उडुपी पेजावर मठाचे श्री विश्व प्रसन्नतीर्थ स्वामी यांचे हिंदूंना सतर्क रहाण्याचे आवाहन !
उडुपी (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील किनारपट्टी भागात येत्या काही दिवसांत अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होणार आहेत. जिहादी आतंकवादी ‘हिंदु’ असल्याचे भासवून तेथे घातपात करू शकतात. काहीजण वाईट कृत्ये करून ती हिंदूंच्या माथी मारण्याचा प्रयत्न सध्या करत आहेत. त्यांना अशी कृती करण्याची संधी हिंदूंनी देऊ नये. हल्ली समाजविघातक घटक हिंदूंच्या धार्मिक चिन्हांचा उपयोग करून अशी कृत्ये करत असल्याचे आपण पहात आहोत. भविष्यात असे होऊ नये, यासाठी अधिक जागृत असावेे, असे आवाहन उडुपी पेजावर मठाचे श्री विश्व प्रसन्नतीर्थ स्वामी यांनी केले आहे. नुकत्याच मंगळुरू येथे रिक्शात झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी त्यांनी वरील आवाहन केले आहे. या प्रकरणी शारीक नावाच्या आतंकवाद्याला अटक झाली. त्याच्याकडे हिंदु नावाचे आधारकार्ड सापडले होते. यावरून बाँबस्फोट घडवून त्याचे दायित्व हिंदूंवर ढकलण्याचा कट जिहाद्यांनी रचल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर श्री विश्व प्रसन्नतीर्थ स्वामी यांनी वरील वक्तव्य केले.
श्री विश्व प्रसन्नतीर्थ स्वामी यांनी पुढे म्हटले की, जनता अधिक प्रमाणात सहभागी असलेल्या ठिकाणी काही भयंकर घडल्यास समाजाची मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. त्यासाठी प्रत्येकाने जागृत असले पाहिजे. कोणतीही संशयास्पद हालचाल अथवा व्यक्ती दिसल्यास तत्परतेने पोलिसांना माहिती द्यावी. भ्रमणभाष अथवा ओळखपत्र हरवल्यास तत्परतेने संबंधितांना कळवावे.