाही. मी शेवटपर्यंत लढत राहीन.’’