ईश्वरावर श्रद्धा आणि प्रेमभाव असलेले नाशिक येथील ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दगाजी पाटील (वय ८३ वर्षे) !

श्री. दगाजी पाटील

१. सौ. सुचेता पाटील (मुलगी), नाशिक

१ अ. कष्टाने शिक्षण पूर्ण करणे : ‘श्री. दगाजी पाटील (वय ८१ वर्षे) हे माझे वडील आहेत. आम्ही त्यांना ‘अप्पा’ म्हणतो. अप्पा लहान असतांना त्यांचे वडील वारले. त्यांची आई धार्मिक होती. त्यांनी धुळ्याच्या वसतीगृहात त्यांचे ‘सिव्हिल इंजिनीयरिंग’पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ते अभ्यासात हुशार होते. त्यामुळे परीक्षेचा निकाल लागण्यापूर्वीच त्यांना सरकारी नोकरी लागली.

१ आ. दत्तगुरु आणि कुलदेवता यांवर श्रद्धा असणे : आम्ही नगर जिल्ह्यातील नेवासा येथे रहात होतो. त्या वेळी त्यांची देवगड (प्रसिद्ध दत्तक्षेत्र) येथील पू. किसनगिरी महाराज यांच्याशी भेट झाली. त्यांनी त्यांना गुरु मानले होते. त्यांना त्यांची कृपाछाया लाभली होती. तेव्हापासून त्यांची दत्तगुरूंवर श्रद्धा आहे. ते भावपूर्ण देवपूजा करतात आणि देवपूजा झाल्यावरच खातात. त्यांची कुलदेवतेवरही पुष्कळ श्रद्धा आहे. ते प्रतिवर्षी कुलदेवतेच्या दर्शनाला जातात आणि मंदिरावर ध्वज चढवण्याची सेवा नित्यनेमाने करतात.

१ इ. क्षमाशील : आता ते अधिक वेळ नामस्मरणच करतात आणि कुणालाही दुखवत नाहीत. त्यांच्या भावांनी त्यांना वडिलोपार्जित संपत्तीत (इस्टेटीत) फसवले होते, तरी ते त्यांना क्षमा करतात.

१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले घरी आल्याचा आनंद होणे : आम्ही धुळ्याला स्थायिक झाल्यावर आमचा लहान भाऊ (श्री. राहुल पाटील) सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाप्रमाणे सेवा करत होता. त्या वेळी साधकांची रहाण्याची आणि इतर सेवा आई-वडील आनंदाने करायचे. आमच्या घरी एक दिवस परात्पर गुरु डॉ. आठवले मुक्कामाला होते आणि त्यांनी अप्पांचा हात हातात घेतला होता. ही अनुभूती ते नेहमी सगळ्यांना सांगत असतात.

१ उ. सतत सेवेत रहाणे : त्यांच्यात व्यवस्थितपणा आणि नीटनेटकेपणा हे गुण आहेत. त्यांना कामात व्यस्त रहायला आवडते; म्हणून ते भावाला व्यवसायात साहाय्य करतात. त्यामुळे भावाला सेवेला जाता येते.

१ ऊ. सर्व साधनेत असल्याचा आनंद होणे : त्यांची चारही मुले (२ मुली आणि २ मुलगे) आणि दोन्ही सुना अन् नातवंडे सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. त्यामुळे त्यांना कृतज्ञता वाटते. त्यांच्या तोंडवळ्यात २ – ३ मासांपासून पालट जाणवत आहे.’

२. सौ. नीता साळुंखे (मुलगी), कोथरूड, पुणे.

२ अ. व्यवस्थितपणा : ‘त्यांची सर्व कागदपत्रे ते जागच्या जागी ठेवतात आणि नवीन आलेली कागदपत्रे तत्परतेने लावून ठेवतात. त्यांचे कपडे, उपायांचे साहित्य आणि प्रार्थनेचा कागद व्यवस्थित जागेवर ठेवलेला असतो.

२ आ. अध्यात्माची आवड : ते अनेक वर्षे त्यांच्या शेतातील मारुतीला शनिवारी आणि अमावास्येला शेंदूर लावतात. त्यांना ४५ वर्षांपूर्वी पू. किसनगिरी महाराज यांचा सत्संग लाभला. त्यांनी अप्पांना पैशाची काही नाणी दिली होती. ती त्यांनी जपून ठेवली आहेत. संतांच्या सांगण्यावरून त्यांनी अनेक वर्षे गुरुवारचा उपवास केला. त्यांचा ठराविक नामजप पूर्ण झाल्याविना ते रात्रीचे जेवण घेत नाहीत.

२ इ. नियमितपणा : आम्ही त्यांना प्रार्थना लिहून दिलेल्या आहेत. त्या ते नियमित करतात आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचन नियमित करतात.

२ ई. नम्रपणा : ते कुणाशीही मोठ्या आवाजात बोलत नाहीत आणि कुणाविषयीही त्यांची तक्रार नसते.

२ उ. अपेक्षा नसणे : मुलामुलींनी आपली दूरभाष करून चौकशी करावी, अशी त्यांची अपेक्षा नसते. ते नातवंडे, जावई, मुले, मुली आणि सुना यांचे कौतुक करतात; परंतु स्वतः परेच्छेने रहातात.

२ ऊ. व्यापक विचार करणे : ३२ वर्षांपूर्वी त्यांनी मला अभियांत्रिकीला प्रवेश घेण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. तेव्हा आम्ही ४ मुलीच अभियांत्रिकीला होतो. मला काही कारणास्तव ‘इलेक्ट्रॉनिक्स’ सोडून ‘सिव्हिल’ (स्थापत्य) घ्यावे लागले. त्या वेळी माझी एक वर्षाची ‘फी’ वाया गेली, तरी ते मला काही बोलले नाहीत.

३. सौ. नीलिमा भूपेंद्र पाटील (सून), ठाणे  

३ अ. नामजपाची ओढ : ‘अप्पा अधिकाधिक वेळ नामजप करत आपल्या खोलीत बसतात.

३ आ. स्वावलंबी : त्यांचे वय आता ८१ वर्षे आहे, तरी ते स्वतःची कामे स्वतः करतात.

३ इ. प्रेमभाव

१. मला सेवेवरून येण्यास विलंब झाला, तरी ते रागवत नाहीत.

२. सासूबाईंच्या निधनानंतर त्यांनी आमच्याशी जुळवून घेतले आहे. ते परेच्छेने वागतात. ते बोलतांना अतिशय प्रेमाने आणि हळू आवाजात बोलतात.

३. माझ्या सेवेत व्यत्यय येऊ नये; म्हणून ते चहा बनवणे, जेवण वाढून घेणे, कपडे धुण्यास देणे आणि बाहेरून औषधे आणणे ही कामे प्रेमाने करतात.

४. ते घरात येणार्‍या साधकांशी प्रेमाने बोलतात आणि त्यांची विचारपूस करतात.

३ ई. तोंडवळ्यावर जाणवलेला पालट : अप्पांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य आणि शांतपणा जाणवतो. त्यांची प्रत्येक कृती सात्त्विक असते आणि त्यात कृतज्ञताभाव जाणवतो.’
(१९.१.२०२०)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक